Coronavirus: लॉकडाऊननंतर 'अशी' सुरू करा मेट्रो अन् एअरपोर्ट; CISF चा 'फुल प्रूफ' प्लॅन
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2020 14:01 IST2020-04-24T13:45:51+5:302020-04-24T14:01:24+5:30

कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी भारतात ३ मे पर्यंत लॉकडाऊन सुरु आहे. गेल्या ४० दिवसांहून अधिक काळ देशात लॉकडाऊन सुरु असल्याने सार्वजनिक वाहतूक सेवा बंद आहेत. १४ एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील लॉकडाऊन वाढवण्याची घोषणा केली.
मात्र ३ मे रोजी दुसऱ्या टप्प्यातील लॉकडाऊन हटवल्यानंतर रणनीती काय असायला हवी यावर सध्या काम सुरु आहे. लॉकडाऊनमुळे देशातील सर्व एअरपोर्ट आणि मेट्रो सेवा बंद आहेत. लॉकडाऊन संपल्यानंतर या सेवा पुन्हा कशा सुरु केल्या जाव्यात. यासाठी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाने सरकारला प्लॅन पाठवला आहे. ज्यात कडक सुरक्षा व्यवस्था, प्रत्येक प्रवाशाची तपासणी आणि एअरपोर्टच्या ठिकाणी येण्याजाण्याची वेळ हे सर्व समाविष्ट आहे.
लॉकडाऊननंतर मेट्रो कसं काम करेल?
सीआयएसएफने दिल्ली मेट्रोसाठी एक आराखडा तयार केला आहे, जो डीएमआरसी आणि नगरविकास मंत्रालयाला पाठविला गेला आहे. जेव्हा दिल्ली मेट्रो कार्यरत असेल, तेव्हा प्रवाशांना तपासणीपूर्वी शरीरावर धातुच्या वस्तू (बेल्ट्स, पर्स इ.) काढून द्याव्या लागतील.
मेट्रोमध्ये मास्क घालणे बंधनकारक असेल. आरोग्य सेतु अॅप मोबाइलमध्ये असणे आवश्यक आहे. फ्लूची लक्षणे असलेल्या प्रवाशांना प्रवास करण्याची परवानगी दिली जाणार नाही.
आरोग्य सेतु अॅपवरून प्रसिद्ध झालेल्या ई-पासच्या सहाय्याने संभाव्य कोरोनाग्रस्तांची ओळख पटू शकेल. मेट्रो परिसरातील प्रत्येक एन्ट्री आणि एक्झिट ठिकाणी हँड सॅनिटायझर आणि हँडवॉशची ठेवण्यात येईल.
प्रत्येक स्टेशनमध्ये प्रवेश करण्यापूर्वी थर्मल स्कॅनिंगची प्रणालीची व्यवस्था असेल.
विमानतळ कसं सुरू करणार?
लॉकडाऊन संपल्यानंतर सीआयएसएफचे जवान विमानतळावर खास ठिकाणी तैनात केले पाहिजेत, त्यादरम्यान पीपीई किटची व्यवस्था करावी.
विमानतळावर सोशल डिस्टेंसिंगचं काटेकोरपणे पालन केले पाहिजे. फ्लाइट सुटण्याच्या वेळेमध्ये मोठा फरक आहे, तसेच प्रवाशांना विमानतळावर २ तासापूर्वी येण्यास सांगितले पाहिजे.
नागरी उड्डयन मंत्रालयाला पाठविलेल्या या प्रस्तावाचा हेतू म्हणजे विमानतळावर जास्त गर्दी जमा होऊ नये यासाठी आहे.
दिल्ली मेट्रोच्या १५० स्थानकावर जवळपास १२ हजारांपेक्षा जास्त सीआयएसएफचे जवान तैनात असतात. ज्यांच्याकडे सुरक्षेची जबाबदारी असते. ३ मे रोजी लॉकडाऊन संपल्यानंतर नियमांसह मेट्रो आणि एअरपोर्ट सुरु करण्याचा हा प्लॅन पाठवण्यात आला आहे.