Omicron Coronavirus Vaccine : महाराष्ट्रासह अन्य राज्यांना मिळणार Zydus चे १ कोटी डोस; केवळ प्रौढांनाच मिळणार लस
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2021 09:04 IST2021-12-06T08:56:02+5:302021-12-06T09:04:35+5:30
लसीकरण कमी असलेल्या राज्यांमध्ये प्रौढांना zy-cov-D ही लस देण्यात येणार आहे.

Omicron Coronavirus Vaccine : कोरोनाचा नवा विषाणू ओमायक्रॉनपासून होणारा संसर्ग आता देशात दिसून येऊ लागला आहे. पुढील वर्षी जानेवारी २०२२चा शेवटचा आठवडा आणि फेब्रुवारीच्या सुरुवातीच्या दिवसांत देशात ओमायक्रॉनची बाधा झालेल्यांची संख्या सर्वाधिक असेल, असा दावा आयआयटी कानपूरच्या संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकी विभागाचे प्राचार्य आणि उपसंचालक मनिंदर अग्रवाल यांनी केला आहे.
ओमायक्रॉनची लाट जरी आली तरी तिचा प्रभाव कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटमुळे आलेल्या दुसऱ्या लाटेइतका नसेल, असे त्यांचे मत आहे. प्रा. अग्रवाल यांनी संशोधनाअंती दुसऱ्या लाटेवेळीही मांडलेली भाकिते बऱ्याच अंशी खरी ठरली होती. त्यामुळे त्यांनी ओमायक्रॉनबाबत नोंदवलेले भाकीत महत्त्वाचे आहे.
दरम्यान, आता ओमायक्रॉन व्हेरिअंटच्या प्रभावानंतर सरकार आता अॅक्शन मोडमध्ये आलं आहे. ज्या ठिकाणी लसीकरणाचं प्रमाण कमी आहे, अशा ठिकाणी जायडसची zy-cov-D ही लस देण्यात येणार आहे. परंतु केवळ प्रौढांनाच ही लस देण्यात येईल.
पश्चिम, बंगाल, झारखंड, बिहार, पंजाब, महाराष्ट्र, तमिळनाडू, उत्तर प्रदेश या राज्यांना जायडसचे १ कोटी डोस वितरित केले जाणार आहेत. आजतकनं यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. ही लस सध्या केवळ प्रौढांना देण्यात येणार आहे.
दरम्यान, ज्या ठिकाणी लसीकरणाचं प्रमाण कमी आहे त्या राज्यांना प्राधान्य देण्यात येणार असल्याचं म्हटलं जातंय. केंद्र सरकारकडूनच राज्यांना १ कोटी लसीचे डोस वितरित केले जाणार आहेत.
जायडसची लस अशा जिल्ह्यांमध्ये दिली जाणार आहे, ज्या ठिकाणी कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाच्या पहिल्या डोसचा ग्राफ कमी आहे. सध्या भारतात पूर्ण लसीकरण हे लसीकरणासाठी योग्य असलेल्यांच्या ५० टक्क्यांपर्यंत पोहोचलं आहे. आता प्रौढांसाठी Zydus ची लसही दिली जाणार आहे.
भारतात अनेक ठिकाणी कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोठ्या प्रमाणात सुरू आहे. तर दुसरीकडे हिमाचल प्रदेशनं कोरोना लसीकरणासंबंधी मोठा टप्पा गाठला आहे. राज्यात शंभर टक्के पौढांना लसीचे डोस देण्यात आलेत. तर दुसरीकडे ५३,८६,३९३ लोकांना कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा दुसरा डोस देण्यात आलाय.
जगभरातील ३८ देशामध्ये पसरलेला कोरोनाचा ओमायक्रॉन व्हेरिएंट आता भारतातही वेगाने फैलावत आहे. केवळ चार दिवसांमध्ये देशातील ओमायक्रॉनचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या २१ वर पोहोचली आहे. २ डिसेंबर रोजी देशात ओमायक्रॉनची बाधा झालेला पहिला रुग्ण सापडला होता.
रविवारी एका दिवसामध्ये ओमायक्रॉनचे १७ नवे रुग्ण सापडले आहेत. राजस्थानमधील जयपूरमध्ये ९, महाराष्ट्रामध्ये ७ आणि दिल्लीमध्ये ओमायक्रॉनचा एक रुग्ण सापडला. आतापर्यंत ओमायक्रॉन व्हेरिएंट राजधानी दिल्लीसह पाच राज्यांमध्ये पसरला आहे.