शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार, भाषणांची नेहमी होते चर्चा; या नेत्याला तुम्ही ओळखलं का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2025 21:31 IST2025-04-27T21:26:10+5:302025-04-27T21:31:51+5:30

वयाच्या १५ व्या वर्षापासून शिवसेनेतून राजकारण सुरुवात करणाऱ्या या नेत्याने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सामील होऊन खासदारकी मिळवली आहे.
कोरोना काळात शरद पवार यांच्या या खासदाराने केलेल्या कामाचे सर्वच स्तरातून कौतुक करण्यात येत होतं. शरद पवार यांच्या नावाने एक हजार बेड्सचं कोव्हिड सेंटर सुरु केलं होतं.
ही व्यक्ती म्हणजे अहिल्यानगरचे खासदार निलेश लंके आहेत. शिवसेनेपासून राजकारणाची सुरुवात केलेल्या निलेश लंके यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीतून खासदारकी मिळवली होती. सुजय विखे यांचा पराभव करुन निलेश लंके अहमदनगरचे खासदार झाले.
निलेश लंके हे सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतात. अशातच त्यांनी त्यांच्या तरुणपणीचे दोन फोटो फेसबुकवर पोस्ट केले आहेत. एका फोटोमध्ये ते काही ग्रामस्थांना संबोधित करताना दिसत आहेत.
"कधी कधी जुने क्षण पुन्हा पाहिले, की काळ थोडा थांबतो. त्या जुन्या हसण्यात, त्या साध्या गोष्टींमध्ये एक वेगळीच जादू असते… आज त्या आठवणींना एक नजर देतोय, कारण त्या आठवणींनीच आजचं आयुष्य सुंदर केलंय," असे निलेश लंके यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
२०१८ साली शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर २०१९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकीटावर निलेश लंके हे पारनेरचे आमदार झाले होते. पहिल्यांदाच निवडून येताना निलेश लंके यांनी तिनवेळा निवडून आलेल्या शिवसेनेच्या विजय औटी यांचा पराभव केला होता.
त्यानंतर २०२४ साली शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर निलेश लंके यांनी अहिल्यानगर लोकसभेची निवडणूक लढवली आणि जिंकली. त्यांनी भाजपचे खासदार सुजय विखे यांचा पराभव केला होता.