२०२६ मध्ये या ५ राज्यात रंगणार सत्तेचा सारीपाट, बाजी कोण मारणार, NDA की ‘INDIA’?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2026 12:57 IST
1 / 7 बुधवारी सरलेलं २०२५ हे वर्ष अनेक राजकीय आरोप प्रत्यारोपांमुळे गाजलं. या वर्षात दिल्ली आणि बिहार या दोन राज्यांत झालेल्या विधानसभेच्या निवडणुकांत बाजी मारत भाजपा आणि २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत झालेल्या पिछेहाटीची थोडीफार भरपाई केली होती. आता २०२५ मध्ये देशातील ५ प्रमुख राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी रंगणार आहे. तसेच या निवडणुकीत विरोधी पक्षात असलेल्या इंडिया आघाडीतील घटक पक्षांची कसोटी लागणार आहे. 2 / 7२०२६ मध्ये पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, तामिळनाडू आणि पुदुचेरी या राज्यांमध्ये निवडणुका होणार आहेत. त्याशिवाय विविध राज्यांमधील राज्यसभेच्या ७५ जागांवर एप्रिल महिन्यापासून नोव्हेंबर महिन्यापर्यंत मतदान होणार आहे. दरम्यान, या निवडणुकांच्या निकालांमुळे केवळ नवी राजकीय समीकरणेच उदयाला येणार नाहीत तर राजकीय दशा आणि दिशाही बदलेल, असा दावा केला जात आहे. 3 / 7पश्चिम बंगालमधील विधानसभेचा कार्यकाळ ७ मे २०२६ रोजी संपत असून, तिथे एप्रिल-मे दरम्यान, निवडणूक होण्याची शक्यता आहे. पश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या २९४ जागा असून, तिथे तृणमूल काँग्रेस आणि भाजपामध्ये मुख्य लढत होण्याची शक्यता आहे. तर काँग्रेस आणि डावे पक्षही रिंगणात असतील. २०२१ मध्ये तृणमूल काँग्रेसने २१३ जागा जिंकल्या होत्या, तर भाजपाने ७७ जागांवर विजय मिळवला होता. २०११ पासून सत्तेत असलेल्या ममता बॅनर्जी यांचा तृणमूल काँग्रेस सलग चौथा विजय मिळवण्यासाठी सज्ज झाला आहे. तर यावेळी राज्यात सत्ता परिवर्तन करण्यासाठी भाजपा परिवर्तन करण्यासाठी प्रयत्नशील आहे. 4 / 7२०२६ मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीतील दुसरं प्रमुख राज्य आहे तो म्हणजे तामिळनाडू. तामिनाडूमध्येही एप्रिल किंवा मे महिन्यात निवडणुका लागगण्याची शक्यता आहे. येथे डीएमकेचे प्रमुख आणि तामिळनाडूचे विद्यमान मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांची कसोटी लागणार आहे. स्टॅलिन यांच्यासमोर यावेळी दुहेरी आव्हान असण्याची शक्यता आहे. एकीकडे डीएमकेचा प्रतिस्पर्धी एआयएडीएमके तर दुसरीकडे अभिनेता विजय याचा टीव्हीके पक्षही यंदा निवडणुकीच्या रिंगणात असेल. तसेच राज्यात नगण्य अस्तिव्य असलेल्या भाजपाच्या कामगिरीकडेही लक्ष असेल. २०२१ साली झालेल्या तामिळनाडू विधानसभेच्या निवडणुकीत एकूण २३४ जागांपैकी डीएमकेने १३३ जागा जिंकल्या होत्या. तर डीएमकेचा मित्रपक्ष असलेल्या काँग्रेसने १८ जागा जिंकल्या होत्या. एआयएडीएमकेने ६६ तर भाजपाने ४ जागांवर यश मिळवलं होतं. मात्र यावेळी अभिनेता विजय याच्या टीव्हीके पक्षामुळे येथील निवडणूक रंगतदार होण्याची शक्यता आहे. 5 / 7 सध्या देशात डाव्या पक्षांच्या ताब्यात असलेलं एकमेव राज्य असलेल्या केरळमध्येही एप्रिल-मे महिन्यादरम्यान निवडणुका होणार आहेत. येथे डाव्या पक्षांच्या एलडीएफ ह्या आघाडीसमोर काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूडीएफचं आव्हान असणार आहे. २०२१ साली झालेल्या केरळ विधानसभेच्या निवडणुकीत एलडीएफने ९९ जागा जिंकत सत्ता आपल्या ताब्यात ठेवली होती. मात्र गेल्या लोकसभा निवडणुकीत आणि नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत चांगली कामगिरी केल्याने येथे काँग्रेसला पुन्हा एकदा केरळमध्ये सत्ता मिळवण्याची आशा आहे. तसेच तिरुवनंतपुरम महानगरपालिकेत विजय मिळवणाऱ्या भाजपाच्या कामगिरीकडेही सर्वांचं लक्ष असेल. 6 / 7 पूर्वोत्तर भारतातील आसाममधील विधानसभेचा कार्यकाळही संपत आला आहे. त्यामुळे येथेही एप्रिल-मे महिन्यात निवडणुका होण्याची शक्यता असून, २०१६ पासून येथे भाजपानं आपलं वर्चस्व राखलेलं आहे. तसेच हिमंत बिस्वा सरमा यांच्या नेतृत्वाखाली सलग तिसऱ्यांदा विजय मिळवण्याची रणनीती भाजपा आखत आहे. तर येथील सत्तेत पुनरागमन करण्यासाठी काँग्रेसकडून जोरदार तयारी करण्यात येत आहे. २०२१ मध्ये झालेल्या निवडणुकीत आसाममधील विधानसभेच्या १२६ जागांपैकी ७५ जागा भाजपाने जिंकल्या होत्या. तर काँग्रेसच्या आघाडीला ५० जागा जिंकता आल्या होत्या.7 / 7 वरील चार प्रमुख राज्यांसोबत पुदुचेरी या केंद्रशासित प्रदेशामध्येही या वर्षाच्या मध्यावर निवडणूक होणार आहे. येथे एनडीएमधील एएनआरसी आणि भाजपा यांची आघाडी विरुद्ध काँग्रेस अशी लढत होणार आहे. २०२१ साली झालेल्या निवडणुकीत एनडीएने राज्यातील ३० पैकी १६ जागांवर विजय मिळवला होता. त्यात एएनआरसीने १० आणि भाजपाने ६ जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसला केवळ २ जागा मिळाल्या होत्या. येथे सध्या एएनआरसीचे संस्थापक एन. रंगासामी हे मुख्यमंत्री आहेत. तसेच यावेळीही एनडीए विरुद्ध इंडिया आघाडी अशीच लढत होणार आहे.