बालाकोट एअरस्ट्राइक : भारताने पाकिस्तानमध्ये घुसून असा घेतला होता पुलवामा हल्ल्याचा बदला

By बाळकृष्ण परब | Published: February 26, 2021 09:12 AM2021-02-26T09:12:52+5:302021-02-26T09:24:34+5:30

Balakot Air Strike: आज २६ फेब्रुवारी बरोब्बर दोन वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी भारतीय हवाई दलाने पाकिस्तानच्या हद्दीत घुसून मोठी कारवाई केली होती. (India had avenged the Pulwama attack by infiltrating Pakistan)

आज २६ फेब्रुवारी बरोब्बर दोन वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी भारतीय हवाई दलाने पाकिस्तानच्या हद्दीत घुसून मोठी कारवाई केली होती. भारतीय हवाई दलाने बालाकोट येथील दहशतवाद्यांच्या तळावर मोठा हल्ला करून शेकडो दहशतवाद्यांना कंठस्नान घातले होते.

१४ फेब्रुवारी २०१९ रोजी जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे सीआरपीएफच्या ताफ्यावर एका आत्मघाती दहशतवाद्याने हल्ला केला होता. या हल्ल्यात सीआरपीएफच्या ताफ्यातील एका बसला लक्ष्य करण्यात आले. त्यामध्ये सीआरपीएफच्या ४० हून अधिक जवानांना वीरमरण आले होते.

या हल्ल्यानंतर या भ्याड कृत्यासाठी जबाबदार असलेल्या जैश ए मोहम्मह ही दहशतवादी संघटना आणि पाकिस्तानवर कारवाई करण्यात यावी, यासाठी देशभरातील जनभावना तीव्र होती. त्या पार्श्वभूमीवर पुलवामा हल्ल्याला १२ दिवस होण्यापूर्वीच भारतीय हवाई दलाने मोठी कारवाई केली.

१४ तारखेला हल्ला झाल्यानंतर १५ फेब्रुवारीला संरक्षण विषयक कॅबिनेट समितीची बैठक झाली. यामध्ये पाकिस्तावर प्रत्युत्तरदाखल कारवाई करण्यासाठी काही पर्याय दिले गेले. तसेच सर्जिकल स्ट्राइकऐवजी अन्य काही मार्गाने प्रत्युत्तर देण्याचे निश्चित करण्यात आले. अखेरीच एअर स्ट्राइकच्या पर्यायावर शिक्कामोर्तब झाले.

पंतप्रधान मोदींनी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्याकडे याची जबाबदारी सोपवली. त्यानंतर डोवाल आणि हवाईदल प्रमुख बी.एस. धनोआ यांनी संपूर्ण कारवाईची ब्लू प्रिंट ठरवली. त्यानंतर बालाकोटमध्ये असलेल्या जैश ए मोहम्मदच्या ठिकाणांना लक्ष्य करण्यात आले.

जागा निश्चित झाल्यावर त्याबाबतची माहिती गोळा करण्यास गुप्तहेर संघटनांनी सुरुवात केली. या कारवाईत हवाई दलाने महत्त्वाची भूमिका बजावली असली तरी लष्करही सज्ज होते. विशेषकरून एलओसीच्या संवेदनशील भागात जवान अलर्टवर होते.

एअरस्ट्राइकच्या दोन दिवस आधीच मिराज २००० हजार सोबत AWACS लाही तैनात करण्यात आले. त्यांना ग्वाल्हेरमध्ये ठेवण्यात आले. तसेच आग्रा येथील तळावरही सज्जता होती. २५ फेब्रुवारी रोजी या कारवाईत सहभागी होणाऱ्या लोकांचे फोन बंद करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी, एनएसए अजित डोवाल आणि बीएस धनोआ हे प्रत्येक गोष्टीची माहिती घेत होते.

मंगळवार २६ फेब्रुवारी २०१९ रोजी पहाटे अंदाजे ३ वाजण्याच्या सुमारास भारतीय हवाई दलाची १२ मिराज २००० लढाऊ विमाने नियंत्रण रेषा आणि नंतर पाकिस्तानची हद्द ओलांडून बालाकोटमध्ये दाखल झाली. त्यानंतर सोबत आणलेल्या विध्वंसक बॉम्बचा वापर करत हवाई दलाने जैश ए मोहम्महदचा दहशतवादी तळ उद्ध्वस्त केला.

यानंतर करण्यात आलेल्या दाव्यानुसार मिराज २००० विमानांनी दहशतवाद्यांच्या तळावर सुमारे एक हजार किलोचे बॉम्ब टाकले. ज्यामध्ये सुमारे ३०० दहशतवादी मारले गेले. मात्र हा हल्ला होत असताना पाकिस्तानची एफ १६ विमाने अॅक्टिव्ह झाली. मात्र तोपर्यंत भारतीय हवाई दलाने आपले काम फत्ते केले होते.

या हल्ल्यामध्ये शेकडो पाकिस्तानी दहशतवादी मारले गेल्याचा दावा भारत सरकारकडून करण्यात आला. या हल्ल्याचा पाकिस्तानला जबर धक्का बसला. त्यांनी या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यात त्यांना यश मिळाले नाही.