Corona Vaccination: कोविशील्डचा एक डोस घेतलेल्यांसाठी मोठी बातमी; जाणून घ्या महत्त्वाची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2021 08:31 PM2021-05-16T20:31:24+5:302021-05-16T20:35:50+5:30

Corona Vaccination: कोविशील्डचा दुसरा डोस कधी? जाणून घ्या कामाची माहिती

देशातील कोरोना रुग्णांचा आकडा कमी होताना दिसत आहे. कोरोनाची दुसरी लाट ओसरल्याचं आकडेवारीतून दिसत आहे. मात्र तरीही खबरदारी घेण्याची गरज आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी बऱ्याचशा राज्यांमध्ये लॉकडाऊन सुरू आहे. तर दुसऱ्या बाजूला कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लसीकरणाचा वेग वाढवण्यात येत आहे.

कोरोना लसीकरणाचा वेग वाढवण्याची गरज असताना देशात लसींचा तुटवडा जाणवू लागला. त्यानंतर आता कोविशील्डच्या लसींच्या दोन डोसमधील अंतर वाढवण्यात आलं आहे. दोन डोसमधील अंतर वाढवल्यास लसीचा प्रभाव वाढत असल्याची माहिती समोर आल्यानं हा निर्णय घेण्यात आला.

कोविशील्डच्या दोन डोसमध्ये १२ आठवड्यांचं अंतर ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे लसीचा एक डोस घेतलेल्यांना आता ८४ दिवसांनी दुसऱ्या डोससाठी अपॉईंटमेंट मिळेल. केंद्र सरकारनं ही माहिती दिली आहे.

काहींनी कोविशील्ड लसीचा एक डोस घेतला आहे आणि दुसऱ्या डोससाठी अपॉईंटमेंट घेतली आहे, त्यावर याचा कोणताही परिणाम होणार नाही.

कोविशील्डची लसीच्या दुसऱ्या डोससाठी अपॉईंटमेंट घेतली आहे. मात्र आता त्यात बदल करून ८४ दिवसांनंतर डोस घ्यायचा असेल, तर संबंधित व्यक्ती त्यात बदल करू शकतात. हा निर्णय ऐच्छिक आहे.

कोविशील्ड लसीच्या दोन डोसमधील अंतर वाढवण्याचा निर्णय घेण्यात आल्यानंतर आता त्यानुसार कोविन पोर्टलमध्ये (CoWIN Digital Portal) बदल करण्यात येत आहेत.

कोविशील्डच्या दोन डोसमध्ये १२ ते १६ आठवड्यांचं अंतर दाखवण्यात यावं यासाठी कोविन पोर्टलमध्ये बदल केले जात असल्याची माहिती केंद्र सरकारनं दिली आहे.

कोविशील्डच्या दुसऱ्या डोससाठी आधीच अपॉईंटमेंट घेतलेल्या व्यक्तीची अपॉईंटमेंट रद्द होणार नाही. ती कोविन ऍपमध्ये तशीच दिसेल, असं केंद्राकडून सांगण्यात आलं आहे.

कोविशील्डच्या डोसमधील अंतर वाढवण्याची गेल्या काही महिन्यांतील ही दुसरी वेळ आहे. सुरुवातीला दोन लसींमधील अंतर १८ दिवसांचं होतं. मग ते ६ ते ८ आठवडे करण्यात आलं.