शरद पवारांची यादी मान्य! कोकणवासीयांना मोठा दिलासा; ‘या’ २ ठिकाणी ८ सुपरफास्ट ट्रेनना थांबा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2025 12:47 IST
1 / 12Konkan Railway News: दिवसेंदिवस कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. गणपती, नवरात्र, दिवाळी, नववर्ष, शिमगा, मे महिना वगळताही कोकणचे निसर्ग सौंदर्य पाहण्यासाठी पर्यटक मोठी गर्दी करत असतात. यामुळे ट्रेनची तिकिटे मिळणे जिकिरीचे होते. कोकण रेल्वेवरील अनेक एक्स्प्रेस ट्रेन ठराविक ठिकाणीच थांबत असल्याने इच्छित स्थळी जाण्यासाठी ट्रेनची संख्या मर्यादित होते. कोकणात जाणाऱ्या प्रवासी आणि पर्यटकांना त्यामुळे अडचणींचा सामना करावा लागतो. 2 / 12कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या चार रेल्वेगाड्यांपैकी दोन ट्रेनना सिंधुदुर्ग आणि कणकवली रेल्वे स्थानकांमध्ये थांबा देण्यात आला आहे. त्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. कोकण रेल्वेवरील महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांवर प्रमुख ट्रेनना थांबा देण्याची मागणी प्रवाशांकडून करण्यात येत होती. परंतु, तांत्रिक अडचणींमुळे या स्थानकांवर प्रमुख एक्स्प्रेसना थांबा देणे शक्य होत नव्हते. 3 / 12प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेऊन हिसार – कोयंबतूर एक्स्प्रेस, गांधीधाम – नागरकोइल एक्स्प्रेस या रेल्वेगाडीच्या दोन्ही दिशेकडील प्रवासाला कणकवली रेल्वे स्थानकात थांबा देण्यात येईल. तर, एर्नाकुलम जंक्शन-अजमेर एक्स्प्रेस, एर्नाकुलम जं. – हजरत निजामुद्दीन एक्स्प्रेस या रेल्वेगाडीला सिंधुदुर्ग येथे थांबा देण्यात येणार आहे.4 / 12कोकण रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, कणकवली, सिंधुदुर्ग स्थानकांवर रेल्वेगाड्यांना प्रायोगिक तत्वावर थांबा देण्यात येणार आहेत. गाडी क्रमांक १२९७७ एर्नाकुलम जंक्शन – अजमेर मरूसागर एक्स्प्रेसला सिंधुदुर्ग येथे २ नोव्हेंबरपासून थांबा देण्यास सुरुवात झाली आहे. सिंधुदुर्ग स्थानकात दुपारी १२.३२ वाजता ही रेल्वेगाडी दोन मिनिटे थांबेल. त्यानंतर पुढील प्रवासासाठी मार्गस्थ होईल. गाडी क्रमांक १२९७८ अजमेर – एर्नाकुलम एक्स्प्रेसला सिंधुदुर्ग स्थानकात ७ नोव्हेंबरपासून थांबा देण्यात येणार आहे. सिंधुदुर्ग स्थानकात सकाळी ११.४६ वाजता ही रेल्वेगाडी दोन मिनिटे थांबेल.5 / 12गाडी क्रमांक २२६५५ एर्नाकुलम जं. – हजरत निजामुद्दीन एक्स्प्रेसला सिंधुदुर्ग येथे ५ नोव्हेंबरपासून थांबा देण्यात येणार आहे. सिंधुदुर्ग स्थानकात सायंकाळी ७.०८ वाजता ही रेल्वेगाडी दोन मिनिटे थांबेल. गाडी क्रमांक २२६५६ हजरत निजामुद्दीन – एर्नाकुलम जं. एक्स्प्रेसला सिंधुदुर्ग स्थानकात ७ नोव्हेंबरपासून थांबा देण्यात येणार आहे. ही रेल्वेगाडी सिंधुदुर्ग स्थानकात सकाळी ७.२० वाजता दोन मिनिटे थांबेल.6 / 12गाडी क्रमांक २२४७५ हिसार-कोयंबतूर एक्सप्रेसला कणकवली येथे ५ नोव्हेंबरपासून रात्री ९.४६ वाजता थांबा देण्यात येईल. ही रेल्वेगाडी रात्री ९.४८ वाजता पुढील प्रवासासाठी मार्गस्थ होईल. गाडी क्रमांक २२४७६ कोयंबतूर-हिसार एक्सप्रेसला कणकवली येथे ८ नोव्हेंबरपासून सकाळी ६.३० वाजता थांबा देण्यात येईल. ही रेल्वेगाडी सकाळी ६.३२ वाजता पुढील प्रवासासाठी मार्गस्थ होईल.7 / 12गाडी क्रमांक १६३३५ गांधीधाम-नागरकोइल एक्सप्रेसला कणकवली येथे ७ नोव्हेंबरपासून पहाटे ५.४५ वाजता थांबा देण्यात येईल. ही रेल्वेगाडी सकाळी ६.३२ वाजता पुढील प्रवासासाठी मार्गस्थ होईल. गाडी क्रमांक १६३३६ नागरकोइल- गांधीधाम एक्सप्रेसला कणकवली येथे ११ नोव्हेंबरपासून दुपारी २ वाजता थांबा देण्यात येईल. ही रेल्वेगाडी दुपारी २.०२ वाजता पुढील प्रवासासाठी मार्गस्थ होईल.8 / 12दरम्यान, कोकणवासीयांसाठी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पुढाकार घेतला होता. शरद पवार पुन्हा एकदा कोकणच्या मदतीला धावून आले. शरद पवार यांनी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांना पत्र लिहून कोकणवासीयांसाठी एक अत्यंत महत्त्वाची मागणी केली होती. शरद पवार यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही प्रमुख स्थानकांवर लांब पल्ल्याच्या एक्स्प्रेस गाड्यांना थांबा देण्याची विनंती केली होती.9 / 12शरद पवारांनी पत्रासह कोणत्या एक्स्प्रेस ट्रेनना कुठे थांबा हवा आहे, याची यादीच दिली होती. या निवेदनात शरद पवार यांनी एकूण ३२ एक्स्प्रेस गाड्यांचा उल्लेख केला असून, या यादीतील गाड्यांना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्थानकांवर थांबा देण्याची मागणी जोर लावून धरली आहे. कोकण रेल्वेने घेतलेल्या निर्णयामुळे शरद पवार यांच्या यादीतील काही ट्रेनना दोन स्थानकांवर थांबा मिळाला आहे. 10 / 12महाराष्ट्रातील 'सिंधुदुर्ग' हा भारतातील पहिला पर्यटन जिल्हा आपल्या निसर्गरम्य समुद्रकिनाऱ्यांसाठी, ऐतिहासिक किल्ल्यांसाठी आणि समृद्ध कोकणी वारशासाठी सुप्रसिद्ध आहे. मात्र, अनेक लांब पल्ल्याच्या एक्सप्रेस गाड्या सध्या या जिल्ह्यातून न थांबता जात असल्याने येथील नागरिक, विद्यार्थी, व्यावसायिक आणि पर्यटक यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.11 / 12या तळकोकणातील आणि पर्यायाने महाराष्ट्राच्या पर्यटनाला चालना मिळेल, विद्यार्थी, व्यावसायिक आणि रुग्ण यांच्या प्रवासात सोय होईल. स्थानिक उत्पादने व हस्तकलेच्या वाहतुकीला प्रोत्साहन मिळेल तसंच सर्वसामान्य कोकणवासीय माणसांच्या प्रलंबित मागणीला योग्य न्याय मिळेल, असे शरद पवारांनी म्हटले होते. 12 / 12आता कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या वंदे भारत ट्रेनचे नियमित वेळापत्रक ऑक्टोबर महिन्यापासून सुरू होणार आहे. तसेच कोकण रेल्वेचे नियमित वेळापत्रकही लागू झाले आहे. रेल्वे सेवा वाढणार आहे, गती वाढणार आहे. त्यामुळे कोकण रेल्वेवर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.