2700 कोटींचा खर्च, ऑस्ट्रेलियातील ऑपेरा हाऊसपेक्षाही मोठे... कसे आहे IECC कन्व्हेन्शन सेंटर?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2023 07:47 PM2023-07-26T19:47:07+5:302023-07-26T19:55:35+5:30

IECC Complex: हे कॉम्प्लेक्स भारतातील सर्वात मोठे एमआयसीई (MICE-Meting, Incentives, Conferences and Exhibitions) आहे.

G20 शिखर परिषदेसाठी दिल्लीतील प्रगती मैदानावर पुनर्विकसित केलेले आयटीपीओ (ITPO) कॉम्प्लेक्स सज्ज झाले आहे. हे कॉम्प्लेक्स भारतातील सर्वात मोठे एमआयसीई (MICE-Meting, Incentives, Conferences and Exhibitions) आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज (26 जुलै) एमआयसीई कॉम्प्लेक्सचे उद्घाटन करण्यात आले. तत्पूर्वी नरेंद्र मोदी यांनी आज कॉम्प्लेक्समध्ये पूजा केली. तसेच, कॉम्प्लेक्समध्ये हवन आणि पूजेनंतर नरेंद्र मोदींनी मजुरांची भेट घेऊन त्यांचा सत्कार केला.

एमआयसीई कॉम्प्लेक्स सप्टेंबरमध्ये होणाऱ्या G-20 बैठकीसाठी बनवण्यात आले आहे. हे सुमारे 123 एकरमध्ये पसरलेले आहे. इंडिया ट्रेड प्रमोशन ऑर्गनायझेशन (ITPO) च्या मालकीच्या जागेच्या पुनर्विकासाची जबाबदारी एनबीसीसी (इंडिया) लिमिटेड या बांधकाम कंपनीला देण्यात आली होती.

याशिवाय, या एमआयसीई कॉम्प्लेक्सची इतरही अनेक वैशिष्ट्ये आहेत. जवळपास 2700 कोटी रुपयांचा खर्च करून एमआयसीई कॉम्प्लेक्स बांधण्यात आले आहे. या लेव्हल थ्री कन्व्हेन्शन सेंटरमध्ये 7000 हून अधिक लोकांची बसण्याची व्यवस्था आहे.

प्रगती मैदान परिसरात केंद्रस्थळ म्हणून हे एमआयसीई विकसित करण्यात आले आहे. या कॉम्प्लेक्समधील मल्टीपर्पज हॉल आणि प्लेनरी हॉलची एकत्रित क्षमता 7,000 लोकांची आहे, जी ऑस्ट्रेलियातील सिडनी ऑपेरा हाऊसपेक्षा जास्त आहे. कॉम्प्लेक्सच्या भव्य अॅम्फीथिएटरमध्ये 3,000 लोक बसतात.

कॉम्प्लेक्समध्ये जागतिक स्तरावर मेगा परिषद, आंतरराष्ट्रीय शिखर परिषद आणि सांस्कृतिक महोत्सव आयोजित केले जातील. हे अत्याधुनिक हॉल प्रदर्शक आणि कंपन्यांना आपल्या प्रेक्षकांशी संलग्न राहण्यासाठी, व्यवसाय विकास आणि नेटवर्किंग संधींना प्रोत्साहन देण्यासाठी एक उत्कृष्ट व्यासपीठ प्रदान करेल.

एमआयसीई कॉम्प्लेक्समध्ये पाहुण्यांच्या सोयीसाठी 5500 हून अधिक पार्किंगची जागा तयार करण्यात आली असून त्यामुळे वाहने पार्क करण्यात कोणतीही अडचण येणार नाही. G20 शिखर परिषदेसाठी तयार करण्यात आलेल्या या कॉम्प्लेक्सचे सौंदर्य असे आहे की, जो कोणी पाहील तो आनंदित होईल.

हे एमआयसीई कॉम्प्लेक्स जर्मनीमधील हॅनोव्हर एक्झिबिशन सेंटर आणि शांघायमधील राष्ट्रीय प्रदर्शन आणि कन्व्हेन्शन सेंटरला टक्कर देऊ शकते.

एमआयसीई कॉम्प्लेक्सच्या गुणवत्तेमुळे, जगातील 10 सर्वात मोठ्या प्रदर्शन आणि कन्व्हेन्शन सेंटरच्या यादीत या कॉम्प्लेक्सचा समावेश करण्यात आला आहे