कुटुंबाला उपचारखर्च नाही परवडला; रुग्णालयानं पोट न शिवताच चिमुकलीला बाहेर काढलं; उपचाराअभावी मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2021 05:29 PM2021-03-06T17:29:45+5:302021-03-06T17:40:28+5:30

प्रयागराजमधील धक्कादायक घटना; सोशल मीडियावर संतापाची लाट; रुग्णालयावर कारवाई करण्याची मागणी

आपण डॉक्टरांना देव मानतो. कारण अनेकदा तेच माणसाच्या मृत्यूच्या दाढेतून परत आणतात. त्यामुळे डॉक्टरांना देवदूत म्हटल्यास ते चुकीचं ठरणार नाही.

अनेकदा मरणासन्न व्यक्तीला मृत्यूच्या जबड्यातून सुखरूप परत आणणारे डॉक्टरच कधी कधी एखाद्या व्यक्तीला मरणाच्या दारात ढकलून देतात. उत्तर प्रदेशातल्या प्रयागराजमध्ये अशीच घटना घडली आहे. त्यामुळे माणुसकीला काळीमा फासला गेला आहे.

उपचाराचा पूर्ण खर्च देऊ न शकल्यानं खासगी रुग्णालयातल्या डॉक्टरांनी एका चिमुरडीची शस्त्रक्रिया अर्धवट सोडली. उपचारांसाठी आवश्यक असलेली रक्कम गोळा करण्यात अपयश आल्यानं डॉक्टरांनी ३ वर्षांच्या चिमुकलीला ऑपरेशन टेबलवरून त्याच अवस्थेत तिच्या कुटुंबीयांकडे सुपूर्द केलं.

धक्कादायक बाब म्हणजे डॉक्टरांनी चिमुकलीचं पोटदेखील शिवलं नाही. उपचार न मिळाल्यानं मुलीची प्रकृती बिघडत गेली आणि तिनं प्राण सोडला.

प्रयागराजमधल्या करेली भागात राहणाऱ्या ब्रह्मदीन मिश्रा यांच्या तीन वर्षीय मुलीला पोटाची समस्या होती. तिला उपचारांसाठी प्रयागराजमध्ये धूमनगंजमधील रावतपूर येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

काही दिवसांनंतर मुलीच्या पोटावर एक शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर आणखी एक शस्त्रक्रिया केली गेली. रुग्णालय प्रशासनानं यासाठी दीड लाख रुपये घेतले.

दीड लाख घेतल्यानंतर प्रशासनानं आणखी पाच लाख रुपयांची मागणी केल्याचं मुलीच्या वडिलांनी सांगितलं. पाच लाख रुपये देण्यात अपयशी ठरल्यानंतर रुग्णालय प्रशासनानं मुलीसह तिच्या कुटुंबाला बाहेर काढलं.

पाच लाख रुपये जमा करण्यात अपयशी ठरल्यानं रुग्णालयाला आम्हाला बाहेर काढलं. त्यांनी शस्त्रक्रियेनंतर माझ्या मुलीचं पोटदेखील शिवलं नव्हतं. त्याच अवस्थेत त्यांनी तिला आमच्याकडे सोपवलं, अशी व्यथा मुलीच्या वडिलांनी मांडली.

मुलीचे वडील तिला घेऊन अनेक रुग्णालयांमध्ये गेले. मात्र एकाही रुग्णालयानं उपचार करण्याची तयारी दाखवली नाही. तुमच्या मुलीची स्थिती गंभीर आहे. ती वाचू शकणार नाही, अशी उत्तरं त्यांना सगळ्यांनी दिली.

एकाही रुग्णालयानं दाखल करून न घेतल्यानं अखेर मुलीनं प्राण सोडला. वेळेत उपचार न मिळाल्यानं मुलगी दगावली. तीन वर्षांची लेक गमावल्यानं वडिलांसह संपूर्ण कुटुंबावर शोककळा पसरली आहे. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियानं रुग्णालयाला धारेवर धरलं आहे.

टॅग्स :डॉक्टरdoctor