CoronaVirus News: कोरोनाची तिसरी लाट कधी येणार? दररोज किती रुग्ण आढळणार?; महत्त्वाची माहिती समोर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2021 09:10 AM2021-08-02T09:10:42+5:302021-08-02T09:13:38+5:30

CoronaVirus News: आयआयटी हैदराबाद, आयआयटी कानपूरचं महत्त्वपूर्ण संशोधन

देशात आलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा जोर ओसरला आहे. मे महिन्याच्या सुरुवातीला देशात दररोज ४ लाखांहून अधिक रुग्णांची नोंद व्हायची. आता हाच आकडा ५० हजारांच्या खाली आला आहे.

देशात सध्या दररोज ५० हजारांपेक्षा कमी कोरोना रुग्णांची नोंद होत आहे. मात्र गेल्या ५ दिवसांपासून रुग्णांच्या संख्येत सतत वाढ होत आहे. त्यामुळे चिंतेत भर पडली आहे. तिसऱ्या लाटेचा धोका कायम आहे.

देशात कोरोनाची तिसरी लाट येण्याचा धोका आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची तीव्रता कमी करण्यासाठी लसीकरणाला वेग देण्याची गरज आहे. कोरोनाची तिसरी लाट कधी येणार, ती शिखर केव्हा गाठणार, त्यावेळी किती रुग्ण आढळून येणार, असे प्रश्न देशातल्या कोट्यवधी लोकांच्या मनात आहेत.

कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेबद्दल हैदराबाद आणि कानपूरमधील आयआयटीनं संशोधन केलं. आयआयटी हैदराबादनं मथुकुमल्ली विद्यासागर, तर आयआयटी कानपूरनं मनिंद्र अग्रवाल यांच्या नेतृत्त्वाखाली केलेल्या संशोधनात महत्त्वाची माहिती पुढे आली आहे.

कोरोनाची तिसरी लाट ऑगस्टमध्ये येईल. यादरम्यान दररोज १ लाख नवे कोरोना रुग्ण आढळून येतील. परिस्थिती अतिशय बिघडल्यास हा आकडा दीड लाखांपर्यंत जाईल, असं आयआयटीचं संशोधन सांगतं.

केरळ आणि महाराष्ट्रामुळे परिस्थिती पुन्हा गंभीर होऊ शकते, असा अंदाज विद्यासागर यांनी वर्तवला आहे. कोरोनाची तिसरी लाट दुसऱ्या लाटेइतकी घातक नसेल, असंदेखील त्यांनी सांगितलं.

कोरोनाची तिसरी लाट ऑक्टोबरमध्ये शिखर गाठेल. त्यानंतर कोरोना रुग्णांची संख्या कमी कमी होत जाईल, असं आयआयटीचा अहवाल सांगतो. गणिती प्रारुपाच्या मदतीनं आयआयटीनं हा अंदाज बांधला आहे.

कोरोना विषाणूच्या डेल्टा व्हेरिएंटमुळे चिंता वाढली आहे. डेल्टा व्हेरिएंट अधिक संक्रामक आहे. त्यामुळे तो अतिशय वेगानं पसरतो. डेल्टा कांजण्यांप्रमाणे पसरू शकतो. त्यामुळे चिंतेत भर पडली आहे.

कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांनादेखील डेल्टा व्हेरिएंटची लागण होत आहे. त्यामुळे धोका अधिक वाढला आहे. डेल्टा व्हेरिएंट सर्वप्रथम भारतातच आढळून आला आहे.