कोरोनावर औषधे बिनकामी; WHO च्या इशाऱ्यानंतरही भारतात वापरणार

By हेमंत बावकर | Published: October 17, 2020 09:27 AM2020-10-17T09:27:15+5:302020-10-17T09:31:20+5:30

Corona Virus Remdesivir WHO Warning: जागतिक आरोग्य संघटना (WHO) च्या निरिक्षणात कोरोनावर वापरण्यात य़ेणारी 4 औषधे खूपच कमी परिणामकारक असल्याचे आढळल्याने धक्का बसला आहे. यामुळे या औषधांच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाल्याने उपचारांवरदेखील याचा परिणाम होणार आहे.

भारत देशभरातील कोरोना लसींच्या चाचण्यांचा प्रोटोकॉल बदलण्याच्या विचारात आहे. जागतिक आरोग्य संघटना (WHO) च्या निरिक्षणात कोरोनावर वापरण्यात य़ेणारी 4 औषधे खूपच कमी परिणामकारक असल्याचे आढळल्याने धक्का बसला आहे. यामुळे या औषधांच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाल्याने उपचारांवरदेखील याचा परिणाम होणार आहे.

रेमडेसिवीर, हायड्रॉक्सिक्लोरोक्विन, लोपिनवीर आणि इंटरफेरॉन या औषधांचा कोरोनाच्या रुग्णांवर फारसा प्रभाव पडला नसल्याचे WHO ने म्हटले आहे. असे असले तरीही भारतासह जगभरात रेमडेसिवीर औषधाचे उपचार सुरु राहणार आहेत.

आयसीएमआरचे संचालक समीरन पांडा यांच्यानुसार जोपर्यंत ड्रग रेग्युलेटरी ऑथॉरिटीकडून (डीआरए) सूचना येत नाहीत तोपर्यंत या औषधाच्य़ा चाचण्या सुरुच राहणार आहेत.

आयसीएमआरचे सदस्य डॉ. बलराम भार्गव यांनी सांगितले की, नॅशनल टास्क फोर्स आणि जॉईंट मॉनिटरिंग ग्रुपसोबतच्या चर्चेनंतर यावर अभ्यास केला जाईल.

अन्य एका अधिकाऱ्याने सांगितले की, आम्ही क्लिनिकल प्रोटोकॉलचा आढावा घेणार आहोत. यामध्ये आवश्यकतेनुसार बदल केले जातील. आम्हाला रेमडेसिवीर यापुढेही वापरायचे की नाही यासाठी आणखी संशोधनाची गरज आहे. आम्ही या चाचण्यांमधून आलेल्या परिणामांचा अभ्यास करत आहोत.

चाचण्यांवर लक्ष ठेवून असलेल्या समितीचे सदस्य के. श्रीनाथ रेड्डी यांच्यानुसार, अंतिम निकाल दाखवितात की औषधाचा कोणताही परिणाम झाला नाही. तरीही आम्ही चाचण्या सुरुच ठेवणार आहोत. कारण रेमडेसिवीरद्वारे कोणत्याही सब ग्रुपला फायदा होतो की नाही हे जाणून घेता येईल.

WHO ने हजारो लोकांवरील या औषधाच्या परिणामांचा अभ्यास केला. जवळपास सहा महिने या चाचण्या घेण्यात आल्या. यामध्ये ही औषधे फेल झाल्याचे दिसून आले आहे.

डब्ल्यूएचओने सांगितले की, सॉलिडॅरिटी ट्रायलमध्ये एकूण चार औषधांचे परीक्षण करण्यात आले. ही सर्व औषधे कुठल्याना कुठल्या दैशामधील कोरोनाबाधित रुग्णांवरील उपचारांसाठी वापरण्यात येत आहेत. या ट्रायलमध्ये रेमडेसिविरसोबतच हायड्रोक्सीक्लोरोक्वीन, अँटी एचआयव्ही ड्रग कॉम्बिनेशन लोपिनाविर-रिटोनविर आणि इंटरफेरॉन यांची तपासणी करण्यात आली.

अमेरिकन औषधनिर्माता कंपनी गिलिएड सायन्सच्या रेमडेसिवीर औषधाचा वापर भारतात केला जात आहे. तसेच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर उपचार करण्यासाठी याच औषधाचा वापर केला गेला होता.

जगभरात धुमाकूळ घालणाऱ्या कोरोना विषाणूला रोखण्यासाठी अद्याप कुठलीही प्रभावी लस येऊ शकलेली नाही. त्यामुळे कोरानाचा संसर्ग होणाऱ्या रुग्णांवर विविध माध्यमातून उपचार करण्यात येत आहेत. दरम्यान, कोरोनाबाधित रुग्णांवर उपचारांसाठी रेमडेसिविर या औषधाचा केला जात आहे.