Corona Vaccine: लसींवरून राजकारण! मोदी सरकार की अदार पुनावाला, नेमकं खरं कोण?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2021 10:20 PM2021-05-03T22:20:35+5:302021-05-03T22:26:14+5:30

Corona Vaccine: एकीकडे देशातील कोरोना लसींची कमतरता आणि दुसरीकडे कोव्हिशिल्ड लसींच्या डोसवरून मोदी सरकार आणि सीरमचे अदार पुनावाला यांच्याकडून दावे-प्रतिदावे होताना दिसत आहेत.

गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. कोरोनामुळे होणारे मृत्यूही वाढले आहेत. देशातील अनेक राज्यांमध्ये गंभीर परिस्थिती आहे. (claims of modi govt and serum adar poonawalla)

ऑक्सिजन, रेमडेसिवीर इंजेक्शन, बेड्स यांची कमतरता जाणवत आहे. कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी लसीकरणावर भर दिला जात आहे. मात्र, कोरोना लसींचा तुटवड्यामुळे लसीकरण मोहिमेत अडथळा निर्माण होत असल्याचे पाहायला मिळत आहे.

देशात कोरोना लसीकरणाचा तिसरा टप्पा पार पडत असून, १८ वर्षांवरील पात्र सर्वांना कोरोनाची लस दिली जात आहे. यातच काही व्यावसायिक आणि काही राज्याचे मुख्यमंत्री लसींसाठी आपल्याला धमक्या देतात, असे अदार पुनावाला यांनी जाहीर केल्यानंतर खळबळ उडाली.

पुनावाला यांनी केंद्राने सीरमकडे लसीची मागणी नोंदवली नव्हती, असाही दावा केला. यानंतर केंद्र सरकारने पीआयबीमार्फत लसींच्या पुरवठ्याबाबत स्पष्टीकरण दिले. यानंतर राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. याबाबत अखेर अदार पुनावाला यांनी ट्विटरवरून स्पष्टीकरण दिले.

केंद्र सरकारने लसींची शेवटची ऑर्डर दोन्ही लस उत्पादक कंपन्यांना मार्च २०२१ मध्ये दिली होती. सीरमला २८ एप्रिल २०२१ रोजी लसींच्या खरेदीसाठी १७३२.५० कोटी रुपये संपूर्ण आगावू रक्कम म्हणून दिले.

केंद्र सरकारला मे, जून आणि जुलै महिन्यासाठी ११ कोटी कोव्हिशिल्ड लसींचे डोस मिळणार आहेत. १० कोटी कोव्हिशिल्ड लसींच्या ऑर्डरपैकी ३ मेपर्यंत सरकारला ८.७ कोटी लसींचा पुरवठाही झाला आहे. यापैकी ७८ लाख लसींचे डोस राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांकडे शिल्लक आहेत.

येत्या तीन दिवसांत राज्यांना आणखी ५६ लाख मात्रा दिल्या जाणार असल्याचा दावा करण्यात येत आहे. केंद्र सरकारने मोफत लसीकरणासाठी १६ कोटी ५४ लाख लसींचा पुरवठा राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना केला आहे.

माझ्या बोलण्याचा चुकीचा अर्थ लावण्यात आल्यामुळे मी काही गोष्टी स्पष्ट करू इच्छितो, असे सांगत एक पत्र ट्विट केले आहे. सर्वप्रथम, लस उत्पादन ही एक विशेष प्रक्रिया आहे. एका रात्रीतून उत्पादन वाढविणे शक्य नाही. भारताची लोकसंख्या मोठी आहे आणि सर्व प्रौढांसाठी पुरेसे डोस तयार करणे हे सोपे काम नाही, हे समजून घेतले पाहिजे, असेही ते म्हणाले.

आम्ही गेल्या वर्षी एप्रिलपासून भारत सरकारबरोबर काम करत आहोत. आम्हाला वैज्ञानिक, नियामक आणि आर्थिक असो सर्व प्रकारचे समर्थन मिळाले आहे. आम्हाला एकूण २६ कोटींपेक्षा जास्त डोसची ऑर्डर प्राप्त झाली असून, त्यापैकी १५ कोटींहून अधिक लसींचा डोस पुरविला आहे. आम्हाला १०० टक्के आगाऊ रक्कम मिळाली आहे.

पुढच्या काही महिन्यांत ११ कोटी डोससाठी १७३२.५० कोटी मिळाले आहेत. पुढील काही महिन्यांत राज्य आणि खासगी रुग्णालयांसाठी आणखी ११ कोटी डोस पुरवले जाणार आहे. (corona vaccine shortage)

प्रत्येकाला लस लवकरात लवकर उपलब्ध व्हावी, असे वाटते. आमचेही तेच प्रयत्न आहेत. त्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत. कोरोनाविरुद्धचा भारताचा लढा आणखी मजबूत करू, असेही पुनावाला यांनी म्हटले आहे.

दरम्यान, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अदार पुनावाला यांच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारवर टीका केली आहे. पुनावाला देशात नसताना आणि त्यांनी सुरक्षा व्यवस्था मागितलेली नसताना केंद्राने त्यांना सुरक्षा का पुरवली, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

पुनावाला यांना नेमके कोणी धमकावले, याचा खुलासा व्हायला हवा. मुळात न मागताही त्यांना सुरक्षा दिली जाते याचा खुलासा पुनावाला आणि केंद्राने करायला हवा अशी मागणी नाना पटोले यांनी केली.

भाजप नेते आशिष शेलार यांनी या प्रकरणात अधिकृत भूमिका पुनावाला आणि केंद्र सरकारच घेऊ शकतात. पण, पुनावालांना सुरक्षा का मागावी लागली, हा प्रश्न मात्र गंभीर असल्याचे ते म्हणाले.

कोणत्याही स्थानिक पक्षाचा या प्रकरणात हात असेल, तर हे प्रकरण गंभीर आहे. या प्रकरणाबाबत आमच्याकडे काही माहिती उपलब्ध आहे. योग्य वेळ येताच ती सर्वांसमोर आणली जाईल, असे आशिष शेलार यांनी स्पष्ट केले.