जय हिंद! चीननं डोळे वटारले तर भारत चोख उत्तर देणार, LAC वरील 'फ्रंटियर हायवे' बनणार नवी ताकद

By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2023 07:35 PM2023-01-02T19:35:15+5:302023-01-02T19:43:03+5:30

अरुणाचल प्रदेशातील मॅकमोहन रेषेवर बांधला जाणारा 'फ्रंटियर हायवे' देशाची नवी ताकद बनेल. केंद्र सरकारकडून मंजुरी मिळाल्यानंतर या हायवेच्या कामाला वेग आला आहे. अरुणाचल प्रदेशातील तवांगपासून पूर्व कामेंग, पश्चिम सियांगपर्यंत जाणारा हा महामार्ग युद्धकाळात भारताची मोठी ताकद ठरेल. चीनने उद्दामपणा दाखवला किंवा सीमेवर कोणतेही नापाक कृत्य केलं, तर या महामार्गाच्या सहाय्याने काही तासांत लष्कर चीनपर्यंत पोहोचून उत्तर देऊ शकणार आहे. (प्रातनिधीक फोटो)

तवांगपासून सुरू होणाऱ्या या फ्रंटियर हायवेच्या सहा कॉरिडॉरला मंजुरी देण्यात आली आहे. हा महामार्ग सुमारे १८०० किमी लांबीचा असेल, जो आधीपासून अस्तित्वात असलेल्या राज्य मार्ग ट्रान्स अरुणाचल महामार्ग आणि अरुणाचल प्रदेशातील अरुणाचल पूर्व-पश्चिम कॉरिडॉरशी जोडला जाईल. (प्रातनिधीक फोटो)

विशेष म्हणजे हा महामार्ग बीआरओ म्हणजेच बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन आणि एनएचएआय (भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण) संयुक्तपणे बांधणार आहे. या महामार्गाच्या निर्मितीमुळे अरुणाचल प्रदेशची संपूर्ण सीमा सुरक्षित होणार आहे. (प्रातनिधीक फोटो)

४. १८५९ किमी लांब, खर्च ४० हजार कोटी चीनच्या सीमेवर बांधण्यात येत असलेला हा फ्रंटियर हायवे तिबेट आणि म्यानमारलाही कव्हर करणार आहे. त्याची लांबी सुमारे १८५९ किमी आहे. सुमारे पाच वर्षांत हा महामार्ग तयार होईल, असा अंदाज आहे. यासाठीचा खर्च सुमारे ४० हजार कोटी रुपये असेल. (प्रातनिधीक फोटो)

तवांगमधील नाफ्राजवळून सुरू होणारा हा महामार्ग अरुणाचल प्रदेशातील विजय नगरपर्यंत जाईल. या मार्गात पूर्व कामेंग, अप्पर सुबनसिरी, तुटिंग, मैनुका, अप्पर सियांग, दिवांग व्हॅली, किबिटू, डांग, हवाई देखील कव्हर करेल. हा फ्रंटियर हायवे चीनने मेडॉग परगण्यातील बायबांगपर्यंत बांधलेल्या महामार्गाला प्रत्युत्तर देणारा ठरेल. या महामार्गामुळे चीनच्या सीमेपर्यंत लष्करी हालचाली वाढण्यास मदत होणार आहे. (प्रातनिधीक फोटो)

चीन ज्या प्रकारे आपल्या सीमेवर गावं वसवत आहे, त्याचप्रमाणे भारतही आपल्या सीमेवर अधिकाधिक गावं उभारणार आहे. यामुळे वादग्रस्त भागावरील भारताचा दावा आणखी मजबूत होईल. याशिवाय चीनच्या हालचालींवर लक्ष ठेवणेही सोपे होणार आहे. या परिसरातून रस्ते आणि वाहतूक नसल्याने होणारे स्थलांतरही बंद होणार आहे. याठिकाणी शाळा, रुग्णालय, मार्केट आदी उभारण्याचेही नियोजन सुरू आहे. (प्रातनिधीक फोटो)

भारत-चीन सीमेवर महामार्ग बांधल्याने लष्कराला LAC वर गस्त घालता येणार आहे. वेगवेगळ्या ठिकाणी चौक्याही उभारता येतील. त्यामुळे चीनची घुसखोरी रोखता येईल. हा मार्ग भारताची ग्राउंड पोझिशनिंग लाइन बनेल. लढाऊ विमानेही चीनच्या सीमेपर्यंत सहज पोहोचू शकतील. जेणेकरुन वेळ आल्यावर तुम्हाला योग्य उत्तर देता येईल. (प्रातनिधीक फोटो)

LAC वर बांधल्या जाणाऱ्या या फ्रंटियर हायवेचा प्रस्ताव २०१४ मध्ये केंद्र सरकारकडे पाठवण्यात आला होता. त्यावेळी पंतप्रधान कार्यालयानं त्याला प्राथमिक मान्यता देऊन डीपीआर तयार करण्याचे आदेश दिले होते. हे कळताच चीनने आक्षेप घेतला. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते हाँग लेई म्हणाले की, 'सीमेवरील समस्या सोडवण्याआधी, आम्ही अशी अपेक्षा करतो की भारत समस्या गुंतागुंतीचे आणि सीमेवर तणाव निर्माण करणारे काहीही करणार नाही' (प्रातनिधीक फोटो)

अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांनी नुकतेच या प्रकल्पाचे कौतुक केले होते. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेही आभार मानले. हा महामार्ग अरुणाचलच्या विकासाचा मार्ग बनेल, असे पेमा खांडू म्हणाले होते. १९६२ हा इतिहास होता आणि त्याची पुनरावृत्ती होणार नाही असेही ते म्हणाले. १९६२ मध्ये पायाभूत सुविधा खराब होत्या. असे असतानाही आपले सैनिक धैर्याने लढले होते. (प्रातनिधीक फोटो)