कोकणात भाजपाची खेळी, उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का; शिंदे गटाचीही कोंडी होणार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2025 15:17 IST
1 / 10मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या दावोस इथं दौऱ्यावर गेलेत. राज्यात परकीय गुंतवणूक आणण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत परंतु ते इथं नसताना पालकमंत्रिपदावरून महायुतीतील वाद चव्हाट्यावर आले आहेत. या वादात सर्वाधिक चर्चा होतेय ती रायगड जिल्ह्याची, कारण रायगडच्या पालकमंत्रिपदावरून अजित पवारांची राष्ट्रवादी आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना आमनेसामने आली आहे.2 / 10रायगडच्या पालकमंत्री म्हणून राष्ट्रवादीच्या मंत्री आदिती तटकरे यांची नियुक्ती करण्यात आली. परंतु या नियुक्तीला शिंदेंच्या शिवसेनेकडून टोकाचा विरोध झाला. मंत्री भरत गोगावले समर्थकांनीही तर रस्त्यावर उतरून टायर जाळण्याचे प्रकार केले. आमचा राजकीय अस्त झाला तरी चालेल पण तटकरे कुटुंबाला स्वीकारणार नाही अशी भूमिका शिंदेंच्या आमदारांनी मांडली. 3 / 10रायगडात एकीकडे एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी यांच्यातील वाद उफाळून आलेला असतानाही दुसरीकडे भारतीय जनता पार्टीनेही याठिकाणी पक्ष संघटना वाढीवर भर देत उद्धव ठाकरे गटाला धक्का देण्याची तयारी केली आहे. भाजपाच्या या खेळीने ठाकरे गटच नाही तर शिंदे गटाचीही कोंडी होण्याची शक्यता आहे. 4 / 10रायगडमधील ठाकरे गटाच्या नेत्या स्नेहल जगताप या भाजपाच्या वाटेवर असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. महाडच्या माजी नगराध्यक्ष स्नेहल जगताप समर्थकांसह लवकरच भाजपात प्रवेश करतील असं बोललं जाते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावरून आल्यानंतर त्यांच्याच उपस्थितीत स्नेहल जगताप यांचा पक्ष प्रवेश होणार असं सांगण्यात येते. 5 / 10स्नेहल जगताप या काँग्रेसच्या माजी आमदार माणिकराव जगताप यांच्या कन्या असून नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महाड मतदारसंघातून त्यांनी ठाकरेंच्या शिवसेनेकडून निवडणूक लढवली होती. २ वर्षापूर्वी स्नेहल जगताप यांनी ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. महाड नगरपालिकेचे नगराध्यक्षपद त्यांनी सांभाळले होते.6 / 10भरत गोगावले यांनी ठाकरेंची साथ सोडल्यानंतर महाड मतदारसंघात ठाकरेंच्या शिवसेनेला भगदाड पडलं. अशावेळी स्नेहल जगताप यांच्या रुपाने ठाकरे गटाला नेतृत्वाची संधी मिळाली. त्याशिवाय भरत गोगावले यांच्याविरोधात सक्षम उमेदवार सापडला आणि मतदारसंघात ठाकरे गटाला नवा चेहरा मिळाला.7 / 10विधानसभा निवडणुकीत स्नेहल जगताप यांचा पराभव झाला. त्यात राज्यात महायुतीचं सरकार आले. पुढील राजकीय पुनर्वसन आणि कार्यकर्त्यांची कामे करण्यासाठी सत्तेत जायला हवं अशी मागणी कार्यकर्त्यांकडून होत होती. त्यावर अखेर स्नेहल जगताप यांनी भाजपात जाण्याचा निर्णय घेतल्याचं सांगितले जाते.8 / 10२०२९ च्या निवडणुकीसाठी शतप्रतिशत भाजपा करण्याचा नेतृत्वाचा प्रयत्न आहे. त्यासाठी संघटन वाढीवर भाजपाने भर दिला आहे. सध्याच्या घडीला दक्षिण रायगडमध्ये भाजपाला हवे तसे पाय पसरता आले नाहीत. उत्तर रायगडात भाजपाचे ३ आमदार आहेत. त्यामुळे स्नेहल जगताप यांच्या रुपाने भाजपाला नवीन चेहरा मिळू शकतो. 9 / 10त्याशिवाय एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे नेते आणि मंत्री भरत गोगावले यांनाही कुठेतरी शह देता येईल या दृष्टीने भाजपाचा प्रयत्न दिसत आहे. माणिकराव जगताप यांच्या विचारांचा मोठा मतदार रायगडमध्ये आहे. घरातून राजकीय वारसा लाभला असल्याने स्नेहल जगताप यांचा प्रवेश भाजपासाठी फायदेशीर ठरण्याची शक्यता आहे. 10 / 10स्नेहल जगताप यांनी राजकारणाच्या सुरुवातीला काँग्रेसमध्ये विविध पदांवर काम केले आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सचिव म्हणून देखील त्यांनी काम पाहिलं आहे. त्याशिवाय महाडच्या नगराध्यक्षपदाची जबाबदारी त्यांना मिळाली होती. त्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेत त्यांना गोगावलेंविरोधात निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं होते. त्यांचा २७ हजार मतांनी पराभव झाला.