शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Corona vaccine : तुमच्यापर्यंत अशी पोहोचेल कोरोनावरील लस, उत्पादक ते लाभार्थ्यांपर्यंत असा होईल प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2021 10:50 PM

1 / 10
सीरम इन्स्टिट्युटची कोव्हिशिल्ड आणि भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन या दोन लसींच्या आपत्कालीन वापराला औषध महानियंत्रकांनी नुकतीच मंजुरी दिली आहे. या मंजुरीनंतर आता आव्हान आहे ते देशव्यापी लसीकरणाचे. या मोहिमेलाही पुढील आठवड्यापासून सुरुवात होणार आहे. पहिल्या टप्प्यात तीन कोटी लोकांना लस देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर लस उत्पादकांपासून थेट लसीकरण केंद्रापर्यंत लसीचा प्रवास कसा होणार याचा घेतलेला हा आढावा.
2 / 10
लसीचे उत्पादक केंद्रीय आरोग्य मंत्रालयातर्फे चालवल्या जाणाऱ्या प्राथमिक लससाठा केंद्राकडे हवाई मार्गे लस रवाना करतील. त्यासाठी पूर्व, पश्चिम, दक्षिण आणि उत्तर असे चार विभाग करण्यात आले आहेत.
3 / 10
या लससाठा केंद्रातून सर्व लसी ३७ राज्य केंद्रांकडे रवाना केल्या जातील. तेथून लसी जिल्हा साठा केंद्रांकडे पाठवल्या जातील. तिथून त्या प्राथमिक आरोग्य केंद्रांकडे रवाना केल्या जातील.
4 / 10
शीतगृहातून प्राथमिक आरोग्य केंद्र वा उपकेंद्रावर लस पाठवण्यासाठी खास वाहनाची सोय केली जाईल. उपकेंद्रामध्ये जिल्हा रुग्णालय, खासगी रुग्णालय, आरोग्य केंद्र, समाज मंदिर इत्यादींचा समावेश असेल. कोणत्याही टप्प्यावर लससाठा केंद्रातील लसींच्या तापमानात चढ-उतार झाल्याचे निदर्शनाच आल्यास केंद्रीय यंत्रणेद्वारे त्यावर नियंत्रण ठेवले जाईल. सद्यस्थितीत देशभरात २९ हजार शीतगृहे आहेत. या शीतगृहांमध्ये लसींचा साठा केला जाईल. या ठिकाणी वॉक इन कुलर्स, आइस-लाइन रेफ्रिजरेटर इत्यादी ठेवण्यात आले आहेत. ते विजेवर किंवा सौरऊर्जेवर चालतात.
5 / 10
सरकारी आणि खासगी क्षेत्रातील १ कोटी आरोग्य कर्मचारी आणि दोन कोटी कोरोनायोद्धे. ५० वर्षे वयावरील २७ कोटी लोकांना प्राधान्याने लस दिली जाणार आहे. त्यांच्या ओळखनिश्चितीनंतर नोंदणी सुरू होईल.
6 / 10
राज्य सरकारे तसेच केंद्रशासित प्रदेशांनी सरकारी तसेच खासगी आरोग्य केंद्राकडून आधीच डेटा गोळा केला जाईल. हा सर्व डेटा को-विन अॅपवर अपलोड करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे.
7 / 10
सत्र स्थळावर लाभार्थ्यांची नोंदणी केली जाईल. पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी, कोरोना योद्धे आणि लष्कर, पोलीस आणि असा या अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना लस दिली जाईल. या कर्मचाऱ्यांना को-विन अॅपवर नोंदणी करण्याची गरज लागणार नाही. त्यांचा डेटा आधीच नोंद झाला आहे.
8 / 10
लसीकरणाची वेळ आणि तारीख यांची निश्चिती जिल्हाधिकारी करतील आणि डिजिटल पद्धतीने ती लाभार्थ्यांना कळवण्यात येईल . एका सत्रात १०० वा २०० लोकांना लस दिली जाईल.
9 / 10
लसीकरणानंतर लाभार्थ्याला युनिक हेल्थ आयडी कार्ड दिले जाईल. यासंदर्भातील घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १५ ऑगस्ट रोजी राष्ट्रीय आरोग्य मिशनच्या वेळी केली होती. क्यूआर कोड सर्टिफिकेट वा डिजिटल सर्टिफिकेट तयार केले जाईल आणि ते मोबाइल वा डिजिटल लॉकरवर स्टोअर केले जाईल.
10 / 10
लसीकरणाच्या टप्प्यातील प्रत्येक गोष्टीची नोंद अॅपवर करण्यात येणार असल्याने लसीकरणानंतर कोणाला काही दुष्परिणाम जाणवले किंवा काय याचा माग ठेवता येईल.
टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतHealthआरोग्य