ज्या कारचा हप्ता भरण्यासाठी जात होता तिलाच लागली आग, डोळ्यांसमोर जळून झाली खाक

By बाळकृष्ण परब | Updated: February 16, 2021 16:26 IST2021-02-16T16:20:04+5:302021-02-16T16:26:19+5:30

The Burning Car: एका धावत्या कारला अचानक आग लागली. कार ड्रायव्हरने खबरदारी घेत कार रस्त्याच्या कडेला लावली. मात्र या भीषण आगीत ही कार पूर्णपणे जळून खाक झाली.

हरियाणामधील पानीपत जिल्ह्यातील सिवाह गावाजवळ सोमवारी एका धावत्या कारला अचानक आग लागली. कार ड्रायव्हरने खबरदारी घेत कार रस्त्याच्या कडेला लावली. मात्र या भीषण आगीत ही कार पूर्णपणे जळून खाक झाली.

आता आगीची माहिती देऊनही अग्निशमन दल आणि संबंधित पोलीस ठाण्याचे पोलीस वेळीच घटनास्थळी पोहोचले नाही, असा आरोप होत आहे. पानीपत-दिल्ली महामार्गावर रस्त्याचे काम सुरू आहे. कारला आग लागल्यानंतर जवळच असलेल्या एका जेसीबीचालकाने जेसीबी तिथे आणला आणि माती टाकून आग शमवली.

पानिपत जिल्ह्यातील मनाना येथील रहिवासी इसलेले मोहित हे वीज खात्यात कामाला असलेल्या आपल्या भावाची स्विफ्ट डिझायर कार घेऊन कारचा हप्ता भरण्यासाठी जात होते. मात्र ते सिवाह गावाजवळ पोहोचले असताना कारच्या बोनेटमधून अचानक आग येऊ लागली.

प्रसंगावधान राखून त्यांनी कारचा वेग कमी करण्याचा प्रयत्न केला. मात्र कारच्या बोनेटमधून आगाच्या ज्वाळा येऊ लागल्या. मोहित यांनी कार थांबवली आणि बाहेर येत उडी मारून आपला जीव वाचवला. मोहित यांनी सांगितले की, कार जळाल्यानंतरच त्यांनी फायर ब्रिगेडला माहिती दिली. मात्र तीन तास होईपर्यंत फायर ब्रिगेड आणि पोलीस आले नाहीत.

मोहित यांनी सांगितले की, त्यांच्या भावाने दीड वर्षापूर्वी कार खरेदी केली होती. या आगीचे कारण शॉर्ट सर्किट असल्याचे सांगण्यात येत आहे.