संजय दत्तकडून प्रचार, वडिलांचा मद्य व्यवसाय... १६ हजार मतांच्या फरकाने जिंकणारा कोण आहे आर्यन मान?
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2025 18:06 IST2025-09-19T17:59:30+5:302025-09-19T18:06:18+5:30
DUSU Election President Aryan Maan: अखिल भारतीय विद्यार्थी परिषदचे उमेदवार आर्यन मान यांनी २०२५ च्या दिल्ली विद्यापीठ विद्यार्थी संघाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला आहे.

दिल्ली विद्यापीठ विद्यार्थी संघाच्या २०२५ च्या निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत. विद्यापीठातील १.५५ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी मतदान केले. अत्यंत चुरशीच्या निवडणुकीत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदचे आर्यन मान यांनी अध्यक्षपदाची निवडणूक जिंकली.
हरियाणातील बहादूरगड येथील रहिवासी आणि दिल्ली विद्यापीठामधील सक्रिय विद्यार्थी नेते आर्यन मान यांनी यावेळी अनुदानित मेट्रो पास, मोफत वाय-फाय आणि सुधारित क्रीडा सुविधा अशा आश्वासनांवर निवडणूक लढवली.
आर्यन हे प्रसिद्ध व्यावसायिक मान कुटुंबातील आहेत. त्याचे वडील सिकंदर मान हे बेरी-आधारित एडीएस ग्रुपचे कार्यकारी संचालक आहेत. हे कुटुंब लोकप्रिय रॉयल ग्रीन लिकर ब्रँडशी देखील संबंधित आहे.
आर्यनचा मोठा भाऊ विराट मान हा एडीएस ग्रुपचा मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) आणि रोकोब्रँडचा संचालक आहे. डीयूएसयू निवडणूक प्रचारात विराट आर्यनसाठी एक मजबूत आधारस्तंभ राहिला आहे. महागड्या आणि लक्झरी कारमध्ये प्रचार करताना आर्यन मानचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
या निवडणुकीत बॉलीवूड अभिनेता संजय दत्त देखील आर्यन मानसाठी प्रचार करताना दिसला. आर्यन मानने एक व्हिडिओ शेअर केला ज्यामध्ये संजय दत्त त्याला "पुतण्या" म्हणत असून विद्यार्थ्यांना त्याला मतदान करण्याचे आवाहन करतो. सोनू सूदने देखील आर्यनला मतदान करण्याचे आवाहन करणारा एक व्हिडिओ शेअर केला आहे.
आर्यन मान सध्या दिल्ली विद्यापीठातून ग्रंथालय विज्ञान विषयात पदव्युत्तर शिक्षण घेत आहेत. गेल्या काही वर्षांपासून ते अभाविपच्या नेतृत्वाखालील विद्यार्थी चळवळींमध्ये सक्रियपणे सहभागी आहेत.
आर्यन मान हे फुटबॉल खेळाडू देखील आहेत. या निवडणुकीसाठी १८ सप्टेंबर रोजी मतदान पार पडल्यानंतर गुरुवारी मतमोजणी झाली मतमोजणीला नॉर्थ कॅम्पसमधील विद्यापीठ क्रीडा स्टेडियमच्या हॉलमध्ये सुरुवात झाली. अत्यंत स्पर्धात्मक झालेल्या निवडणुकीत, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या आर्यन मान यांनी अध्यक्षपदाची निवडणूक जिंकली.