दबा... झडप... खेळ खल्लास...; 'अवनी'नंतर यवतमाळची नवी वाघीण चर्चेत!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2020 06:25 PM2020-02-28T18:25:51+5:302020-02-28T18:30:50+5:30

साधारण दीड वर्षांपूर्वी यवतमाळमधील अवनी वाघीण राज्यभरात चर्चेचा विषय ठरली होती. जंगलात गेलेल्या १३ जणांना या वाघिणीनं ठार केलं होतं आणि ती नरभक्षक झाल्याच्या बातमीनं २२ गावांतील गावकऱ्यांनी तिचा धसका घेतला होता.

या टी-१ वाघिणीला ठार मारण्याची परवानगी सुप्रीम कोर्टाने दिली होती. त्यानंतर वनखात्याने शार्प शूटरच्या मदतीनं यवतमाळमधील बोराटीच्या जंगलात तिची 'शिकार' केली होती.

त्यावरून बरंच वादळ निर्माण झालं होतं. वन्यजीवप्रेमी संघटनांनी या 'हत्ये'चा तीव्र निषेध केला होता आणि या प्रकाराच्या चौकशीची मागणी केली होती.

सध्याचे पर्यटन आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनीही त्यावेळी वनविभागाचं नाव बदलून शिकारी विभाग ठेवा, अशा शब्दात निषेध नोंदवला होता. विरोधकही आक्रमक झाले होते. पण हे प्रकरण हळूहळू शांत झालं.

हे प्रकरण आठवण्याचं कारण म्हणजे, यवतमाळमधीलच एक वाघीण पुन्हा प्रकाशझोतात आली आहे, ती तिनं केलेल्या बैलाच्या शिकारीमुळे.

टिपेश्वर अभयारण्याच्या सीमेवर वसलेल्या सुन्ना गावात चार बछड्यांसोबत आलेली ही वाघीण एका शेतात शिरली आणि तिनं बैलावर झडप घातली. या हल्ल्यात बैल ठार झाला.

अचानक झालेला हा हल्ला पाहून आजूबाजूला काम करणारे शेतमूजर पार घाबरले. त्याचवेळी, काही जणांनी या शिकारीचे फोटो आपल्या कॅमेऱ्यात टिपले

बुधवारी बैलाची शिकार केल्यानंतर गुरुवारी पहाटे ही वाघीण पुन्हा शेतात शिरली. ती सकाळी ७ वाजेपर्यंत शेतातच ठाण मांडून होती. तेव्हाही तिच्यासोबत तिचे चार बछडे होते.