Coronavirus: लहानपणी घेतलेली BCG लस कोरोना संसर्गापासून खरंच करू शकते रक्षण?; डॉ. गंगाखेडकर म्हणतात...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2020 08:00 PM2020-04-17T20:00:21+5:302020-04-17T20:08:21+5:30

देशात आतापर्यंत १३ हजार ३८७ लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर ४३७ लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. देशात सर्वाधिक कोरोना रुग्ण महाराष्ट्रात आहेत. त्यांची संक्या ३ हजार २०२ इतकी आहे तसेच १९४ लोकांचा मृत्यू झाला आहे

कोरोना संक्रमित रुग्णांपैकी १३.६ टक्के रुग्ण बरे झाले आहेत. देशात कोरोनाचे आतापर्यंत ८० टक्के रुग्ण बरे आहेत. परंतु देशासाठी एकही मृत्यू होणं ही चिंतेची बाब आहे असं केंद्र सरकारने म्हटलं आहे.

दरम्यान गेल्या काही दिवसांपासून असा दावा करण्यात येत आहे की, बीसीजी लसीमुळे कोरोना संक्रमणाचा धोका कमी होतो. तसेच ही लस कोरोनावर प्रभावीपणे उपचार करण्यास सक्षम आहे मात्र याबद्दल भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे (आयसीएमआर) वरिष्ठ संशोधक डॉ. रमन आर. गंगाखेडकर यांनी उत्तर दिलं आहे.

याबाबत त्यांनी सांगितले की, बीसीजी लसीवर कोणताही ठोस अभ्यास केला गेला नाही, परंतु वैयक्तिकरित्या गंगाखेडकर यांच्या मते बीसीजी लस कोरोनाग्रस्तांसाठी सुरक्षाकवच ठरू शकत नाही

खरं तर सोशल मीडियावर असं सांगण्यात येते की, भारतात कोरोनामुळे जास्त लोक दगावत नाही कारण येथील नागरिकांना जन्म होताच बीसीजी लस दिली जाते, जी आता कोरोनाविरूद्ध ढाल म्हणून काम करत आहे.

कोरोनासंदर्भात पत्रकार परिषदेत एका पत्रकाराने गंगाखेडकर यांना कोरोनाशी लढा देण्यासाठी बीसीजी लस वापरण्याबाबत प्रश्न विचारता त्याला गंगाखेडकर यांनी उत्तर दिले.

ते म्हणाले की, बीसीजी लस जन्म होताच दिली जाते. यामुळे क्षयरोगाचा धोकाही थांबत नाही. नवीन जंतुमुळे क्षयरोगाचा धोका कमी होणार नाही.

काही अभ्यासात असं आढळून आलं आहे की, बीसीजी लस कर्करोगाच्या काही रुग्णांमध्ये रोग प्रतिकारशक्ती वाढवते. पण, कोरोनाविरूद्ध बीसीजीच्या प्रभावाची शक्यता फारच कमी आहे कारण बीसीजीचा प्रभाव केवळ 15 वर्षे टिकतो असं गंगाखेडकर यांनी सांगितले.

तसेच कोरोनाच्या विरोधातील लढ्यामध्ये BCG लस कितपत परिणामकारक ठरू शकेल याचा ICMR कडून अभ्यास करण्यात येणार आहे.

या अभ्यासाचे निष्कर्ष जोपर्यंत जाहीर होणार नाहीत व त्याबाबतचा पुरावा मिळत नाही तोपर्यंत आम्ही या लसीचा वापर करण्याचा सल्ला आरोग्य कर्मचाऱ्यांना देखील देणार नाही असं डॉ. गंगाखेडकर यांनी स्पष्ट केलं आहे.