राष्ट्रीय स्वयंसेवक संघ्याच्या ‘केशव कुंज’ चे उद्घाटन; १५० कोटी रुपये खर्चून बांधली नवीन इमारत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2025 20:25 IST2025-02-21T20:18:49+5:302025-02-21T20:25:27+5:30

दिल्लीतील झंडेवालान येथे असलेल्या आरएसएसच्या कार्यालयाचे नुकतेच उद्घाटन करण्यात आले आहे. आरके आश्रमाजवळ असलेल्या उदासीन आश्रमातून गेल्या अनेक वर्षांपासून आरएसएसचे तात्पुरते कार्यालय सुरू होते.

आता सर्व संघाचे अधिकारी या कार्यालयात स्थलांतरित झाले आहेत. साधेपणा आणि शुद्धतेच्या आधारे संघटना चालवण्याची भाषा करणारे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे एवढे भव्य कार्यालय सध्या चर्चेचा विषय बनले आहे.

कार्यालयाच्या तळमजल्यावर हनुमान मंदिरही बांधण्यात आले आहे.

या संकुलात एक भव्य सभागृह आहे, जेथे लोक कोणत्याही कार्यक्रमासाठी सहज बसू शकतात. याशिवाय एक वाचनालयही तयार करण्यात आले असून, त्यात ८६०० पुस्तके आहेत.

आरएसएस कार्यालयात एक मोठे कॅन्टीनही तयार करण्यात आले आहे. येथे शेकडो लोक एकत्र बसून जेवू शकतात.

आरएसएसचे हे कार्यालय ५ लाख स्क्वेअर फूटमध्ये बांधले आहे. प्रेरणा, साधना आणि अर्चना अशी ज्यांच्या तीन टॉवरची नावे आहेत. प्रत्येक टॉवरमध्ये ग्राउंड प्लस १२ मजले आहेत म्हणजेच प्रत्येक इमारतीत एकूण १३ मजले आहेत.

आरएसएस कार्यालयातच शाखा सुरू करण्यासाठी जागाही सोडण्यात आली आहे. संघाचे संस्थापक डॉ.हेडगेवार यांचा पुतळा बसवला असून तेथे शाखेसाठी जागा आहे. संघाच्या भाषेत त्याला संघ स्थान म्हणतात.

संपूर्ण संकुलात एकूण ३०० खोल्या आहेत. या खोल्या आरएसएसच्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांसाठी देण्यात आल्या आहेत. याशिवाय संलग्न संस्थांसाठीही येथे कार्यालयांची व्यवस्था करण्यात आली आहे.

या कार्यालयाची रचना अनूप दवे यांनी केली होती आणि शुभ समूहाने ही इमारत बांधली आहे.