१ कोटींची लाच, अमृता फडणवीसांचा आरोप, अजित पवारांचा प्रश्न अन् देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2023 03:18 PM2023-03-16T15:18:23+5:302023-03-16T15:23:00+5:30

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्याकडे १ कोटींची लाच मागितल्याचा आरोप करण्यात आला आहे. याविरोधात अमृता फडणवीस यांनी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केल्याची माहिती आहे.

गुरुवारी सकाळी ही बातमी धडकताच राजकीय वर्तुळात खळबळ माजली. नेमकं या प्रकराची सत्यता काय आहे याबाबत विधान सभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सभागृहात पॉईँट ऑफ ऑर्डर उपस्थित करत या मुद्द्यावर देवेंद्र फडणवीसांना निवेदन देण्यास सांगितले.

या प्रकरणावर देवेंद्र फडणवीस म्हणाले की, माझ्या पत्नीने FIR दाखल केलाय ज्यात माझ्या माध्यमातून काम करण्यासाठी तिच्यावर दबाव आणला, पैसे ऑफर केले मग ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न झाला. यातील अनिल जयसिंघानी हा ७-८ वर्ष फरार आहे. त्याच्यावर १४-१५ गुन्हे आहेत.

अनिल जयसिंघानी यांची मुलगी ती शिकलेली आहे. हुशार आहे. ती २०१५-१६ दरम्यान अमृता यांना भेटत होती. त्यानंतर तिचे येणे बंद झाले. त्यानंतर अचानक २०२१ मध्ये या मुलीने पुन्हा माझ्या पत्नीला भेटणे सुरू केले. मी डिझाईनर आहे. कपडे, ज्वेलरी तयार करते असं तिने सांगितले.

बेस्ट ५० पॉवरफूल व्ह्यूममध्ये तिचं नाव आले, पुस्तक प्रदर्शन केले असं सांगत तिने विश्वास संपादन केले. डिझाईनर कपडे घेऊन यायची. माझ्या वडिलांना चुकीच्या केसेसमध्ये फसवण्यात आलंय. तुम्ही त्यांना सोडवण्यास मदत करा. माझ्या पत्नीने तुम्ही निवेदन द्या. त्यावर चौकशी करू असं म्हटलं.

माझे वडील सर्व बुकीजला ओळखतात. आम्ही बुकीजची माहिती द्यायचो आणि दोन्ही बाजूने पैसे घ्यायचो. आपण असं करू असं तिने अमृताला सांगितले. पण अमृताने त्याकडे दुर्लक्ष केले. माझ्या वडिलांना सोडवा मग मी १ कोटी देईन अशी ऑफर केली. त्यानंतर वारंवार बुकीजचा विषय निघाला तेव्हा माझ्या पत्नीने तिला ब्लॉक केले.

त्यानंतर काही दिवसांनी Unknown नंबरवरून काही व्हिडिओ क्लिप्स आल्या. त्या उघडून पाहिल्या त्यात एक गंभीर व्हिडिओ म्हणजे ती मुलगी बाहेर कुठेतरी एक बॅग भरते पैसे भरतेय. त्यात तशीच बॅग भरून आमच्या बंगल्यावरील एका महिलेला देते. हा प्रकार जेव्हा मला कळाला तेव्हा आधी FIR नोंदवला.

या प्रकरणात पोलिसांकडून एक सापळा रचण्यात आला. त्यात मला माझे गुन्हे परत घ्यायचे होते असं तिने सांगितले. त्याचसोबत काही पोलीस अधिकारी, नेत्यांची नावे तिने घेतली. मागच्या सीपींच्या काळात आमच्या केसेस परत घेण्याची कारवाई सुरू झाली होती. तुम्ही आल्यावर ती थांबली. बोलता बोलता तिने हे कुणी करायला सांगितले होते हे सांगितले.

यातील बऱ्याच गोष्टी रेकॉर्ड स्वरुपात आहेत. जवळपास तो व्यक्ती ट्रॅपमध्ये येणार होता. पण तितक्याची ही बातमी लीक झाली. माझा कुणावरही आरोप नाही. पण ज्याप्रकारे तिने हिंट दिल्या. मला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला जातोय. तुमच्या कुटुंबाला ट्रॅप करायचा प्रयत्न सुरू आहे असं मला सांगितले आहे.

जर त्या महिलेच्या मागे जी व्यक्ती आहे तो हाती आला असता तर अनेक गोष्टी समोर आल्या असत्या. हा विषय तुम्ही उपस्थित केला त्याबद्दल मी आभारी आहे. मी यानिमित्ताने एवढेच सांगतो की राजकारण कुठल्या पातळीवर आपण चाललोय? जवळजवळ दीड वर्ष ती घरी येत होती. कॅमेऱ्यात सर्व शूट करायची. फोन रेकॉर्ड करायची. यामागे राजकीय आहे की नाही हे सांगू शकत नाही. पण या प्रकरणाची योग्य ती चौकशी होईल असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं.