Eknath Shinde: मोदी नावाचा जप, तरीही केसरकरांना मंत्रिपद देण्यास भाजपचा विरोध?; पडद्यामागच्या घडामोडी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2022 01:17 PM2022-08-10T13:17:17+5:302022-08-10T13:21:31+5:30

Eknath Shinde Cabinet Expansion: मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने बच्चू कडू नाराज आहेत. त्यांनी आजच शिंदे यांची भेट घेऊन नाराजी व्यक्त केली. यानंतर आता भाजपाचा शिंदे गटातील तीन मंत्र्यांना विरोध होता, असे समोर आले आहे.

चाळीस दिवसांनी मुख्यंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. भाजपाचे ९ आणि शिंदे गटाचे ९ आमदार कॅबिनेट मंत्री झाले. आता यामागच्या घडामोडी समोर येऊ लागल्या आहेत. यापैकी एक म्हणजे शिंदे गटाचे प्रवक्ते दिपक केसरकर आणि अन्य दोन मंत्र्यांच्या नावाला भाजपाचा विरोध होता.

मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने बच्चू कडू नाराज आहेत. त्यांनी आजच शिंदे यांची भेट घेऊन नाराजी व्यक्त केली. तसेच प्रसारमाध्यमांना सांगताना शिंदे यांनीच मंत्रिपदाचा शब्द दिला होता, परंतू बनविले नाही, असा इशारा दिला होता. यानंतर आता भाजपाचा शिंदे गटातील तीन मंत्र्यांना विरोध होता, असे समोर आले आहे.

दिपक केसरकर यांनी शिंदे गटाच्या बंडखोरीवेळी प्रवक्तेपदाची जबाबदारी पार पाडली. यावेळी त्यांनी मोदी आणि आपले कसे सख्य आहे, मोदींनी भाजपात येण्याची ऑफर दिल्लीला बोलवून दिली होती, असा मोदी नावाचा जप चालविला होता. याचवेळी त्यांनी काहीवेळा संजय राऊतांवर टीका तर काहीवेळा उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरेंबाबत सकारात्मक वक्तव्ये केली होती. यामुळे केसरकर यांना मंत्रिपद देण्यास भाजपाने विरोध केला होता, असे आता समोर आले आहे. एबीपीने याचे वृत्त दिले आहे.

यानंतर दुसरे मंत्री अब्दुल सत्तार यांना मंत्रिपद देण्यास भाजपाने विरोध केला होता. हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करून शिंदे ठाकरे सरकारमधून बाहेर पडले. भाजपासोबत आले, मग आता या हिंदुत्ववादी सरकारमध्ये मुस्लिम नेता मंत्री कसा, असा आक्षेप भाजपाने घेतला होता. यावर एकनाथ शिंदे यांनी भाजपाचा विरोध झुगारून लावत दोन्ही नेत्यांना मंत्रिपदाची शपथ दिली.

तिसरा मंत्री म्हणजे संजय राठोड. पुण्यात काही वर्षांपूर्वी, ठाकरे सरकारच्या काळात एका तरुणीचा मृत्यू झाला होता. तीने आत्महत्या केल्याचा संशय आहे. यामध्ये संजय राठोड याचा हात असल्याचे आरोप भाजपानेच केले होते. राठोड तेव्हा वनमंत्री होते. त्यांना राजीनामा द्यावा लागला होता. ठाकरे सरकार पडताच पुणे पोलिसांनी राठोड यांना क्लिनचिट दिली होती. परंतू, भाजपाने असा नेता मंत्रिमंडळात नको, अशी मागणी शिंदेंकडे लावून धरली होती. तरी देखील शिंदेंनी राठोडांना कॅबिनेट मंत्री केले आहे.

आता शिंदे मंत्रिमंडळात खाते वाटपावरून खल सुरु आहे. भाजपाला मलईदार खाती हवी आहेत, तर शिंदे गटाला त्या तुलनेत कामचलाऊ खाती मिळणार आहेत. त्यातच गृहखाते एकनाथ शिंदेंना व देवेंद्र फडणवीसांनाही हवे आहे. "माध्यमांनीच खातेवाटप करुन टाकलं आहे. आमच्या करता खातेवाटप शिल्लकच ठेवलेलं नाही. पण तुम्ही जे खातेवाटप केलं आहे ते सपशेल चुकीचं ठरेल एवढं मी नक्की सांगतो", असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.