महायुतीला १३८ जागांवर ५० टक्क्यांहून अधिक मतं, १६ ठिकाणी लाखांचं मताधिक्य, अवाक् करणारी आकडेवारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2024 10:11 IST
1 / 10महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालांनी भल्याभल्या राजकीय अभ्यासकांना अवाक् केलं आहे. राज्यातील सत्ताधारी महायुतीने २८८ पैकी २३५ जागांवर विजय मिळवलाय. तर विरोधी महाविकास आघाडीला केवळ ४९ जागांवर समाधान मानावं लागलंय. आता या निकालाचं विश्लेषण करणारी वेगवेगळी आकडेवारी समोर येत आहे. 2 / 10समोर आलेल्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात महायुतीला ४९.६ टक्के मतं मिळाली आहेत. तर महाविकास आघाडीला केवळ ३५.३ टक्के मतं मिळाल्याचं समोर आलं आहे. त्यामध्ये महायुतीमधील घटक पक्षांना १३८ ठिकाणी ५० टक्क्यांहून अधिक मतं मिळाल्याचं आणि १६ ठिकाणी लाखभराचं मताधिक्य मिळाल्याचं समोर आलं आहे. 3 / 10महाराष्ट्रातील विधानसभेच्या २८८ जागांपैकी १५४ जागांवर विजयी उमेदवारांनी ५० टक्क्यांहून अधिक मतं मिळवली. त्यात महायुतीने १३८ जागांवर ५० टक्क्यांहून अधिक मतं मिळवली. तर महाविकास आघाडीला केवळ १६ जागांवर ५० टक्क्यांहून अधिक मतं मिळवण्यात यश मिळालं. 4 / 10महायुतीमध्ये भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरला. भाजपाने १४९ जागांवर निवडणूक लढून १३२ जागा जिंकल्या. तसेच २६.८ टक्के मतं मिळवली. भाजपासाठी ही कामगिरी विक्रमी ठरली आहे. भाजपाने जिंकलेल्या एकूण जागांपैकी ८४ जागा ह्या ५० टक्क्यांहून अधिकच्या मताधिक्याने जिंकल्या. तर भाजपाने २६ जागांवर ६० टक्क्यांहून अधिकच्या मतं मिळवून जिंकल्या. सातारा विधानसभा मतदारसंघामध्ये तर भाजपाने एकूम मतदानापैकी ८०.४ मतं मिळवून विजय मिळवला. 5 / 10महायुतीच्या महाविजयामध्ये भाजपाबरोबरच भाजपाच्या मित्रपक्षांनीही चमकदार कामगिरी केली. शिवसेना शिंदे गट आणि अजित पवार गटाने दणदणीत यश मिळवलं. शिवसेना शिंदे गटाने जिंकलेल्या ५७ जागांपैकी ३० जागांवर ५० टक्क्यांहून अधिक मतं घेत बाजी मारली. तर अजित पवार गटाने ४१ पैकी २० हून अधिक जागांवर ५० टक्क्यांहून अधिक मतं मिळवली. 6 / 10या निवडणुकीत दारुण पराभव झालेल्या महाविकास आघाडीमध्ये शरद पवार गटाने सहा जागांवर ५० टक्क्यांहून अधिक मतं मिळवली. काँग्रेसला पाच जागांवर ५० टक्क्यांहून अधिक मतं मिळाली. तर ठाकरे गटाने ४ जागांवर ५० टक्क्यांहून अधिक मतं घेत विजय मिळवला. महाविकास आघाडील केवळ तीन जागांवर ६० टक्क्यांहून अधिक मिळाली. तर महाविकास आघाडीने ७ जागांवर ३० ते ४० टक्क्यांवर मत मिळवून विजय मिळवला. तर ४० ते ५० टक्के मतांसह महाविका आघाडीने २७ जागांवर विजय मिळवला. 7 / 10सत्ता मिळवण्याचे प्रयत्न अयशस्वी झालेल्या महाविकास आघाडीला बसलेला आणखी एक धक्का म्हणजे ३४ जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार हे तिसऱ्या किंवा त्या खालच्या क्रमांकावर राहिले. २२ जागांवर महाविकास आघाडीच्या उमेदवारांना अनामत रक्कम गमवावी लागली. तर ११ जागांवर महाविकास आघाडीली ११ टक्क्यांहून कमी मतं मिळाली. 8 / 10आणखी एक उल्लेखनीय बाब म्हणजे या निकालांमध्ये १६ मतदारसंघात विजयी उमेदवारांनी एक लाखांहून अधिकचं मताधिक्य घेतलं. तसेच लाखभराचं मताधिक्य घेणारे सर्व उमेदवार हे महायुतीचे होते. शिरपूरमध्ये महायुतीमधील भाजपाचा उमेदार सर्वाधिक १ लाख ४६ हजारांच्या मताधिक्याने विजयी झाला. 9 / 10दुसरीकडे विरोधी पक्ष असलेल्या महाविकास आघाडीच्या एकाही उमेदवाराला लाखाच्या मताधिक्याने विजय मिळवता आला नाही. महाविकास आघाडीतील शरद पवार गटाचे जितेंद्र आव्हाड हे कळवा-मुंब्रा मतदारसंघामधून सर्वाधिक ९६ हजार २३० मतांनी विजयी झाले. हेच महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मिळालेलं सर्वात मोठं मताधिक्य ठरलं. 10 / 10आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे काही महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणिुकीत महायुती ज्या ज्या विधानसभा मतदारसंघात पिछाडीवर पडली होती. त्यापैकी ५२ विधानसभा मतदारसंघांमध्ये महायुतीने ५० टक्क्यांहून अधिक मतं मिळवत बाजी मारली.