'आंदोलक रस्त्यावर नाचताहेत म्हणून तुम्ही न्यायमूर्तींना पायी कोर्टात जायला भाग पाडू शकत नाही'; उच्च न्यायालयाने सरकारला झापले
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2025 14:51 IST
1 / 8मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी मुंबईतील आझाद मैदानात उपोषण सुरू केले आहे. त्यांना पाठिंबा देण्यासाठी राज्याच्या वेगवेगळ्या भागातून लोक मोठ्या संख्येने आले असून, त्यामुळे दक्षिण मुंबईतील काही भागातील वाहतूक व्यवस्था कोलमडली आहे.2 / 8आझाद मैदान, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई उच्च न्यायालयासमोर परिसर, मरीन ड्राईव्ह या परिसरात आंदोलक मोठ्या संख्येने दिसत आहे. आंदोलकांनी रस्त्यावरच ठाण मांडल्याने मंगळवारी (२ सप्टेंबर) मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींना कारमधून उतरून फूटपाथवरून पायी कोर्टात जावं लागलं. 3 / 8याच मुद्द्यावरून कोर्टाने मंगळवारी राज्य सरकारला झापले. आम्ही राज्य सरकारच्या कामावरही समाधानी नाही. राज्य सरकार काय होतं, हे आम्हाला जाणून घ्यायचं आहे. सुनावणी घेण्यासाठी या न्यायालयाच्या न्यायमूर्तींना आंदोलक रस्त्यावरून चालत जाण्यासाठी कसे भाग पाडू शकतात?', अशा शब्दात कोर्टाने राज्य सरकारला फटकारले.4 / 8'आंदोलक रस्त्यावर नाचत आहेत म्हणून सरकार उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींना बळजबरीने रस्त्यावरून चालत जायला भाग पाडू शकत नाही', असे न्यायालयाने राज्य सरकारला सुनावले.5 / 8उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी सांगितलं की, 'आज आमच्यापैकी एक न्यायमूर्ती (रवींद्र घुगे) हे १२.३० वाजता न्यायालयात सुनावणी घेण्यासाठी सरकारी कारने येत होते. शहर दिवाणी न्यायालय आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या इमारतीच्या दरम्यान प्रचंड अडथळा होता. 6 / 8अनेक आंदोलक रस्त्यावर खेळत होते, अनेकजण नाचत होते आणि काही रस्त्यावर झोपलेले होते. न्यायमूर्ती घुगे हे आंदोलकांच्या गर्दीच्या बाजूने दिवाणी न्यायालयासमोरील फूटपाथवरून चालत हायकोर्टात आले. वकील कंथारिया याही अडकल्या होत्या. त्याही पायी आल्याचे कळले. उच्च न्यायालयालच वेढा पडला आहे, असे न्यायमूर्तींनी कोर्टात सांगितले.7 / 8मनोज जरांगे यांची बाजू कोर्टात मांडणारे वकील सतीश मानशिंदे याच मुद्द्यावर म्हणाले की, 'न्यायमूर्ती, मी समजू शकतो, पण एकाही नागरिकाला इजा पोहचलेली नाहीये, कोणताही अडथळा झालेला नाही.'8 / 8त्यावर न्यायमूर्ती म्हणाले, तुम्ही काय म्हणत आहात? लोकांच्या मनात भीती आहे. शाळा बंद आहेत. न्यायमूर्तींना पायी जाण्यास भाग पाडले कारण आंदोलक नाचत आहेत. शहर अर्धमेलं झालं आहे आणि तुम्ही असं बोलत आहात', अशा शब्दात न्यायालयाने झापले.