शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

छत्रपति शंभाजी महाराजांची नाणी पाहिली आहेत का?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2019 6:48 PM

1 / 5
छत्रपति शंभाजीमहाराज, म्हटलं तर शिवरायांनी स्थापन केलेल्या स्वराज्याचे दुसरे छत्रपति. एक अत्यंत पराक्रमी युवराज, धाडसी राजा. एकाच वेळी सहसा एकच शत्रू अंगावर घ्यायचा, या शिवरायांच्या नीतीच्या विरोधात चतुरस्त्र सेनांशी, शत्रूंशी सातत्याने युद्ध करणारा सेनापती, की एक लहानपणीच मातृप्रेमाला पारखा झालेला शंभुबाळ, शिवनिधनानंतर महाराजांचे अष्टप्रधान व अन्य यांच्यासोबत असलेल्या, झालेल्या मतभेदामुळे काहीसा एकटा पडलेला शिवपुत्र.
2 / 5
शंभाजी महाराज आजपावेतो गैरसमजाचेच बळी ठरलेत, तेव्हापासून आतापर्यंत. समकालीन परकीय प्रवासी, प्रत्यक्षदर्शी अथवा वकील यांनी शंभाजीमहाराजांचे केलेले गुणवर्णन आणि उत्तरकालीन बखरीतील त्यांच्या गुणावगुणांचा घेतलेला आढावा यात नक्कीच तफावत आहे. फे्रंच प्रवासी अ‍ॅबे कॅरेने शिवरायांच्या मावळ्या सैनिकांना भावलेला तडफदार राजपुत्र सेनानी असे म्हटले आहे. शंभाजीमहाराज अडीच ते पावणेतीन वर्षांचे असतानाच शिवरायांच्या पट्टराणीसाहेब व शंभाजीची आई महाराणी सईबाईसाहेब या दुर्दैवाने अल्पायुषी ठरून त्यांचे निधन झाले. बाल शंभुराजे दूधआई धाराऊसाहेबांच्या जवळ व जिजाऊसाहेबांच्या प्रेमळ पण खंबीर मार्गदर्शनाखाली अनेक विद्यांमध्ये पारंगत झाले. भाषा, लिखाण, शस्त्रविद्या, व्यायाम, राजकारणाचे धडे असं सर्वांगीण शिक्षण शंभुराजांना प्राप्त झाले होते व ते त्यांनी उत्तमप्रकारे अंगी बाणवले होते. वयाच्या अवघ्या आठव्या-नवव्या वर्षी ते आपले पिता शिवाजीमहाराजांसोबत औरंगजेबाच्या दरबारात आग्य्रालाही गेले. महाराजांवर आलेल्या कैदेच्या अकल्पित संकटात ते सतत महाराजांच्या सोबत त्या न कळत्या वयातही एखाद्या तळपत्या समशेरीसारखे राहिले. खुद्द आलमगीरसुद्धा या तेजस्वी शिवपुत्रावर काही प्रमाणात तेव्हा फिदा झाला होता. पण नंतर पुन्हा एकवार सुमारे २२-२३ वर्षांनी घडणारी या दोघांची भेट अक्षरश: 'काळभेट' ठरेल याची साधी कल्पनाही आली नाही.
3 / 5
शिवराजाभिषेकसमयी शंभुराजे भावी युवराज म्हणून राजसिंहासनाच्या पायरीजवळ बसले होते, असे प्रत्यक्षदर्शी हेन्री ऑक्झेंडनच्या डायरीत नमूद केलेले आहे. युवराज शंभाजीराजेंसाठी ईस्ट इंडिया कंपनीतर्फे नजराणा म्हणून दोन लालखचित सलकडी- किंमत रु. १२५/- आणि एक हिऱ्याची अंगठी- किंमत रु. २५०/- असा एकूण रु. ३७५/- किंमतीचा आहेर दिला होता. इ.स.१६७३मध्ये शिवाजीमहाराजांच्या भेटीसाठी रायगडावर आलेला इंग्रज वकील 'टॉमस निकल्स्' याची अधिकृत राजनैतिक भेट शंभाजीराजांसोबत झाली होती. शंभाजी रायगडला असताना महाराजांसोबत दरबारी कामकाजात लक्ष घालीत असत, असे दिनांक ६-९-१६७५ ला इंग्रज वकील 'सॅम्युएल ऑस्टिन' जो राजापूरच्या वखारीच्या लुटीच्या भरपाईची मागणी करायला आला होता तो लिहितोय. शंभाजीमहाराजांनी राज्यकारभारासह शास्त्रे व पुराणे यांचाही सखोल अभ्यास केलेला होता. बुधभूषण, नायिकाभेद, सातसतक व नखशिख असे चार ग्रंथही लिहिले आहेत .
4 / 5
१६८० साली अकल्पितपणे झालेल्या धक्कादायक शिवनिधनानंतर घडलेल्या राजकीय उलथापालथीत त्यावेळी पन्हाळगडावर असलेल्या युवराज शंभुराजांना पकडून आणण्याचा दुर्दैवी कट रचला गेला होता. अर्थात स्वराज्याच्या सुदैवाने अण्णाजी दत्तो, मोरोपंत पिंगळे, राहुजी सोमनाथ, बाळाजी आवजी चिटणीस या मंत्र्यांनी रचलेला हा कट सेनापती हंबीरराव मोहिते यांच्या खंबीर भूमिकेमुळे प्रत्यक्षात येऊ शकला नाही. कालांतराने शंभाजीमहाराज रायगडावर आले, त्यांनी पुन:श्च आपल्या पित्याचे श्राद्धादी कर्म केले. यावेळी शिवपत्नी महाराणी पुतळाबाईसाहेब शिवरायांचे जोडे उरी कवटाळून सती गेल्या. मंचकारोहण व राजाभिषेकानंतर कटात सामील मंडळींना शंभाजीमहाराजांनी योग्य त्या शिक्षाही दिल्या. सामान्य प्रजेच्या उत्कर्षाकरीता शिवछत्रपतिंचा वारसा पुढे चालवत पावले उचलली. परकीय आक्रमकांशी तेवढ्या तडफेने युद्ध केले, प्रतिआक्रमणही केले.
5 / 5
याचवेळी शंभाजीमहाराजांनी राजाभिषेकासमयी शिवरायांच्या नाण्यांशी साधर्म्य असणारी आपली स्वतंत्र नाणी पाडली. या तांब्याच्या नाण्यांवर एका बाजूस तीन ओळीत 'श्री राजा शंभु' व मागे दोन ओळीत 'छत्र पति' असे छापलेले आहे. ही नाणी १२ ते १३ ग्राम्स या वजनाची होती. नाण्याच्या कडांभोवती बिंदुयुक्त वर्तुळ होते. मात्र शंभाजीमहाराजांनी सोन्याचे नाणे पाडले नव्हते, नसावे कारण आजतागायत अभ्यासकांना, संग्राहकांना एकही नाणे उपलब्ध झालेले नाही. अत्यंत दगदगीची, अस्थिर, अवतीभवती सतत युद्धजन्य व संशयास्पद परिस्थिती, सारावसुलीस न मिळणारा वेळ यामुळे आर्थिक स्थैर्याच्या आघाडीवर नसलेली मजबुती या कारणांनी ही नाणी फार थोड्या प्रमाणात पाडली असावीत, असा कयास बांधावा लागतो व याचमुळे आजच्या घडीला शंभाजीमहाराजांची नाणी दुर्मिळ सदरात गणली जातात. (लेखः प्रशांत सुमती भालचंद्र ठोसर)
टॅग्स :Shivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजhistoryइतिहास