१५ तास बोलणं, दिवसाला १०० कॉल्स..; मनीष आणि ज्योतीच्या चॅटमधून धक्कादायक खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2023 01:24 PM2023-07-13T13:24:19+5:302023-07-13T13:27:10+5:30

SDM ज्योती मौर्या आणि पती आलोक मौर्या यांच्यातील वाद सध्या चर्चेचा विषय बनला आहे. या दोघांच्या वादात आता होमगार्ड कमांडेंट मनीष दुबेचं नाव समोर आले आहे. आलोकने मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून मनीष दुबेचे पत्नी ज्योती मौर्यासोबत अनैतिक संबध आहेत त्याचसोबत इतर महिलांसोबतही त्याचे संबंध आहेत असा दावा केला आहे.

आलोक मौर्याने मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात मनीष दुबेचे कॉल डिटेल्स तपासा, मनीष आणि ज्योती यांच्यात २४ तासांत जवळपास १५ तास बोलणे व्हायचे. दिवसाला तब्बल १०० वेळा कॉल करायचे. या दोघांनी माझी हत्या करून लग्न करण्याचे ठरवले होते आणि त्याचसोबत अश्लिल संभाषणही असल्याचा उल्लेख केला आहे.

जेव्हा मला माझी पत्नी ज्योती मौर्या आणि होमगार्ड कमांडेंट मनीष दुबे यांच्यातील संबंधांबाबत कळाले तेव्हा मी ज्योतीचे कॉल डिटेल्स आणि व्हॉट्सअप चेक केले. त्यात मनीष आणि ज्योती एकमेकांसोबत दिवसरात्र बोलत होते. व्हॉईस-व्हिडिओ कॉल कामाच्या वेळेतही सुरू होते. जवळपास २ वर्षापासून दोघांचे संबंध आहेत असं पती आलोकने म्हटलं.

मनीष आणि ज्योती हे दोघे लग्न करण्याचं बोलत होते आणि त्यांच्या लग्नात मी अडथळा येत असल्याने माझी हत्या करण्याचा डावही त्यांचा होता. मनीष दुबे हा विवाहित आहे परंतु त्याचे अनेक मुलींसोबत संबंध आहेत. इतकेच नाही तर मनीषचे त्यांच्या बायकोसोबत वाद असून कौटुंबिक न्यायालयात ही बाब न्यायप्रविष्ट आहे.

मनीषला ज्योतीसोबत मिळून माझी हत्या करायची होती. मनीषबाबत यापूर्वीही डीजीपींकडे तक्रारी आल्या आहेत. ज्यात त्याच्यावर गंभीर आरोप आहेत. आलोकला २ मुली आहेत. २०१० मध्ये या दोघांचे लग्न झाले होते. लग्नाला १३ वर्ष झाल्यानंतर ही परिस्थिती का आली हे कळत नाही. हे कधीही माझा जीव घेऊ शकतात. मनीष दुबे हा माझं कुटुंब उद्ध्वस्त करायला जबाबदार आहे असं आलोकने आरोप केला.

ज्योतीला घटस्फोट दे नाहीतर तुला मारून टाकेन अशी धमकी मनीष दुबेने आलोकला दिल्याचा दावा आहे. मनीष आणि ज्योती हे दोघे विवाहित असून उच्च पदावर कार्यरत आहेत. जनतेची सेवा करण्याच्या वेळेत ते काय करत आहेत हे लोकांना कळायला हवे असं आलोकने म्हटलं.

ज्योतीने घटस्फोटासाठी कौटुंबिक न्यायालयात अर्ज दिला आहे. मनीष आणि ज्योती दोघेही माझ्यावर दबाव टाकत आहेत. नोटीस मिळाल्यानंतर मी घटस्फोटावर सही करावी आणि अन्यथा तुला जिवंत ठेवणार नाही असं धमकावल्याने मी इथून तिथून पळत आहे असंही आलोकने सांगितले.

ज्योतीचा पती आलोकला जीवे मारण्याची धमकी दिल्याबद्दल चौकशीअंती मनीषला निलंबित करण्याची शिफारस करण्यात आली आहे. आलोकने ज्योती आणि मनीषविरोधात हत्येचा कट आखत असल्याची तक्रार होमगार्ड संघटनेत केली होती.

तक्रारीसोबत अनेक व्हॉट्सॲप चॅट, कॉल रेकॉर्ड आदी पुरावे म्हणून सादर केले होते. डीजी होमगार्ड, बीके मौर्य यांनी पुढील कारवाईसाठी या प्रकरणाचा तपास अहवाल आपल्या शिफारशींसह राज्य सरकारला पाठवला आहे. विभागाची प्रतिष्ठा मलीन केल्याचा ठपकाही मनीषवर ठेवण्यात आल्याचे समजते

चतुर्श श्रेणी कर्मचारी असूनही कर्ज काढून पत्नीला शिकवले, पण अधिकारी बनताच तिचे मनीष दुबेशी अफेअर सुरू झाले आणि मला सोडून गेली, असा आरोप करत आलोकने सोशल मीडियावर काही स्क्रीनशॉट शेअर केल्यापासून या प्रकरणाची सर्वत्र चर्चा आहे. ज्योतीनेही फसवून लग्न व हुंड्याचा आरोप आलोकवर केला आहे.