देशात कोरोना रुग्णांनी ओलांडला आठ लाखांचा टप्पा; यूपीसह अनेक राज्यात पुन्हा लॉकडाऊन

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2020 11:28 PM2020-07-10T23:28:17+5:302020-07-10T23:52:59+5:30

कोरोना विषाणूमुळे जगात हाहाकार माजला आहे. भारतात कोरोना विषाणूच्या रुग्णांची संख्याही सतत वाढत आहे. आता देशात कोरोना विषाणूची लागण झालेल्या रूग्णांची संख्या 8 लाखांवर गेली आहे.

देशात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. दररोज कोरोना विषाणूच्या हजारो रुग्णांची पुष्टी होत आहे. गेल्या काही दिवसांपासून देशात दररोज 20 हजारांहून अधिक कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहे. covid19india.org च्या म्हणण्यानुसार, आता देशात आठ लाखाहून अधिक कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत.

आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, 10 जुलै रोजी सकाळी 7,93,802 कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. तसेच, 4,95,513 कोरोना रुग्ण बरे देखील झाले आहेत. याशिवाय, देशात कोरोनामुळे 21,604 लोकांचा मृत्यू झाला आहे.

आता देशातील कोरोना रुग्णांची संख्या आठ लाखांच्या पुढे गेली आहे. यासंदर्भात आरोग्य मंत्रालयामार्फत नवीनतम अधिकृत डेटा जाहीर केला जाईल.

देशात वेगाने पसरणार्‍या कोरोनाचा संसर्ग लक्षात घेता अनेक ठिकाणी पुन्हा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. उत्तर प्रदेशमध्येही पुन्हा लॉकडाउन लागू करण्यात आले आहे.

उत्तर प्रदेशात 13 जुलैला सकाळी 5 वाजल्यापासून लॉकडाऊनला सुरुवात होणार आहे. यासह, महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात 10 दिवसांचे लॉकडाउन जाहीर केले आहे. हे लॉकडाउन 13 जुलैपासून सुरू होईल आणि 23 जुलै रोजी संपणार आहे.

याचबरोबर, मध्य प्रदेशात कोरोनाची वाढती प्रकरणे लक्षात घेता मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या सरकारने राज्यात पुन्हा लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. आता दर रविवारी संपूर्ण मध्य प्रदेशात लॉकडाऊन होईल. या व्यतिरिक्त केरळ सरकारने राजधानी तिरुअनंतपुरममध्ये तिहेरी लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.

दुसरीकडे, बिहारमध्ये कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाच्या आदेशावरून अनेक जिल्ह्यात पुन्हा लाकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. स्थानिक प्रशासनाने कोरोना संसर्ग रोखण्यासाठी कित्येक जिल्ह्यांमध्ये कठोर पावले उचलली आहेत.

यामध्ये बिहारची राजधानी पटना, आरा, वैशाली, भागलपूर, सुपौल, नालंदा, पूर्णिया, दरभंगा, कैमूर, बक्सर, बेतियाह, नवादा, सुपौल, मधेपुरा, खगेरिया, मुंगेर, किशनगंज, मुझफ्फरपूर आणि मोतिहारी जिल्ह्यांचा समावेश आहे.

याचबरोबर, आसाममधील कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता 28 जूनच्या मध्यरात्री ते 12 जुलैच्या मध्यरात्रीपर्यंत गुवाहाटीमध्ये लॉकडाऊन करण्यात आले आहे.

कोरोनाच्या वाढत्या घटनांमध्ये मणिपूर सरकारने लॉकडाऊन वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री एन बीरेन सिंह यांनी 1 ते 15 जुलै दरम्यान लॉकडाऊन जाहीर केले.