ना नाव, ना काही ओळख, फक्त पिवळं बोर्ड; हे आहे भारतातील सगळ्यात अजब रेल्वे स्टेशन
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2025 14:27 IST2025-11-03T13:37:57+5:302025-11-03T14:27:19+5:30
No Name Railway Station : एक विचित्र स्थानक पश्चिम बंगालच्या वर्धमान जिल्ह्यात आहे. जिथे बोर्डवर काहीच लिहिलेलं नाही, पण तरीही गाड्या थांबतात.

No Name Railway Station : भारतात दररोज हजारो लोक रेल्वेने प्रवास करतात. प्रत्येक रेल्वे स्थानकाचं नाव एखादं ठिकाण, ऐतिहासिक घटना किंवा महान व्यक्तीच्या नावावरून ठेवलेलं असतं. पण तुम्ही कधी नाव नसलेल्या रेल्वे स्थानकाबद्दल ऐकलंय का?

असं एक विचित्र स्थानक पश्चिम बंगालच्या वर्धमान जिल्ह्यात आहे. जिथे बोर्डवर काहीच लिहिलेलं नाही, पण तरीही गाड्या थांबतात, प्रवासी तिकिटं घेतात आणि प्रवास करतात.

हे स्थानक वर्धमान शहरापासून साधारण 35 किलोमीटर अंतरावर आहे आणि 2008 साली सुरू झालं. रोज अनेक मालगाड्या आणि प्रवासी गाड्या या मार्गावरून जातात.

पण बांकुडा-मासाग्राम पॅसेंजर ट्रेन ही एकमेव गाडी आहे जी येथे थांबते. इतर एक्सप्रेस गाड्या न थांबता पुढे जातात. येथे तिकिट काउंटर आहे, आणि तिकिटावर 'रैनागर' असं नाव छापलेलं येतं, पण स्थानकाच्या बोर्डवर पूर्ण शांतता! ना नाव, ना ओळख.

सुरुवातीला या स्थानकाचं नाव ‘रैनागर’ ठेवलं गेलं होतं. पण जवळच्या दोन गावांमधील लोकांनी विरोध केला. दोघांनाही वाटलं की स्थानकाचं नाव त्यांच्या गावावरूनच असावं. वाद इतका वाढला की प्रकरण न्यायालयात गेलं.

कोर्टाचा निर्णय येईपर्यंत रेल्वे प्रशासनाने बोर्डवरील नाव काढून टाकलं. तेव्हापासून हे स्थानक ‘बेनाम स्टेशन’ म्हणून प्रसिद्ध झालं. आज तिथे फक्त पिवळा रंगाचा रिकामा बोर्ड दिसतो आणि तोच त्याची ओळख बनला आहे.

या स्थानकाची आणखी एक गंमत म्हणजे रविवारच्या दिवशी ते पूर्णपणे बंद असतं. त्या दिवशी स्टेशन मास्टरला वर्धमान येथे जाऊन तिकिटांचा लेखाजोखा जमा करावा लागतो. त्यामुळे त्या दिवशी कोणतीही सेवा दिली जात नाही.

जरी हे स्थानक नावाशिवाय असलं तरी आसपासच्या लोकांसाठी ते जीवनाचा महत्त्वाचा भाग आहे. दररोज स्थानिक लोक इथून प्रवास करतात कामावर जातात. त्यांच्यासाठी हे सुविधेचं साधन आहे. नाव नसूनही त्यांचं जग चालतं.

भारतामध्ये जिथे प्रत्येक रेल्वे स्टेशन आपलं नाव अभिमानाने दाखवतं, तिथे हे 'बेनाम स्टेशन' आपल्या नावाशिवाय असलेल्या अस्तित्वामुळेच खास बनलं आहे. पिवळा बोर्डच त्याची ओळख आहे. आणि कदाचित, हाच त्याचा वेगळेपणाचा सन्मानही.

















