शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Coronavirus: "हॅलो, तुम्हाला कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्ट हवाय का?"; काँग्रेस नेत्याला थेट ऑफर

By प्रविण मरगळे | Published: February 23, 2021 4:11 PM

1 / 10
गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोना रुग्णवाढीची संख्या वाढल्याने पुन्हा लॉकडाऊन होणार का? अशी चर्चा सुरू आहे, दिवसाला ६ हजारापेक्षा अधिक रुग्ण राज्यात आढळून येत आहेत, त्यामुळे प्रशासनदेखील अलर्टवर आलं आहे, अनेक ठिकाणी संचारबंदी, अल्पस्वरुपात लॉकडाऊन अशा उपाययोजना केल्या जात आहेत.
2 / 10
राज्यातील ठाकरे सरकारमधील अनेक मंत्र्यांना कोरोनाची लागण झाली, अलीकडेच जयंत पाटील, राजेश टोपे, छगन भुजबळ यांच्यासारख्या नेत्यांना कोरोना झाला आहे, परंतु अधिवेशनाच्या आधीच राज्यात कोरोना कसा काय वाढतो? असा सवाल विरोधकांनी केला आहे.
3 / 10
यातच अमरावतीत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खोटे रिपोर्ट देणारी टोळी सक्रीय असल्याची घटना उघडकीस येत आहे, या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत, परंतु सत्ताधारी पक्षाच्या नेत्याने अशाप्रकारे आरोप लावल्याने विरोधकांना सरकारवर टीका करण्याची आयती संधीच सापडली आहे.
4 / 10
अमरावती शहरात कोरोना चाचणीचे पॉझिटिव्ह अहवाल देणारी सक्रीय टोळी असल्याचा आरोप जिल्हा परिषदेचे सदस्य प्रकाश साबळे यांनी आमसभेत केला आहे, त्यांच्या या आरोपावर जिल्हा परिषद अध्यक्षांनी चौकशी करून यासंदर्भात विस्तृत अहवाल सादर करण्याचे आदेश सीईओंना झेडपी अध्यक्षांनी दिले.
5 / 10
संक्रमिताच्या वाढत्या संख्येमुळे अमरावती जिल्हा प्रशासन हादरले असून, २३ फेब्रुवारीपासून अमरावती, अचलपूर शहरात आठवडाभराचा संपूर्ण लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. दरम्यान वाढत्या रुग्णसंख्येमुळे सध्या अमरावतीचे नाव देशभर चर्चेत आले आहे. याला हे रॅकेटच कारणीभूत असल्याचा दावा सदस्य प्रकाश साबळे यांनी केला आहे
6 / 10
विशेष म्हणजे झेडपी आमसभेत प्रकाश साबळेंनी स्वत:चे उदाहरण पुढे करीत मलाच एका डॉक्टरने ‘तुम्हाला पॉझिटिव्ह अहवाल हवा आहे का? अशी ऑफर दिली होती, असे धक्कादायक विधान त्यांनी केले. यामुळे झेडपी अध्यक्ष बबलू देशमुख यांनी सीईओ अमोल येडगे यांना चौकशीचे आदेश दिले.
7 / 10
तत्पूर्वी स्वत: बबलू देशमुख यांनीही साबळे यांच्या दाव्याचे अनुमोदन करीत आणखी एका पदाधिकाऱ्यानेदेखील ही बाब लक्षात आणून दिल्याचे सांगत साबळेच्या विधानाला सभागृहात दुजोरा दिला. मात्र सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनीच अशाप्रकारे विधान केल्यामुळे भाजपाही चांगली आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं.
8 / 10
याबाबत भाजपाचे प्रवक्ते शिवराय कुळकर्णी म्हणाले की, अमरावतीत ज्या रुग्णांना कोरोना झाला नाही त्यांनाही कोरोना पॉझिटिव्ह दाखवल्याचा आरोप युवा काँग्रेसच्या नेत्यांनी जिल्हा परिषदेच्या आमसभेत केले आहे, काँग्रेसचे जिल्हा परिषद अध्यक्षांनी या प्रकरणात चौकशीचे आदेश दिले आहेत, एकीकडे महाविकास आघाडी सरकारमधील पालकमंत्री यशोमती ठाकूर अमरावतीत कोरोना वाढल्याने लॉकडाऊन थोपवलं आहे, आणि दुसरीकडे अमरावतीत बनावट कोरोना रुग्णांचे रॅकेट असल्याचा आरोप सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनी केला आहे, त्यामुळे मी जबाबदार म्हणणाऱ्यांनी यात लक्ष घालून या प्रकरणाची चौकशी करावी, लोकांच्या मनात जो संभ्रम झालाय तो दूर करणं आवश्यक आहे अशी मागणी त्यांनी केली आहे.
9 / 10
विभागात कोरोना नियंत्रणासाठी आता अमरावती, अकोला महापालिका आणि अचलपूर, अकोट व मूर्तिजापूर नगरपरिषद हद्दीत सोमवारी रात्री ८ वाजेपासून पुन्हा सात दिवस ‘लॉकडाऊन’चा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. या काळात जीवनावश्यक वस्तू वगळता इतर सर्व व्यवहार बंद असतील. अमरावतीत पालकमंत्री यशोमती ठाकूर व अकोल्यात जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी रविवारी ही घोषणा केली.
10 / 10
राज्यात रविवारी ६,९७१ रुग्ण आणि ३५ बाधितांचा मृत्यू झाला होता. त्या तुलनेत सोमवारी नवीन बाधित तसेच मृत्यूंचे प्रमाण काहीसे कमी झाले. सोमवारी दिवसभरात ५,०३५ रुग्ण बरे होऊन घरी गेले. तर आतापर्यंत एकूण १९,९९,९८२ रुग्ण कोरोनामुक्त झाले. त्यामुळे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.९६ टक्के झाले आहे.
टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसYashomati Thakurयशोमती ठाकूरBJPभाजपाcongressकाँग्रेस