Corona New Variant: चिंताजनक! ब्रिटनमध्ये कहर माजवणारा कोरोनाचा नवा Delta Plus AY 4.2 व्हेरिएंट भारतात आढळला

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2021 01:44 PM2021-10-25T13:44:13+5:302021-10-25T13:53:23+5:30

Coronavirus Updates in India: देशात जानेवारी महिन्यापासून कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली आहे. कोरोनानं देशात हजारो लोकांचा जीव घेतला आहे. अलीकडे कोरोना रुग्णसंख्येत घट होत असल्याचं दिलासादायक चित्र समोर आलं. मात्र आता पुन्हा नव्याने चिंता वाढवणारी माहिती समोर आली आहे.

मागील वर्षभरापासून जगभरात कोरोना व्हायरसनं हाहाकार माजवला आहे. कोरोनानं कोट्यवधी लोकांना विळख्यात घेतलं तर लाखो लोकांचा जीव घेतला. कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी संशोधकांनी दिवसरात्र मेहनत घेत त्यावर लस विकसित केली.

सध्या कोरोना(Coronavirus) नियंत्रणात आणण्यासाठी एकमेव पर्याय म्हणजे लसीकरण आहे. मात्र कोरोनादेखील त्याच्या रुपात बदल करत असल्यानं अनेकांनी चिंता वाढली आहे. कोरोनाच्या वेगवेगळ्या व्हेरिएंटनं जगातील अनेक देशांमध्ये पुन्हा एकदा कोरोना पसरतोय की काय? हा प्रश्न निर्माण झाला आहे.

भारतात अलीकडेच कोरोनाच्या रुग्णांमध्ये घट होत असल्याने दिलासादायक चित्र समोर येत आहे. परंतु आता नवीन माहिती उघड झाल्याने टेन्शन वाढलं आहे. ब्रिटन आणि यूरोपातील अनेक देशात हाहाकार माजवणारा कोरोनाचा नवा व्हेरिएंट Delta Plus AY 4.2 आता भारतात सापडला आहे.

कोरोनाचा हा नवा व्हेरिएंट डेल्टा व्हेरिएंटच्या तुलनेने अधिक संक्रमित असल्याचं बोललं जात आहे. सीएसआयआर इन्स्टिट्यूट ऑफ जीनोमिक्स अँन्ड इंटिग्रेटिव बायोलॉजी डायरेक्टर डॉ. अनुराग अग्रवाल यांच्या मते, आता AY 4.2 हा फक्त यूकेतून आला आहे. भारतातही याचे काही रुग्ण आढळले आहेत.

कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटवर वैज्ञानिक लक्ष ठेवून आहेत. नवीन व्हेरिएंट लसीपासून मिळालेली इम्युनिटी कमकुवत करतोय का? याबाबत अद्याप काही पुरावे नाहीत. तसेच या संक्रमणामुळे झालेले आजार आणि मृत्यू याचीही कमी माहिती समोर आली आहे.

INSACOG च्या एका वैज्ञानिकाने सांगितले की, लवकरच या व्हेरिएंटची माहिती जाहीर केली जाणार आहे. INSACOG कोरोनाच्या जीनोमिक सीक्वेंसवर काम करणारी लॅबचा एक पार्ट आहे. या संस्थेनुसार, ११ ऑक्टोबरपर्यंत भारतात AY व्हेरिएंटचे ४ हजार ७३७ रुग्ण आढळून आले आहेत.

ब्रिटनमध्ये AY.4.2 व्हेरिएंटमुळे पुन्हा एकदा कोरोना संक्रमण वाढलं आहे. यूकेच्या वैज्ञानिकांनी याला व्हेरिएंट अंडर इन्वेस्टिगेशनमध्ये समावेश केला आहे. आरोग्य अधिकाऱ्यानुसार, AY 4.2 व्हेरिएंटचा ग्रोथ रेट डेल्टा व्हेरिएंटच्या तुलनेत तब्बल १७ टक्के जास्त आहे.

यूकेत २३ ऑक्टोबरला ५० हजारापेक्षा जास्त कोविड रुग्ण आढळले. १७ जुलैनंतर पहिल्यांदाच इतके जास्त रुग्ण आढळले आहेत. यूकेत डेल्टा व्हेरिएंट अद्यापही कहर करतोय परंतु आता यूकेमध्ये AY 4.2 आढळल्यापासून रुग्णसंख्येत मोठ्या वेगाने वाढ होत आहे.

भारतासाठी चिंता का? – यूकेतून येणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणं पुन्हा सुरू झाली आहेत. भारताने यूकेला त्या देशाच्या यादीतून वगळलं आहे ज्याठिकाणाहून भारतात येणाऱ्या प्रवाशांना १४ दिवस क्वारंटाईन आणि कोविड RTPCR चाचणी करणं बंधनकारक आहे.

आता निगेटिव्ह रिपोर्ट आणि लसीकरण प्रमाणपत्र गरजेचे केले आहे. भारतासाठी चिंतेचे बाब हीदेखील आहे की, आतापर्यंत ३० टक्के लोकसंख्येने लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत. तर जगातील अनेक देशात बूस्टर डोस देण्यास सुरुवात झाली आहे. भारतात अजूनही लहान मुलांचं लसीकरण सुरु झालं नाही.

Read in English