शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

राज्य सरकारने लावलेली, जरांगेंनी मान्य केलेली सगेसोयरेंची व्याख्या काय? एकदा जाणून घ्या शब्दांचा खेळ

By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2024 4:17 PM

1 / 12
राज्य सरकारने मराठा आंदोलकांच्या सर्वच्या सर्व मागण्या मान्य केल्या आहेत. परंतु यामध्ये सरकारने शब्दांचा खेळ केल्याचे ओबीसी नेत्यांसह ज्येष्ठ कायदेतज्ञांचे म्हणणे आहे. यापैकीच एक म्हणजे कुणबी नोंद सापडलेल्यांच्या सग्या सोयऱ्यांनाही आरक्षणासाठीचे जात प्रमाणपत्र देण्याची मागणी आहे. हे सगेसोयरे म्हणजे कोण? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
2 / 12
सगेसोयरे ही अट राज्य सरकारने मान्य केली आहे. परंतु त्याला कायदेशीर आधार आहे का? असा सवाल ओबीसी नेते तायवाडे, भुजबळ यांनी केला आहे. आरक्षण हे जन्माने मिळते. प्रतिज्ञापत्राने नाही, असेही भुजबळ म्हणाले आहेत. यामुळे सरकारने सग्यासोयऱ्यांची नेमकी व्याख्या काय केलीय, हे देखील पाहणे गरजेचे राहणार आहे.
3 / 12
सग्यासोयऱ्यांसाठी मराठा समाजाला सूट दिली तर ती सर्व समाजांना लागू आहे का? मराठा समाजालाच कशासाठी असाही प्रश्न हे विरोधक विचारत आहेत. यामुळे हा मुद्दा देखील कायदेशीर पेचात अडकण्याची शक्यता आहे. ओबीसी नेते उद्या या मुद्द्यांवर बैठक घेऊन पुढे कसा लढा द्यायचा हे ठरविणार आहेत.
4 / 12
मनोज जरांगे पाटलांची सुरुवातीला सरसकट आरक्षणाची मागणी होती. परंतु नंतर सग्यासोयऱ्यांना आरक्षण देण्याची मागणी जोर धरू लागली. सरसकट कुणबी आरक्षणाला नारायण राणेंसारख्या मराठा नेत्यांनी विरोध केला होता. कुणबी आणि मराठा हे वेगवेगळे आहेत. यामुळे आपण कुणबी दाखला घेणार नाही, असे राणेंनी म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्याला जरांगेंकडून विरोधही झाला होता.
5 / 12
अनेक मराठा समाजाचे नेते, लोक आपण कुणबी नसल्याचे म्हणत आहेत. याचसोबत मराठा आणि कुणबी यांच्यात विवाह होत नाहीत, असेही काही लोकांचे म्हणणे आहे. यामुळे सध्याच्या सरकारने दिलेल्या आरक्षणाच्या आश्वासनात सरसकट मराठा समाज येणार नाही हे जवळपास निश्चित होत आहे. यामुळे काही प्रमाणावर का होईना मराठा समाजाचे लोक आरक्षणाच्या बाहेर राहणार आहेत.
6 / 12
सगेसोयरे या वर्गातील नातेवाईक म्हणजे अर्जदाराचे वडील, आजोबा, पंजोबा व त्यापूर्वीचे पिढ्यांमध्ये जातीमधील झालेल्या लग्न नातेसंबंधातून पूर्वी निर्माण झालेले नातेवाईक असा असेल. यामध्ये सजातीय विवाहातून जे नातेसंबंध तयार झाले आहेत, त्यांचा समावेश असेल.
7 / 12
कुणबी नोंद मिळालेल्या नागरिकांच्या रक्तनात्यातील काका, पुतणे, भाव-भावकीतील असा नातेवाईक तथा पितृसत्ताक पध्दतीतील सगेसोयरे ते तसे नातेवाईक अथवा सगेसोयरे आहेत, अर्जदाराने असे शपथपत्र पुरावा म्हणून उपलब्ध करून दिल्यास तथा गृहचौकशी करून नोंद मिळालेल्या त्यांच्या रक्ताच्या सग्यासोयसांना कुणबी जात प्रमाणपत्र तपासणी करून तात्काळ देण्यात येईल.
8 / 12
कुणबी जातीची नोंद मिळालेल्या नागरिकांच्या रक्त नातेसंबंधातील पुरावा आढळल्यास नोंद मिळालेल्या नागरिकांच्या रक्तनाते संबंधातील सदस्यांचे शपथपत्र महाराष्ट्र अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागासप्रवर्ग (जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्याच्या पडताळणीचे विनियमन) नियम, 2012 नुसार घेऊन त्यांनाही तपासून तात्काळ कुणबी जात प्रमाणपत्र देता येतील.
9 / 12
ज्या मराठा बांधवांची कुणबी नोंदी सापडल्या आहेत, त्याच नोंदीच्या आधारानुसार त्यांच्या गणगोतातील सर्व सग्यासोयऱ्यांना वरील बांधवांच्याच नोदीचा आधार घेऊनच सर्व सग्यासोयऱ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र देण्यात येतील.
10 / 12
ज्या मराठा व्यक्तींची कुणबी नोंदी सापडली आहे त्यांचे सगेसोयरे म्हणजे, मराठा समाजात परंपरेनुसार गणगोतांशी लग्नाच्या सोयरिकी होतात ते सर्व सगेसोयरे, मात्र सगेसोयरे यांचा सर्व साधारणपणे अर्थ पितृसत्ताक पध्दतीचे नातेवाईक असा घेतला जाईल तथा लग्नाच्या ज्या सोयरिकी होतात त्या गणगोतात आहेत किंवा सजातीय आहेत याचा पुरावा उपलब्ध करून दिल्यास गृहचौकशी करून त्यांनाही कुणबी प्रमाणपत्र देण्यात येईल.
11 / 12
कुणबी नोंद मिळालेल्या नागरिकांच्या राज्याअंतर्गत सजातीय झालेल्या विवाहातून तयार झालेल्या नातेसंबंधातील सग्यासोयऱ्यांना जात प्रमाणपत्र मिळणेसाठी अर्ज सादर करता येईल, मात्र या तरतुदीचा दुरुपयोग करता येऊ नये, म्हणून सदर विवाह सजातीय आहे, यासंदर्भातील पुरावा देणे तथा गृह चौकशीत तशा प्रकारचा पुरावा मिळणे, हे देखील आवश्यक असेल व याची पुर्तता झाल्यास त्यांनाही कुणबी जातप्रमाणपत्र देता येतील.
12 / 12
सदरची अधिसूचना अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास वर्ग व विशेष मागास प्रवर्गासाठी लागू राहील. सगेसोयरे माहिती उपलब्ध असल्यास, पडताळणी समितीच्या निर्णयाची साक्षांकित प्रत आणि/किंवा अर्जदाराच्या रक्तसंबंधातील वडिलांचे किंवा सख्ख्या चुलत्याचे किंवा वडिलांकडील रक्तसंबंधातील इतर कोणत्याही नातेवाईकांचे किंवा सगेसोयरे यांचे वैधता प्रमाणपत्र ग्राह्य धरले जाणार आहे.
टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणMaratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाOBC Reservationओबीसी आरक्षणManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलEknath Shindeएकनाथ शिंदे