Harsha Richhariya : "मी जीन्स-टॉप घालून बाहेर पडले तर..."; हर्षा रिछारियाचं साध्वी आणि सनातनबद्दल मोठं विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2025 16:20 IST2025-01-22T16:07:29+5:302025-01-22T16:20:33+5:30

Harsha Richhariya : महाकुंभमध्ये सुरुवातीपासूनच हर्षा रिछारिया हे नाव जोरदार चर्चेत होतं.

उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमध्ये महाकुंभमध्ये सुरुवातीपासूनच हर्षा रिछारिया हे नाव जोरदार चर्चेत होतं. हर्षा रिछारियाला सोशल मीडियावर सर्वात सुंदर साध्वीचा टॅगही देण्यात आला. ३० वर्षीय हर्षाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर, सर्वांना तिच्याबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता आहे.

महाकुंभात प्रवेश करताना हर्षा निरंजनी आखाड्याच्या रथावर बसलेली देखील दिसली होती. यावरून वाद सुरू झाला. काही संतांनी हर्षाच्या रथावर बसण्यावर आणि भगवे कपडे परिधान करण्यावर आक्षेप घेतला.

हा वाद इतका वाढला आहे की, हर्षा रिछारियाने ढसाढसा रडत महाकुंभ सोडण्याची घोषणा केली आहे. हर्षाने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर याबाबतची माहिती दिली. महाकुंभ सोडण्यामागची कारणं सांगितली आहेत. व्हिडीओमध्ये ती ढसाढसा रडली.

'शॅडो टॉक' ला दिलेल्या पॉडकास्टमध्ये हर्षाने विविध प्रश्नांची उत्तरे दिली. म्हणाली, "सनातनी असणं आणि साध्वी होणं या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. या दोघांमध्ये खूप फरक आहे. मी वारंवार सर्वांना हे स्पष्ट सांगत आहे की, मी साध्वी नाही."

"आपला सनातन समाज खूप मोठा आहे. त्यात राहून आपण आपल्या मर्यादेत काहीही करू शकतो. मला माहीत आहे की, मला किती मर्यादा निश्चित करायच्या आहेत. कुठे त्या मर्यादा ओलांडायच्या नाहीत."

"जर मी उद्या जीन्स आणि टॉप घालून बाहेर पडले तर मला तसं करण्याचा अधिकार आहे. मी तसं करू शकते कारण मी साध्वी नाही. मी अद्याप साध्वी म्हणून कोणतीही औपचारिक दीक्षा घेतलेली नाही."

अँकरिंग आणि मॉडेलिंग सोडून अध्यात्माचा मार्ग स्वीकारणारी हर्षा रिछारिया म्हणते, "मी एक सामान्य व्यक्ती आहे. मी मंत्राचा जप करते. मी एक हिंदू व्यक्ती आहे. मी एक सनातनी व्यक्ती आहे."

"जर मी कॉन्टॅक्ट लेन्स घातल्या, चेहऱ्यावर मेकअप केला, लिपस्टिक लावली, जीन्स आणि टॉप घातला, तर कोणालाही त्यावर आक्षेप नसावा. हे सर्व प्रश्न निराधार आहेत" असं हर्षाने म्हटलं आहे.

"काही लोकांनी मला संस्कृतीशी जोडण्याची संधी दिली नाही. माझी नेमकी चूक काय आहे?, मला टार्गेट केलं जात आहे. अशा परिस्थितीत, २४ तास कॉटेज पाहण्यापेक्षा मी येथून निघून जाणं माझ्यासाठी चांगलं आहे" असं हर्षाने व्हिडीओमध्ये म्हटलं होतं.

आपल्या इन्स्टाग्राम पेजवर, हर्षाने स्वतःचे वर्णन एक अँकर, मेकअप आर्टिस्ट, सामाजिक कार्यकर्ती, सोशल मीडिया इन्फ्लुएंसर आणि ट्रॅव्हल ब्लॉगर म्हणून केलेलं आहे. महाकुंभमुळे गेल्या काही दिवसांपासून ती चर्चेत आहे.