CoronaVirus News: ...ती वेळ अजून यायचीय; कोरोना संकटात मोदी सरकारनं दिला धोक्याचा इशारा

Published: May 14, 2021 05:48 PM2021-05-14T17:48:21+5:302021-05-14T17:56:00+5:30

CoronaVirus News: देशातील जनतेसाठी धोक्याचा इशारा; दुसरी लाट आणखी वर जाण्याची शक्यता

देशात आलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं सर्व विक्रम मोडीत काढले. गेल्या काही दिवसांपासून दैनंदिन कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. मात्र तरीही धोका कायम आहे.

मे महिन्याच्या पहिल्याच दिवशी देशात ४ लाखांहून अधिक कोरोना रुग्ण आढळून आले. त्यानंतर जवळपास आठवडाभर दररोज ४ लाखांहून अधिक रुग्णांची नोंद झाली. मात्र त्यानंतर हा आकडा ४ लाखाच्या खाली आला.

गेल्या काही दिवसांपासून देशात दररोज ४ लाखांपेक्षा कमी रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे दुसरी लाट ओसरली असल्याचा अंदाज वर्तवण्यात येऊ लागला. मात्र कोरोनाची दुसरी लाट अजून ओसरलेली नाही, असं नीती आयोगाचे सदस्य असलेल्या डॉ. व्ही. के. पॉल यांनी सांगितलं आहे.

कोरोनाची दुसरी लाट संपलेली नाही. या लाटेनं अद्याप टोक गाठायचं आहे. देशात कोरोना पुन्हा एकदा रौद्र रुप धारण करू शकतो, असा धोक्याचा इशारा पॉल यांनी दिला.

कोरोनाचा पुढचा धोका ओळखून राज्यांच्या मदतीनं राष्ट्रीय स्तरावर आरोग्य संबंधीच्या सुविधा आणखी मजबूत करायला हव्यात. त्यामुळे लोकांना योग्य वेळी उपचार मिळू शकतील, असं पॉल म्हणाले.

सरकारला दुसऱ्या लाटेची माहिती नव्हती हा आरोप चुकीचा आहे. आम्ही विविध व्यासपीठांच्या माध्यमातून दुसऱ्या लाटेबद्दल लोकांना जागरुक करण्याचा प्रयत्न करत होतो, असं पॉल यांनी सांगितलं.

कोरोनाची दुसरी लाट येईल असा अंदाज आम्ही वर्तवला होता. त्या अनुषंगानं आम्ही सतर्कतेच्या सूचनादेखील केल्या होत्या, असं पॉल म्हणाले. देशात सध्याच्या घडीला सिरो पॉझिटिव्हिटी २० टक्के असून ८० टक्के लोकसंख्या कोरोनाच्या विळख्यात सापडू शकतो, असा धोका त्यांनी व्यक्त केला.

१७ मार्चला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाला संबोधित केलं. देशात कोरोनाची दुसरी लाट आल्याचं त्यावेळी पंतप्रधान म्हणाले होते. लोकांनी घाबरण्याची नाही, त सुरक्षित राहण्याची गरज असल्याचं मोदींनी म्हटलं होतं याची आठवण पॉल यांनी करून दिली.

कोरोना लाटेनं टोक गाठणं अद्याप बाकी आहे. हा विषाणू कधीही रौद्ररुप धारण करू शकतो. आम्हाला या गोष्टींची कल्पना आहे. त्यामुळे देशभरात तयारी सुरू आहे. आरोग्य सुविधांवर विशेष लक्ष दिलं जात आहे, अशी माहिती पॉल यांनी दिली.

लोकांनी कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचं काटेकोरपणे पालन करायला हवं. यामुळे लोक अधिकाधिक सुरक्षित राहतील, असं आवाहन पॉल यांनी केलं.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!