coronavirus: दिल्लीत कोरोनाचा स्फोट, गेल्या ११ दिवसांत रेकॉर्डब्रेक मृत्यूंची नोंद

By बाळकृष्ण परब | Published: November 13, 2020 10:43 AM2020-11-13T10:43:38+5:302020-11-13T11:23:52+5:30

Delhi coronavirus News : देशाची राजधानी असलेल्या दिल्लीमध्ये कोरोनाच्या फैलावाने गंभीर रूप धारण केले आहे. गेल्या काही दिवसांत दिल्लीतील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत प्रचंड प्रमाणात वाढ झालीआहे.

देशाची राजधानी असलेल्या दिल्लीमध्ये कोरोनाच्या फैलावाने गंभीर रूप धारण केले आहे. गेल्या काही दिवसांत दिल्लीतील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत प्रचंड प्रमाणात वाढ झालीआहे. तसेच गेल्या ११ दिवसांत रेकॉर्डब्रेक मृत्यूंची नोंद झाली आहे. त्यातच काल राज्यातील कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंनी १०० चा आकडा ओलांडला आहे.

दिल्लीमध्ये काल एका दिवसात १०४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. कोरोनामुळे एका दिवसांत १०० हून अधिक मृत्यू होण्याची राज्यातील ही पहिलीच वेळ आहे.

दिल्लीत गेल्या काही दिवसांत रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. राज्यात कोरोनाची तिसरी लाट आल्याचे सांगण्यात येत आहे. त्यातच दिवाळीमुळे बाजारांमध्ये वाढलेली गर्दी, वाढलेले प्रदूषण आणि थंडीचे आगमन यामुळे कोरोनाचा धोका वाढणार असल्याची भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

दिल्लीमध्ये गेल्या २४ तासांत कोरोनाच्या ७ हजार ५३ रुग्णांची नोंद झाली आहे. तर १०४ जणांचा मृत्यू झाला आहे. दिल्लीत कोरोनामुळे एका दिवसात झालेले हे सर्वांधिक मृत्यू आहेत. तसेच दिल्लीत सध्या ४३ हजारांहून अधिक अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

दिल्लीमध्ये मॉल, सिनेमागृह आणि मेट्रोसह सार्वजनिक परिवहन सुरू झाल्यानंतर जनतेला खबरदारी घेण्याची सूचना करण्यात आली होती. मात्र दिवाळीसाठीच्या वाढत्या गर्दीमुळे दिल्लीतील धोका अधिकच वाढत आहे.

दिल्लीमध्ये आतापर्यंत कोरोनाचे ४ लाख ६७ हजार २८ रुग्ण सापडले आहेत. तर ७ हजार ३३२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत ४ लाख १६ हजार ५८० जणांनी कोरोनावर मात केली आहे. दिल्लीत आतापर्यंत कोरोनाच्या ५३ लाख २२ हजार २७४ चाचण्या झाल्या आहेत.

दरम्यान, दिल्लाीमध्ये गेल्या ११ दिवसांत १ ते ११ नोव्हेंबरदरम्यान ७६८ जणांनी कोरोनामुळे आपले प्राण गमावले आहेत. तर संपूर्ण ऑक्टोबर महिन्यात दिल्लीमध्ये ११२४ जणांचा मृत्यू झाला होता. तर सप्टेंबर महिन्यात ९१७ जणांचा मृत्यू झाला होता. आतापर्यंतच्या आकडेवारीमध्ये जून महिन्यात दिल्लीमध्ये सर्वाधिक २२४७ रुग्णांचे मृत्यू झाले होते.

कोरोनाच्या धोका विचारात घेऊन दिल्लीमध्ये यावर्षीं सार्वजनिकरीत्या छठ पूजा केली जाणार नाही. कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येकडे पाहून दिल्ली सरकारने घरातूनच छठपूजा करण्याचे आवाहन केले आहे.