शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

मंदिर अन् राजकारण! ठाकरे गटाच्या आंदोलनाआधीच भाजपाची खेळी; २४ तासांत काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2024 15:00 IST

1 / 10
दादर पूर्व रेल्वे स्टेशनबाहेर असणाऱ्या हनुमान मंदिराचा मुद्दा मागील काही दिवसांत चर्चेत आला. रेल्वेकडून हे मंदिर हटवण्याची नोटीस आली त्यानंतर इथले स्थानिक खासदार अनिल देसाई यांनी पत्र लिहून त्याला विरोध केला. मंदिर हटवण्याच्या मुद्द्यावरून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आक्रमक पवित्रा घेतला.
2 / 10
हिंदुत्वाच्या मुद्द्यांवर उद्धव ठाकरेंनी आक्रमक होत भाजपाला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. शनिवारी आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वात ठाकरे गटाचे कार्यकर्ते हनुमान मंदिराला भेट देत महाआरती करणार होते. भाजपाच्या सरकारमध्ये मंदिर सुरक्षित नाही असा आरोप ठाकरे गटाकडून करण्यात आला होता.
3 / 10
ठाकरे गट हनुमान मंदिराच्या ठिकाणी महाआरती करणार त्याआधीच भाजपा नेते मंगलप्रभात लोढा यांनी हनुमान मंदिराला भेट दिली. या भेटीत लोढा आणि पदाधिकाऱ्यांनी मंदिर विश्वस्तांसोबत चर्चा करून थेट रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आणि रेल्वे प्रशासनाशी चर्चा केली.
4 / 10
या चर्चेनंतर रेल्वेने तात्काळ पत्र काढून मंदिर हटवण्याचे आदेश मागे घेतले आहेत. याबाबत मंगलप्रभात लोढा म्हणाले की, भाजपा, विश्व हिंदू परिषद आणि हिंदुत्ववादी संघटनांनी याबाबत रेल्वेच्या प्रशासनाशी चर्चा केली होती. त्यानंतर रेल्वेने संपूर्ण माहिती घेतली. त्यानंतर जे आदेश काढले होते ते रद्द केले आहेत. मंदिरात पूर्वीप्रमाणे आरती आणि पूजा सुरूच राहील. मंदिर हटवले जाणार नाही असं त्यांनी सांगितले.
5 / 10
काही सर्व्हेक्षणानंतर रेल्वेने मंदिराला नोटीस पाठवली होती. त्यानंतर विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आणि मुंबई भाजपा रेल्वेकडे पाठपुरावा करत होती. मी स्वत: रेल्वे मंत्र्‍यांशी दोनदा बोललो. त्यानंतर आज रेल्वेने मंदिर हटवण्याचे आदेश मागे घेतले आहेत त्यामुळे आता ज्यांना राजकारण करायचे आहे त्यांनी ते करावे असा टोला मंगलप्रभात लोढा यांनी ठाकरे गटाला लगावला.
6 / 10
उद्धव ठाकरे काय म्हणाले होते? - दादर विभागात ८० वर्षांपासून असलेले हनुमान मंदिर पाडण्याची नोटीस सरकारने पाठविली आहे. रेल्वेच्या जागेवर अतिक्रमण केले आहे, असे रेल्वे मंत्रालयाचे म्हणणे आहे. सरकार हमालांनी बांधलेले ८० वर्षांपूर्वीचे मंदिर पाडायला निघाले आहेत. हे कुठले हिंदुत्व आहे? असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता.
7 / 10
त्याशिवाय रामाचे मंदिर उभारले पण त्याच रामभक्त हनुमानचे मंदिर कसे तोडता? ‘एक है तो सेफ है’, म्हणता पण बांगलादेशातील, मुंबईतील मंदिरे सेफ नाहीत. आता मंदिरे सुरक्षित नाहीत. हिंदुत्व सोडले असे आम्हाला विचारता, मग तुम्ही हे काय सोडले आहे, अशी टीका ठाकरे यांनी भाजपावर केली होती.
8 / 10
काय आहे प्रकरण? - ४ डिसेंबर रोजी दादर स्टेशनजवळी हनुमान मंदिर तोडण्‍याची नोटीस मध्‍ये रेल्‍वेच्‍या सहाय्‍यक मंडळाच्‍या कार्यकारी अभियंत्‍यांनी पाठवली होती. दादर रेल्‍वेस्‍थानकाला लागूनच पूर्व भागात हे हनुमान मंदिर आहे.
9 / 10
नोटीस आल्यापासून हनुमान मंदिर विश्वस्तांनी याचा निषेध केला. हे मंदिर ८० वर्ष जुने असून १९६९ मध्‍ये या मंदिराची धर्मादाय आयुक्‍त कार्यालयात ‘सार्वजनिक विश्‍वस्‍त संस्‍था’ म्‍हणून नोंदणी केली आहे. मात्र नोटिशीत विश्वस्तांनी स्वत: मंदिर पाडावे अन्यथा रेल्वेकडून पाडण्यात येईल आणि त्याचा खर्चही वसूल केला जाईल असं म्हटलं होते.
10 / 10
दादर रेल्वे स्टेशन बनण्यापूर्वीच या परिसरात हे मंदिर असल्याचं सांगितले जाते. रेल्वेतील हमालांकडून हे मंदिर बाधले होते. याठिकाणी असलेल्या झाडाखाली मूर्ती सापडली होती त्यानंतर तिथे मंदिर उभारण्यात आले. ८० वर्षापासून हे मंदिर इथं आहे असं मंदिराचे विश्वस्त प्रकाश कारखानीस यांनी सांगितले.
टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेAaditya Thackerayआदित्य ठाकरेMangalprabhat Lodhaमंगलप्रभात लोढाBJPभाजपा