शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

पवारांनी मलिकांची गुगली टाकली, फडणवीसांनी चौकार ठोकला, पण अजित पवार अडकले...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 09, 2023 2:33 PM

1 / 9
महाराष्ट्राच्या राजकारणात नवाब मलिकांवरून महायुतीत वाद सुरु झाले आहेत. अजित पवार गटाला मलिक हवेत, परंतू भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेने विरोध केल्याने राजकारण सुरु झाले आहे. डोईजड ठरत असलेल्या अजित पवार गटाला नामोहरम करण्याची संधी एकाचवेळी शिंदे आणि शरद पवारांना मिळाली आहे. नवाब मलिक यांच्यावर देशद्रोहाचे आरोप करणाऱ्या भाजपाने खणखणीत चौकार ठोकला आहे. परंतू, यात अजित पवारांना हे राजकारण महागात पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
2 / 9
मलिक हे शरद पवारांचे जवळचे मानले जातात. ते १७ महिने तुरुंगात होते. आरोग्याच्या तक्रारीवर त्यांना जामिन मिळाला आहे. असे असताना विधानसभा अधिवेशनात मलिक आले आणि थेट सत्ताधारी राष्ट्रवादीच्या बाकावर जाऊन बसले. यामुळे मलिक यांच्याविरोधात रान पेटविणाऱ्या भाजपाला ते पटले नाही. तसेच विरोधकांनी घेरल्याने हा प्रकार भलताच महागात पडण्याची कल्पना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना आल्याने त्यांनी त्याच सायंकाळी वेळ न दवडता अजित पवारांना खुले पत्र लिहिले होते.
3 / 9
याला दुसऱ्या दिवशी शिंदे गटाने देखील पाठिंबा दिला होता. फडणवीसांच्या आक्षेपावर अजित पवार गटातील अनेक नेत्यांनी त्यांवर नाराजी व्यक्त केली. हा प्रश्न उघड उघड न मांडता अंतर्गत चर्चेतून सोडविता आला असता असा टोन या नेत्यांचा होता.
4 / 9
यामागे शरद पवारांचे राजकारण असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. मलिक हे पवारांचे खास आहेत, परंतू आता ते अजित पवारांच्या गटात बसले आहेत. मलिकांच्या रुपात गुगली टाकून शरद पवारांनी अजित पवार आणि भाजपासमोर नवे संकट निर्माण केल्याचे बोलले जात आहे.
5 / 9
फडणवीसांनी हा गेम पुरता ओळखल्याचे दिसत आहे. विधानसभेत विरोधकांनी घेरताच फडणवीसांनी तातडीने अजित पवारांना पत्र लिहिले आहे. भाजपसमोर दोन आव्हाने आहेत, २०२४ पर्यंत सरकारचा कार्यकाळ पूर्ण करायचा आहे आणि लोकसभेतही जास्त जागा जिंकायच्या आहेत. परंतू, मलिकांना अजित पवार गटात घेतले म्हणजे त्यांच्या मांडीला मांडी लावून बसल्यासारखे आहे. याचा फटका बसू शकतो, हे हेरून फडणवीसांनी तो चेंडू अजित पवारांच्या कोर्टात टोलविला आहे.
6 / 9
भाजपाला देशभरात वॉशिंग मशीन म्हटले जात आहे. तसेच शरद पवारांच्या राष्ट्रवादीने भाजपाला भ्रष्ट जुमला पार्टी असे संबोधले आहे. यामुळे मलिकांवर आपणच देशद्रोहाचे आरोप केले, तुरुंगात टाकले आता जामिनावर बाहेर आल्यावर कसे काय सोबत घ्यायचे असा प्रश्न भाजप नेतृत्वाला पडला आहे.
7 / 9
यामुळे फडणवीसांनी पक्षाची प्रतिमा आणखी मलिन होण्यापासून वाचविण्यासाठी व आपल्या मतदारांमध्ये चुकीचा संदेश जाण्यापासून रोखण्यासाठी आधीच खुले पत्र लिहून वाट मोकळी करण्याचा प्रयत्न केला आहे. भाजपातील एक गट मलिक यांच्या सत्ताधाऱ्यांत बसण्यावरून नाराज आहे. यामुळे पक्षाला नुकसान होऊ शकते, असे त्यांचे मत आहे.
8 / 9
भाजपाने आपले हात वर केले असताना इकडे अजित पवारांना मलिकांना सोडताही येत नाहीय आणइ धरताही येत नाहीय अशी अवस्था झाली आहे. शरद पवारांविरोधात बंड केल्यानंतर अजितदादांना अधिकाधिक आमदाराची गरज आहे. त्यांच्या दाव्यानुसार ४१ आमदार त्यांच्यासोबत आहेत. परंतू, त्यांच्या बैठकीला ३५ आमदार गेले होते.
9 / 9
दुसरीकडे शरद पवारांनी आपल्या पक्षात फूट पडली नसल्याचा दावा केला आहे. यामुळे अजित पवारांना एकेक आमदार महत्वाचा आहे. त्यातच ९ जणांनाच मंत्रिपद मिळाल्याने उर्वरित नाराज असल्याचे सांगितले जात आहे. या आमदारांना पुढच्या सहा-आठ महिन्यांत निवडणुकीला सामोरे जायचे आहे. त्यापूर्वी अपात्रतेची सुनावणी देखील प्रलंबित आहे. त्याचाही निकाल दोन महिन्यांत येणार आहे. यामुळे फडणवीसांच्या चौकारावर अजित पवार मात्र कचाट्यात अडकले आहेत.
टॅग्स :nawab malikनवाब मलिकSharad Pawarशरद पवारAjit Pawarअजित पवारDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMaharashtra Political Crisisमहाराष्ट्रातील सत्तासंघर्ष