पंतप्रधान मोदींनी घेतले श्रीरामाचे दर्शन; काळाराम मंदिरात राबवली स्वच्छता मोहिम...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2024 03:50 PM2024-01-12T15:50:46+5:302024-01-12T15:57:34+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नाशिकच्या प्रसिद्ध काळाराम मंदिरात दर्शन घेतले.

PM Narendra Modi Nashik: अयोध्येत श्रीराम मंदिराच्या उद्घाटनाची जय्यत तयारी सुरू आहे. तत्पुर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नाशिकचा दौरा केला. यावेळी त्यांनी गोदावरीच्या काठावर असलेल्या श्री काळाराम मंदिरात प्रभू रामाचे दर्शन घेतले.

काळाराम मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे काळाराम मंदिरात मुख्य दरवाजाने दाखल झाले. येवल्याच्या पैठणीचा शेला देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. त्यांनी सर्वप्रथम हनुमानाचे दर्शन घेतले. त्यानंतर मोदींच्या हस्ते प्रभू श्रीरामाची विधिवत पूजा आणि महाआरती करण्यात आली.

पंतप्रधान मोदींनी काळाराम मंदिरासमोरील स्वामी विवेकानंदांच्या पुतळ्याला अभिवादन केले. स्वच्छतेचे महत्त्व अधोरेखित करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंदिर परिसरात पोछा मारुन स्वच्छता मोहीमही राबवली. राम मंदिर प्राणप्रतिष्ठा (22 जानेवारी) पर्यंत अशाच पद्धतीने मंदिरे स्वच्छ करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

मंदिरात स्वच्छता मोहीम राबवल्यानंतर पंतप्रधान मोदींनी नाशिकमध्ये जनतेला संबोधित केले. यावेळी ते म्हणाले की, 22 जानेवारीपर्यंत आपण सर्वांनी देशातील तीर्थक्षेत्रे, मंदिरे स्वच्छ करून स्वच्छता अभियान राबवावे. आज मला काळाराम मंदिराची स्वच्छता करण्याचे सौभाग्य मिळाले आहे, ही माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे.

काळाराम मंदिरात दर्शन घेतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नाशिक इथे 27व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमात PM नरेंद्र मोदी म्हणाले की, माझा सर्वात जास्त विश्वास भारताच्या युवा पिढीवर आहे. 'मेरा युवा भारत' संघटनेच्या स्थापनेनंतर हा पहिला युवा दिन आहे.

दरम्यान, नाशिकला ऐतिहासिक वारसा लाभला आहे. रामायणाशी निगडित ठिकाणांपैकी पंचवटी सर्वात विशेष आणि महत्त्वाचे स्थान मानले जाते. रामायणातील अनेक महत्त्वपूर्ण घटना येथे घडल्या आहेत. प्रभू श्रीराम, माता सीता आणि लक्ष्मण यांनी पंचवटी प्रदेशात असलेल्या दंडकारण्य जंगलात अनेक वर्षे घालवली आहेत.

श्री काळाराम मंदिर हे महाराष्ट्रातील नाशिक शहरातील पंचवटी परिसरात असलेले एक जुने हिंदू मंदिर आहे. काळाराम मंदिर हे भगवान रामाला समर्पित आहे. येथे भगवान रामाची काळ्या पाषाणातील मूर्ती विराजमान आहे. हे मंदिर अतिशय जुने असून, देशभरातून येथे भाविक दर्शनासाठी येतात.

या राम मंदिराबद्दल असे म्हटले जाते की, सरदार रंगारू ओढेकर नावाच्या व्यक्तीच्या स्वप्नात प्रभू राम आले होते. यानंतर त्यांना गोदावरी नदीत काळ्या रंगाची मूर्ती तरंगताना दिसली. ती आणून त्यांनी मंदिरात बसवली. हे मंदिर 1782 मध्ये बांधले गेले. पूर्वी येथे लाकडापासून बनवलेले मंदिर होते.