CoronaVirus: दिल्लीत पुन्हा लॉकडाऊन वाढवला, २४ मेपर्यंत निर्बंध कायम; केजरीवालांची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2021 05:03 PM2021-05-16T17:03:30+5:302021-05-16T17:07:06+5:30

CoronaVirus: दिल्लीत चौथ्यांदा लॉकडाऊनचा कालावधी (lockdown) वाढवण्यात आला आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (cm arvind kejriwal) यांनी ही माहिती दिली आहे.

गेल्या काही दिवसांपासून भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. कोरोनाबाधित आणि कोरोनामुळे होणारे मृत्यू दिवसेंदिवस वाढताना पाहायला मिळत आहेत. (lockdown in delhi)

कोरोनाच्या वाढत्या उद्रेकामुळे कोरोना लस, ऑक्सिजन, रेमडेसिवीर इंजेक्शन, बेड्स यांचा तुटवडा जाणवत आहे. या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे.

तसेच देशातील अनेक ठिकाणी कठोर निर्बंध लावण्यात आले आहेत. दिल्लीत चौथ्यांदा लॉकडाऊनचा अवधी वाढवण्यात आला आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (cm arvind kejriwal) यांनी ही माहिती दिली आहे.

गेल्या काही दिवसात दिल्लीत कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. या पार्श्वभूमीवर मंत्री आणि अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून त्यांनी लॉकडाउनचा अवधी आणखी एक आठवडा वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

दिल्लीतील लॉकडाऊनचा कालावधी १७ मे रोजी संपणार होता. मात्र, मुख्यमंत्री केजरीवाल यांनी दिल्लीत आणखी एक आठवडा लॉकडाऊन असेल, अशी घोषणा केली. आता २४ मे पर्यंत दिल्लीत लॉकडाउन असणार आहे.

गेल्या आठवड्यात लागू असलेले निर्बंध या आठवड्यातही लागू असणार आहेत. मेट्रो आणि सार्वजनिक ठिकाणी लग्न समारंभावर निर्बंध तसेच राहणार आहेत.

कोरोनाचे संकठ मोठे आहे. नागरिक दु:खी आहेत. ही वेळ एकमेकांवर बोट उचलण्याची नाही. तर एकमेकांना मदत करण्याची आहे. माझी कार्यकर्त्यांना विनंती आहे, त्यांनी लोकांची मदत करावी, असे आवाहन केजरीवाल यांनी आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांना केले आहे.

महाराष्ट्रातही १ जूनपर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. यापूर्वी १५ मेपर्यंत लॉकडाऊन करण्यात आला होता. मात्र, कोरोनाची परिस्थिती अद्यापही बिकट आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हा निर्णय घेतल्याचे समजते.

दरम्यान, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून गेल्या २४ तासांतील आकडेवारी प्रसिद्ध करण्यात आली आहे. भारतात शनिवारी दिवसभरात ३ लाख ११ हजार १७० नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत.

तर ३ लाख ६२ हजार ४३७ रुग्ण कोरोनावर मात करून घरी परतले आहेत. सध्या देशात ३६ लाख १८ हजार ४८५ रुग्ण उपचार घेत आहेत. तर दिवसभरात ४,०३७ रुग्णांना करोनामुळे आपले प्राण गमवावे लागले आहेत.