Omicron Variant : ओमायक्रॉनने वाढवलं टेन्शन! देशात पुन्हा एकदा लॉकडाऊन लागणार?; केंद्राने दिलं 'हे' उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2021 20:55 IST2021-12-02T20:34:26+5:302021-12-02T20:55:21+5:30
Omicron Variant And Lockdown : कोरोनाचा नवा व्हेरिएंट असलेल्या ओमायक्रॉनचे रुग्ण आता भारतात देखील सापडले आहेत.

जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. अनेक ठिकाणी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येने तब्बल 26 कोटींचा टप्पा पार केला असून लाखो लोकांचा मृत्यू झाला आहे. याच दरम्यान ओमायक्रॉनने जगभराचं टेन्शन वाढवलं आहे.
कोरोनाचा नवा व्हेरिएंट असलेल्या ओमायक्रॉनचे रुग्ण आता भारतात देखील सापडले आहेत. अनेक देशांमध्ये कोरोनाच्या या धोकादायक प्रकाराच्या केसेस समोर आल्यानंतर पुन्हा एकदा लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी गुरुवारी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत 29 देशांमध्ये ओमायक्रॉनच्या 373 प्रकरणांची नोंद झाली आहे. याच दरम्यान आता भारतातही रुग्ण आढळून आल्यावर लॉकडाऊन लागू करण्याची जोरदार चर्चा रंगली आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आज पत्रकार परिषद घेत ओमायक्रॉन व्हेरिएंटबाबत महत्त्वाची माहिती दिली. भारतात ओमायक्रॉनचे दोन रुग्ण आढळले आहेत. या दोन्ही रुग्णांमध्ये विषाणूची गंभीर लक्षणे आढळलेली नाहीत, असे स्पष्ट करण्यात आले.
ओमायक्रॉनचा धोका पाहता देशात पुन्हा लॉकडाऊन लावावा लागणार का? असं विचारले असता त्यावर केंद्राने उत्तर दिलं आहे. पत्रकार परिषदेत नीती आयोगाचे सदस्य (आरोग्य) डॉ. व्ही. के. पॉल यांनी लॉकडाऊनबाबतच्या प्रश्नावर उत्तर दिले.
देशात ओमायक्रॉन व्हेरिएंटचे रुग्ण आढळल्याने लॉकडाऊन लावले जाणार का, असे विचारले असता लॉकडाऊन लावण्याची आत्ताच गरज नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. यासोबत ओमायक्रॉन व्हेरिएंटचा धोका लक्षात घेता अधिक सतर्क होण्याची गरज असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
ओमायक्रॉन व्हेरिएंटचे जे आव्हान आहे त्याचा आपण मुकाबला करणार आहोत. आपल्याकडे त्यासाठी सक्षम अशी यंत्रणा आहे. आपली आरोग्य यंत्रणाही सक्षम आहे. त्यामुळे घाबरून जाण्याची गरज नाही. या लढाईत लोकांचे सहकार्य सर्वात महत्त्वाचे आहे.
कोविड नियमांचे काटेकोरपणे पालन केले गेले पाहिजे. प्रामुख्याने मास्कचा वापर सक्तीने केला गेला पाहिजे, असं पॉल यांनी नमूद केले. बूस्टर डोसबाबतही त्यांनी महत्त्वाचे भाष्य केलं आहे. ओमायक्रॉन व्हेरिएंटचा सर्वच देश सध्या अभ्यास करत आहेत.
विषाणू किती घातक आहे, या विषाणूची लक्षणे काय आहेत, प्रादुर्भाव किती वेगाने होतो, कोणती दक्षता बाळगली गेली पाहिजे, कोणती लस प्रभावी ठरेल, बूस्टर डोस घेण्याची आवश्यकता आहे का, या सर्व बाबींवर तज्ज्ञ सध्या रिसर्च करत आहे. त्यातून जे निष्कर्ष पुढे येतील त्याआधारे निर्णय घेतले जातील.
बूस्टर डोसबाबतही ठोस अहवाल आल्यानंतरच निर्णय घेता येईल, असं पॉल यांनी म्हटलं आहे. कर्नाटकमध्ये साऊथ आफ्रिकेतून आलेले दोन रुग्ण कोरोनाच्या नव्या व्हेरिअंटने बाधित झाले आहेत. 66 वर्षीय आणि 46 वर्षीय अशा दोन पुरुष प्रवाशांना नव्या व्हेरिअंटची लागण झाली आहे.
दोन्ही रुग्णांमध्ये कोरोनाची गंभीर लक्षणे नाहीत. दोन्ही ओमायक्रॉनच्या रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे दिसत आहेत. देशात आणि जगभरातील अशा सर्व प्रकरणांमध्ये आतापर्यंत कोणतेही गंभीर लक्षण आढळून आलेले नाही. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
जिनोम सिक्वेंसिंगद्वारे कर्नाटकातील दोन रुग्णांना कोरोनाच्या नव्या ओमायक्रॉन व्हेरिअंटची बाधा झाल्याचे समोर आले आहे. देशात 37 लॅब आहेत. ओमायक्रॉनचे रुग्ण सापडले म्हणून लोकांनी घाबरण्याचे कारण नाही, परंतू काळजी घेणे गरजेचे आहे, असेही अग्रवाल म्हणाले.
जे रुग्ण सापडले आहेत त्यांच्या संपर्कात आलेल्यांची ओळख पटविण्यात आली आहेत. त्यांनाही डॉक्टरांच्या देखरेखीत ठेवण्यात आले आहे., असे अग्रवाल यांनी म्हटले. आतापर्यंत 29 देशांमध्ये ओमायक्रॉन सापडला आहे.
जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) याला व्हेरिएंट ऑफ कन्सर्न अर्थात चिंतेचा व्हेरिएंट असल्याचं म्हटलं आहे. या व्हेरिएंटमुळे जगभरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून रविवारी जागतिक आरोग्य संघटनेने या व्हेरिएंटबद्दलची काही नवी माहिती नागरिकांना दिली.
जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीनुसार, सध्या कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या निदानासाठी वापरल्या जाणाऱ्या RT-PCR टेस्टच्या माध्यमातून ओमायक्रॉन व्हेरिएंटचं निदान करणं शक्य आहे.