अपक्ष आमदार देवेंद्र भुयार अडकले लग्नाच्या बेडीत; पाहा विवाह सोहळ्याचे PHOTO
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2022 23:40 IST2022-08-21T23:37:14+5:302022-08-21T23:40:14+5:30

मोर्शी मतदारसंघाचे युवा अपक्ष आमदार देवेंद्र भुयार हे आता दर्यापूरचे जावई झाले आहेत. रविवारी आमदार देवेंद्र भुयार हे दर्यापूर येथील डॉ. मोनाली दिलीप राणे यांच्यासोबत लग्नाच्या बेडीत अडकले आहेत. भुयार यांच्या लग्नसोहळ्याला अनेक आमदारांनी उपस्थिती लावली.
महाराष्ट्राच्या राजकारणात सुरू असलेल्या नाट्यमय घडामोडी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यानंतर देवेंद्र भुयार मुंबईत आले होते. ऐन सत्तासंघर्षात देवेंद्र भुयार यांचा साखरपुडा २९ जून रोजी पार पडला होता. त्यानंतर आज त्यांचा विवाह सोहळा संपन्न झाला.
मोनाली राणे या बीएएमएस आहेत. त्यांचे वडील दिलीपराव राणे हे जिल्हा परिषद निवृत्त शिक्षक आहेत. भुयार यांच्या लग्नसोहळ्याला प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या बहुतांश आमदारांनी हजेरी लावली होती. त्यात विरोधी पक्षनेते अजित पवार, आमदार रोहित पवार यांचाही समावेश होता.
देवेंद्र भुयार हे मोर्शी मतदारसंघातील स्वाभिमानी संघटनेचे आमदार होते. तत्कालीन कृषीमंत्री अनिल बोंडे यांचा पराभव करून ते आमदार झाले. राजू शेट्टींसोबत झालेल्या वादावरून स्वाभिमानमधून त्यांची हकालपट्टी झाली होती. त्यानंतर देवेंद्र भुयार हे अजित पवार यांच्या जवळचे मानले जातात.
विधान परिषद आणि राज्यसभेच्या निवडणुकीत झालेल्या मतदानानंतर देवेंद्र भुयार चांगलेच चर्चेत आले होते. संजय राऊत यांच्याशी थेट भिडणारे देवेंद्र भुयार यांनी अजित पवार सांगतील त्यालाच मत देणार असल्याचं जाहीर केले होते.