शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Anil Hegde for RajyaSabha from JDU: 4250 वेळा अटक! आंदोलनाच्या बादशाहला नितीशकुमार राज्यसभेत पाठविणार; हे अनिल हेगडे आहेत तरी कोण?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2022 12:35 PM

1 / 8
यंदाची राज्यसभा निवडणूक अनेक गोष्टींसाठी गाजणार आहे. कारण महाराष्ट्रात महाविकास आघाडी, भाजपासमोर छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज संभाजीराजे यांनी मोठा पेच उभा केला आहे. यातच देशभरातून विविध पक्ष आपल्या आपल्या सोईचा उमेदवार राज्यसभेवर पाठविणार आहेत. असे असताना बिहारच्या नितीशकुमार यांनी फार वेगळा निर्णय घेतला आहे. त्यांनी थेट कर्नाटकच्या एका व्यक्तीची राज्यसभेवर पाठविण्यासाठी निवड केली आहे.
2 / 8
नितिशकुमार यांची जदयू अनिल हेगडेंना राज्यसभेत पाठविणार आहे. हेगडे हे समाजवादी नेते राहिले आहेत. जनआंदोलनादरम्यान हेगडेंना संसद भवन पोलिस ठाण्यात आतापर्यंत 4250 वेळा अटक करण्यात आली आहे. हेगडे यांनी डंकेल प्रस्तावाविरोधात 5150 दिवस सतत आंदोलन केले होते.
3 / 8
अनिल हेगडे हे आर्थिक उदारीकरणाचे विरोधक होते, यामुळे त्यांनी ९० च्या दशकात आर्थिक धोरणांना विरोध केला होता. जेडीयू समता दल होता, तेव्हापासून हेगडे हे जदयूशी जोडलेले आहेत. खासदार किंग महेंद्र यांच्या निधनानंतर रिक्त असलेल्या जदयूच्या जागेवरून हेगडे उमेदवारी दाखल करणार आहेत.
4 / 8
जॉर्ज फर्नांडिस आणि नितीश कुमार यांच्यात संवादाचे काम हेगडे करत होते. चार दशके सक्रीय राजकारणात असूनही हेगडेंनी कधी पक्षाकडे मोठे पद मागितले नव्हते. तरी देखील ते नितीश कुमार यांचे खास होते. हेगडे हे मुळचे कर्नाटकच्या उडुपी जिल्ह्यातील आहेत. त्यांचे वडील वकील होते. कर्नाटकातून त्यांनी सायन्समध्ये पदवी घेतली आहे. हेगडे अविवाहित असून आजही ते जदयूच्या मुख्यालयात राहतात.
5 / 8
इंदिरा गांधी यांनी जेव्हा देशात आणीबाणी जाहीर केली तेव्हा ते राजकारणात आले होते. या आंदोलनांमध्ये ते माजी केंद्रीय मंत्री जॉर्ज फर्नांडिस यांच्या जवळ आले. त्यांच्यासोबत हेगडे यांनी अनेक आंदोलने केली. यानंतर जेव्हा जॉर्ज बिहारला गेले तेव्हा हेगडे देखील त्यांच्यासोबत होते. एवढी वर्षे पक्षासाठी काम केले, परंतू कधीही आपल्यासाठी कोणतेही पद मागितले नाही, अशा या सच्च्या कार्यकर्त्याला मी राज्यसभेवर पाठवित आहे, असे नितीशकुमार म्हणाले होते.
6 / 8
अनिल हेगडे हे अनेक नेत्यांचे जवळचे होते. माजी पंतप्रधान चंद्रशेखर के यांचे देखील ते जवळचे होते. त्यांच्या भारत यात्रेलादेखील हेगडे सोबत असत. यानंतर त्यांन मधु दंडवते, रवी राय, सुरेंद मोहन यांच्यासोबत काम केले होते.
7 / 8
एक वेळ अशी आलेली की जॉर्ज फर्नांडीस आणि नितीश कुमार यांच्यात वाद वाढले होते. एवढे की दोन्ही नेते टोकाची भूमिका घेऊ लागले होते. पक्ष फुटतो की काय अशी अवस्था झाली होती. तेव्हा याच हेगडेंनी जॉर्ज फर्नांडिस आणि नितीशकुमार यांच्यातील वाद शमवला आणि पक्षाला वाचविले होते.
8 / 8
राजकारणात असूनही बडे पद नव्हते, तरी बड्या बड्या नेत्यांच्या गळातील ताईत राहिलेले अनिल हेगडे यांच्याकडे स्वत:चे वाहन नाहीय. राज्यसभेची उमेदवारी जाहीर झाल्यावर अनिल हेगडे यांनी मला कधीही या पदाची आशा नव्हती, अशी प्रतिक्रिया दिली आहे.
टॅग्स :Nitish Kumarनितीश कुमारJanta Dal Unitedजनता दल युनायटेडRajya Sabhaराज्यसभा