काँग्रेसमुळे महाविकास आघाडी सरकार आहे, हे लक्षात असू द्या; शिवसेनेला थेट इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2021 18:44 IST
1 / 12मुंबई : गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीतील सर्व काही आलबेल नसल्याचे पाहायला मिळत आहे. मनसुख हिरेन मृत्यू प्रकरण, सचिन वाझे प्रकरण, अनिल देशमुखांवर परमबीर सिंग यांनी केलेले गंभीर आरोप यावरून भाजप महाविकास आघाडी सरकारला घेरत असताना, संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शरद पवार यांनी यूपीएचे अध्यक्ष व्हावे, असे म्हटले होते. त्यावरून काँग्रेस नाराज झाल्याचे पाहायला मिळत आहे. 2 / 12संजय राऊत यांनी मांडलेल्या भूमिकेनंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात (balasaheb thorat) आणि सत्यजित तांबे यांच्यासह अनेक काँग्रेस नेत्यांनी आक्षेप नोंदवला आहे. त्यातच नाना पटोले यांनी पुन्हा एकदा शिवसेनेला आठवण करून दिली आहे. 3 / 12आमच्या नेत्या सोनिया गांधी यांच्याबद्दल ते सातत्याने वक्तव्य करत आहेत. शिवसेना काही UPAचा घटक नाही. पण तरीही ते सातत्याने आमच्या नेत्यांवर टीका करत आहेत. आता त्यांना आम्ही सांगितलं आहे की, आम्ही सरकार नाही पण सरकार आमच्यामुळे आहे, असा थेट इशारा नाना पटोले (nana patole) यांनी संजय राऊत यांना दिला आहे. 4 / 12UPA अर्थात संयुक्त पुरोगामी आघाडीच्या अध्यक्षपदावरुन महाराष्ट्रात शिवसेना आणि काँग्रेसमध्ये जोरदार राजकारण पाहायला मिळत आहे. शिवसेनेचे खासदार आणि ‘सामना’चे कार्यकारी संपादक संजय राऊत यांच्यावर काँग्रेस नेते टीका करत असल्याचे पाहायला मिळत आहे. (maha vikas aghadi)5 / 12संजय राऊत यांच्या भूमिकेवर आक्षेप नोंदवत, शिवसेनेने आधी UPAचा घटक व्हावे, मग त्यांच्या मतांचा विचार केला जाईल, असा टोला काँग्रेस नेते सत्यजित तांबे यांनी संजय राऊतांना लगावला होता. 6 / 12संजय राऊत हे एका बाजूला राजकारणी आहेत. पण ते संपादकही आहेत. कदाचित राजकारणी आणि संपादक यामध्ये त्यांची गल्लत होते का काय असे वाटायला लागते. आघाडी सरकार होण्यात त्यांचा मोठा सहभाग असल्याचे आम्ही जाहीरपणे सांगत असतो, असे बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे. 7 / 12काँग्रेस देशव्यापी पक्ष आहे. देशाचे नेतृत्व काँग्रेसकडे आहे आणि त्यांच्याकडेच राहणार आहे. कठीण दिवस निघून जातील आणि पुन्हा काँग्रेसचे दिवस येतील. त्यामुळे अशी कल्पना मांडणे मला योग्य वाटत नाही. अशी वक्तव्य करून मनात दोष निर्माण होतो हे त्यांनी करू नये, असे बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.8 / 12संजय राऊत उठसूट काँग्रेसविरोधात बोलत असतील तर आम्हालाही विचार करावा लागेल, राज्यातील ठाकरे सरकार काँग्रेसच्या टेकूवर अस्तित्वात आलेय, हे शिवसेनेने लक्षात ठेवावे. तसेच संजय राऊत यांनी युपीएसाठी शरद पवारांची वकिली बंद करावी असे नाना पटोले यांनी बजावले आहे.9 / 12युपीएचे नेतृत्व कोणी करावे हे युपीएच्या सदस्यांनी ठरवले आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे ते शरद पवार साहेबांचे प्रवक्ते आहेत का, असा उल्लेख केला होता. ज्या गोष्टीशी संबंध नाही त्यावर संजय राऊतांनी चर्चा करु नये. इतकाच आमचा सल्ला आहे, असा टोला नाना पटोले यांनी लगावला आहे.10 / 12यूपीए आणखी मजबूत व्हायला पाहिजे, असे काँग्रेसमधील अनेक नेत्यांचे म्हणणे आहे. सोनिया गांधी यांनी प्रदीर्घकाळ यूपीएचे अध्यक्षपद भुषविले. सध्या सोनिया गांधी यांची प्रकृती ठीक नसते. देशात अनेक प्रकराच्या घडामोडी घडत आहेत. अशावेळी यूपीएचे नेतृत्त्व काँग्रेसबाहेरील नेत्याने करावे, असे देशातील अनेक पक्षांची म्हणणं आहे, असे संजय राऊत यानी म्हटले होते. 11 / 12तसेच राष्ट्रीय स्तरावर एका मजबूत विरोधी आघाडीची स्थापना होणे गरजेचे आहे. ज्या राज्यस्तरीय नेत्यांना कळत नाही, त्यांनी कृपा करून बोलू नये. या विषयावर काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी यांनी बोलले तर ठीक आहे, तेही यावर चिंतन करत आहेत, या शब्दांत संजय राऊत यांनी नाना पटोले यांच्या विधानाचा समाचार घेतला होता.12 / 12गेल्या अनेक दिवसांपासून शिवसेना आणि काँग्रेसमध्ये आरोप-प्रत्यारोप होताना पाहायला मिळत आहेत. काँग्रेस नेते संजय राऊत यांच्यावर निशाणा साधत असून, संजय राऊतही आरोपांना थेट प्रत्युत्तर देत आहेत. एकूणच राजकीय वर्तुळात याची चांगलीच चर्चा रंगली असून, महाविकास आघाडी सरकारसाठी ही डोकेदुखी ठरू शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे.