CoronaVirus News : गुड न्यूज! देशात कोरोनाचा वेग मंदावतोय; 'या' आकडेवारीने दिला मोठा दिलासा

By सायली शिर्के | Published: September 30, 2020 07:47 PM2020-09-30T19:47:11+5:302020-09-30T20:29:28+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates: भारतात कोरोना संसर्गाचा वेग कमी झाला आहे. देशामध्ये कोरोना व्हायरसचा रिप्रोडक्शन रेट म्हणजेच आर व्हॅल्यू नियंत्रणात असल्याची माहिती समोर आली आहे.

गेल्या काही महिन्यांपासून जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. जगभरातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही तब्बल 3 कोटींवर गेली आहे. तर लाखो लोकांचा मृत्यू झाला आहे.

देशातही कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला आहे, देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली असून रुग्णांचा आकडा 62,25,764 वर पोहोचला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 97,497 लोकांना जीव गमवावा लागला आहे.

देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 80,472 नवे रुग्ण आढळून आले आहेत तर 1,179 जणांचा मृत्यू झाला आहे. याच दरम्यान दिलासादायक आकडेवारी समोर आली आहे.

भारतात कोरोना संसर्गाचा वेग कमी झाला आहे. देशामध्ये कोरोना व्हायरसचा रिप्रोडक्शन रेट म्हणजेच आर व्हॅल्यू नियंत्रणात असल्याची माहिती समोर आली आहे.

अमेरिकेच्या मिशिगन युनिव्हर्सिटीच्या COV-IND स्टडी ग्रुपने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या एका आठवड्यापासून कोरोनाचा रिप्रोडक्शन रेट 1 च्या खाली आहे. याचाच अर्थ एखादा कोरोनाग्रस्त हा एकापेक्षा कमी व्यक्तींना संक्रमित करत आहे.

देशात कोरोनाचा प्रसार सुरू झाल्यापासून आतापर्यंत पहिल्यांदाच कोरोनाचा रिप्रोडक्शन रेट 1 च्या खाली आला आहे आणि आता हा दर कायम आहे.

जर रिप्रोडक्शन रेट हा दोन आठवड्यांपर्यंत एकच्या खाली राहिला तर परिस्थिती नियंत्रणात आहे, असं म्हणता येईल. भारतात पहिल्यांदा 21 सप्टेंबरला कोरोनाचा उत्पत्ती दर एकच्या खाली आला असल्याची माहिती मिशिगन युनिव्हर्सिटीने दिली आहे.

मिशिगन कॅन्सर सेंटर युनिव्हर्सिटीच्या महामारी विज्ञानाचे प्राध्यापक भ्रमर मुखर्जी यांनी दिलेल्या माहितीनुसार, व्हायरसच्या आलेखात खरोखरच आशावादी कल दिसून आला आहे. चाचण्यांमध्ये लक्षणीय वाढ झाल्याने राष्ट्रीय आकडे चांगले असल्याचं म्हटलं आहे.

भारतात कोरोनाच्या वाढत्या चाचण्यामुळे कोरोनाचा रिप्रोडक्शन रेट कमी झाला आहे. गेल्या सात दिवसांत भारतातील रिप्रोडक्शन रेट हा एकच्या खाली आहे. त्यामागचं कारण म्हणजे देशभरात एकूण 75 लाखांहून अधिक चाचण्या घेण्यात आल्या आहे.

26 सप्टेंबरच्या आकडेवारीनुसार, देशातील 14 राज्यांमध्ये रिप्रोडक्शन रेट 1 च्या खाली असल्याचं स्पष्ट झालं आहे. यानुसार भारतातील राष्ट्रीय सरासरी प्रमाण 0.96 इतके आहे.

महाराष्ट्रात कोरोनाचा रिप्रोडक्शन रेट 0.93 आहे. जो राष्ट्रीय सरासरीपेक्षाही कमी आहे. देशातील कोरोनाच्या एकूण रुग्णांपैकी 22 टक्के रुग्ण हे महाराष्ट्रातील आहेत.

आंध्र प्रदेशमध्ये (0.85), उत्तर प्रदेश (0.87), हरियाणा (0.88), पंजाब (0.90), कर्नाटक (0.91), छत्तीसगड (0.91), जम्मू आणि काश्मीर (0.91), आसाम (0.94), झारखंडमध्ये (0.94) रिप्रोडक्शन रेट आहे.

दिल्ली, बिहार, तेलंगणा आणि तामिळनाडूमध्ये देखील रिप्रोडक्शन रेट 1 पेक्षा कमी आहे. कोरोनातून बऱ्या होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

महाराष्ट्रात कोरोनाचा कहर असताना मुंबईतून एक दिलासादायक माहिती आता समोर आली आहे. कोरोनाचा हॉटस्पॉट असलेल्या मुंबईतून सुखावणारी माहिती मिळत आहे.

मुंबईकर कोरोनाची लढाई जिंकत आहेत. दिलासादायक म्हणजे मुंबईचा रिकव्हरी रेट हा 82 टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. गेल्या दहा दिवसांत 27,219 अधिक लोक हे कोरोनामुक्त झाले आहेत. तर सप्टेंबरमध्ये 47,615 लोकांनी कोरोनाविरुद्धचं युद्ध जिंकलं आहे.

कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वेगाने वाढ होत आहे. मुंबईतील विविध रुग्णालयात कोरोनाग्रस्तांवर उपचार सुरू असून उपचारानंतर ठीक झाल्यावर डिस्चार्ज देण्यात आला आहे.