शेतकऱ्याचा मुलगा ते टेलिव्हिजन न्यूज अँकर...'आप'चे CM उमेदवार इसुदान गढवी यांचा संघर्षमय प्रवास!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2022 17:14 IST2022-11-04T16:53:18+5:302022-11-04T17:14:58+5:30

गुजरात विधानसभा निवडणुकीत सत्ता राखण्यासाठी भाजपा जोरदार प्रयत्न करत असताना आम आदमी पक्षानं यावेळी कडवं आव्हान दिलं आहे. आम आदमी पक्षही गुजरातच्या निवडणुकीसाठी कोणतीही कसर सोडू इच्छित नाही. यातच 'आप'नं आज गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर करुन सर्वांना धक्का दिला आहे.
'आप'नं मुख्यमंत्रीपदासाठी असा चेहरा निवडला की जो गुजरातमध्ये खूप लोकप्रिय आहे. 'आप'नं इसुदान गढवी हे पक्षाचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार असतील असं जाहीर केलं आहे. पक्षानं गुजरात निवडणुकीच्या मोहिमेची जबाबदारी गढवी यांच्याकडे सोपवली आहे.
'आप'चे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार म्हणून इसुदान गढवी यांची निवड केली आहे. आज केजरीवाल यांनी अहमदाबादमधील एका कार्यक्रमात याची घोषणा केली. यावेळी व्यासपीठावर गोपाल इटालिया आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मानही उपस्थित होते. आपल्या नावाची घोषणा झाल्यानंतर गढवी भावूक झाले आणि त्यांनी मंचावर आईचे आशीर्वाद घेतले.
कोण आहे इसुदान गढवी?
शेतकरी कुटुंबात जन्मलेले इसुदान गढवी हे राजकारणी आहेत आणि आम आदमी पार्टीशी संबंधित आहेत. ते एक प्रसिद्ध पत्रकार आणि गुजराती माध्यमांचे लोकप्रिय अँकर आहेत. ते दूरदर्शनच्या 'योजना' या कार्यक्रमाशी संबंधित होते आणि नंतर ETV गुजरातीमध्येही काम केलं आहे.
गुजरातमधील डांग आणि कपराडा तालुक्यांमध्ये अवैध वृक्षतोडीचा १५० कोटी रुपयांचा घोटाळा उघडकीस आणला. त्यांच्या अहवालानंतर गुजरात सरकारनं कारवाई केली. या घटनेनं गढवी यांना प्रसिद्धी मिळवून दिली आणि ते एक निर्भिड पत्रकार म्हणून ओळखले जाऊ लागले.
२००५ मध्ये गुजरात विदयापीठातून जनसंवाद आणि पत्रकारितेची पदवी घेतल्यानंतर इसुदान गढवी यांनी पोरबंदरमध्ये पत्रकारिता सुरू केली. मीडिया रिपोर्टनुसार, २०१५ मध्ये ते गुजराती मीडियाचे सर्वात तरुण चॅनल प्रमुख बनले. १४ जून २०२१ रोजी गढवी यांनी आप प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या उपस्थितीत आम आदमी पार्टीमध्ये प्रवेश केला होता.
पत्रकारितेच्या काळात गढवी यांनी दूरदर्शनवरील सुप्रसिद्ध 'योजना' कार्यक्रम केला. दरम्यान, या कार्यक्रमातून त्यांनी गुजरातच्या डांग जंगलातील बेकायदेशीरपणे झाडे तोडण्याशी संबंधित १५० कोटी रुपयांचा घोटाळा उघड केला होता. ज्या काळात गढवी पत्रकारितेच्या क्षेत्रात मोठे नाव बनले होते, त्याच काळात त्यांनी पत्रकारितेचा व्यवसाय सोडून राजकारणाच्या क्षेत्रात पाऊल ठेवले.
गोपाल इटालिया यांनी दिला होता गढवी यांना पक्षप्रवेश
गुजरातचे आम आदमी पक्षाचे प्रमुख गोपाल इटालिया यांनी त्यांना आम आदमी पक्षात प्रवेश मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. खुद्द इटालिया मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीतील एक मोठा चेहरा होते.
मुख्यमंत्रिपदाची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर गढवी यांनी जनतेला आवाहन करून जनतेच्या भल्यासाठीच काम करणार असल्याचं सांगितलं. माझ्यावर विश्वास ठेवून, माझ्यासारख्या सामान्य माणसावर इतकी मोठी जबाबदारी सोपवल्याबद्दल मी आम आदमी पार्टी, अरविंद केजरीवाल आणि विशेषत: गुजरातच्या जनतेचे मनापासून आभार मानू इच्छितो. मी वचन देतो की लोकसेवक बनून मी सदैव जनहितासाठी काम करेन, असं ट्विट गढवी यांनी केलं आहे.