शिंदे गटातील 'हा' पहिला आमदार देणार राजीनामा?; थेट आदित्य ठाकरेंना प्रतिआव्हान

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2022 10:22 AM2022-07-25T10:22:48+5:302022-07-25T10:25:59+5:30

विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर राज्यात राजकीय भूकंप घडला. एकनाथ शिंदे यांच्यासोबत ५० आमदारांनी मविआ सरकारचा पाठिंबा काढला आणि उद्धव ठाकरे सरकार अल्पमतात आले. त्यामुळे ठाकरेंना मुख्यमंत्रिपदावरून पायउतार व्हावं लागलं.

शिवसेनेच्या तब्बल ४० आमदारांनी उद्धव ठाकरेंच्या विरोधात भूमिका घेत एकनाथ शिंदे गटात सामील होणे पसंत केले. शिंदे गटात सहभागी होणाऱ्या आमदार, खासदार, पदाधिकाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यात आदित्य ठाकरे शिवसंवाद यात्रेच्या निमित्ताने राज्याचा दौरा करत आहेत.

बंडखोर आमदारांच्या मतदारसंघात जाऊन आदित्य ठाकरे शक्तिप्रदर्शन करत सोडून गेलेल्या आमदारांना गद्दार म्हणून संबोधत आहेत. त्याचसोबत हिंमत असेल तर मर्दासारखं राजीनामा द्या, पुन्हा निवडून येऊन दाखवा असं आव्हान देत आहेत.

आता आदित्य ठाकरेंच्या या आव्हानाला शिंदे गटातील पहिल्या आमदाराने थेट प्रतिआव्हान दिले आहे. आमदार अब्दुल सत्तार म्हणाले की, मी मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे राजीनामा देण्यासाठी परवानगी मागितली आहे. त्यांनी मला परवानगी दिली तर मी उद्याच राजीनामा देतो.

राजीनामा देऊन पहिली निवडणूक त्यांना घेऊन दाखवणार आहे. मी किती मतांनी निवडून येतो हे त्यांना दाखवून देणार आहे. ३१ तारखेला मुख्यमंत्री शिंदे औरंगाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. लाखो लोक तेव्हा स्वागतासाठी येतील असा दावा सत्तार यांनी केला आहे.

त्याचसोबत मराठवाड्यातील एकही शिंदे गटातील आमदार पडणार नाही अशी गॅरंटी देतो. मी ४२ वर्षापासून राजकारणात आहे. २५ वर्षापासून आमदार आहे. तिनदा मंत्री झालो आहे आणि ते एकदाच मुख्यमंत्री झालेत असा टोला सत्तारांनी उद्धव ठाकरेंना लगावला.

आदित्य ठाकरे माझ्या मतदारसंघात कधी आले नाही. बाळासाहेबांचे अनुयायी एकनाथ शिंदे आहेत. निवडणुकीपूर्वी भाजपा-शिवसेना युती होती. तो धर्म आम्ही पाळतोय. नेत्याला बदनाम करायचं आणि मातोश्रीचे दरवाजे खुले आहेत असं दुटप्पी बोलायचं हे राजकारणात चालत नाही असं सत्तार म्हणाले.

एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्यावेळी आमचे किती लोक रस्त्यावर येतात हे दाखवून देऊ. मातोश्रीवर जाण्याची माझी इच्छा नाही. मंत्रिमंडळ विस्तारावर दिल्लीत अंतिम चर्चा होऊन यादी तयार होईल. त्यानंतर शपथविधीचा मुहूर्त सगळ्यांना कळेल असा दावा अब्दुल सत्तार यांनी केला.

शिवसंवाद यात्रेनिमित्त आदित्य ठाकरे राज्याचा दौरा करत आहेत. दोन दिवसांपूर्वी ते औरंगाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. याठिकाणी मोठ्या प्रमाणात शिवसैनिकांनी गर्दी केली होती. तिथे आदित्य ठाकरेंनी बंडखोर आमदारांवर जोरदार निशाणा साधला.

गद्दारांना जनता कधीच माफ करत नाही. ज्याला जिथे राहायचे आहे तिथे आनंदाने रहा. फक्त बंडखोर आमदारांनी हिंमत करून राजीनामा द्यावा. जनता जो निकाल देईल तो आम्हाला मान्य असेल, असं खुले आव्हान आदित्य ठाकरेंनी दिले होते.