ऐकावं ते नवलच! 'या' शहरात हिल्स घालून फिरायला घ्यावी लागते सरकारची परवानगी
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2025 15:00 IST2025-09-22T14:25:45+5:302025-09-22T15:00:08+5:30
तुम्हाला माहिती आहे का जगात असे एक शहर आहे, जिथे हाय हिल्स घालणे कायदेशीर गुन्हा आहे. हाय हिल्स घालण्यासाठी सरकारी परवानगी घ्यावी लागते.

आजकाल प्रत्येक मुलीच्या फॅशनचा एक भाग म्हणजे हील्स. प्रत्येकाला ती घालायला आवडते. पण, जर तुम्ही काही कारणाने अमेरिकेला जात असाल, तर हाय हिल्स घेऊन जाण्यापूर्वी दोनदा विचार करा. या देशातील एका शहरात २ इंच किंवा त्यापेक्षा जास्त उंचीच्या हिल्स घालण्यास कायदेशीररित्या मनाई आहे. ही अफवा किंवा मिथक नाही, तर शहराच्या महानगरपालिकेच्या संहितेत समाविष्ट असलेला नियम आहे.
अमेरिकेतील कॅलिफोर्नियातील कार्मेल-बाय-द-सी या शहरात हा नियम आहे. शहराच्या सुरक्षिततेसाठी आणि पायाभूत सुविधांच्या कारणास्तव तो १९६३ मध्ये लागू करण्यात आला.
कार्मेल हे एक लहान, नयनरम्य , समुद्र किनारी वसलेले शहर आहे, जिथे जुनी घरे, अरुंद रस्ते आणि पादचाऱ्यांसाठी वेगळे रस्ते आहेत. इथे आढळणारी सायप्रस आणि मोंटेरी पाइन झाडे कालांतराने वाढतात, त्यांच्यामुळे रस्ते खडबडीत होतात.
पायात हाय हिल्स घालून या खडबड्या मार्गावर चालणे धोकादायक ठरू शकते आणि यामुळे असंख्य अपघात झाले आहेत. विशेषतः या शहराची माहिती नसणाऱ्या पर्यटकांसोबत अशा घटना घडल्या आहेत.
म्हणूनच सुरक्षिततेच्या कारणास्तव या शहरात कायदेशीररित्या हाय हिल्स घालून फिरण्यावर बंदी घालण्यात आली आहे. कायद्यानुसार २ इंच किंवा त्यापेक्षा जास्त उंचीच्या हिल्स घालू इच्छिणाऱ्या महिलांना सरकारी परवानगी घेणे आवश्यक आहे.
हाय हिल्स घालण्यासाठी परवाना मिळवण्याची पद्धत अतिशय सोपी आहे. तुम्ही कार्मेल-बाय-द-सी सिटी हॉलमध्ये अगदी सहज याचा परवाना मिळवू शकता आणि तेही कोणत्याही परवाना शुल्काशिवाय दिले जाईल. हे तुमचे नाव आणि शहराच्या लिपिकाची स्वाक्षरी असलेले अधिकृत प्रमाणपत्र आहे.
हा नियम केवळ सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी आणि अपघात रोखण्यासाठी बनवण्यात आला आहे. कायदा कडक असला तरी, पोलीस त्याची अंमलबजावणी करण्यात फारसे कठोर होत नाहीत. माहितीच्या अभावामुळे बरेच पर्यटक हा नियम पाळत नाहीत.
कार्मेलमध्ये काउबॉय बूट किंवा इतर शूज घालण्यावर कोणतेही बंधन नाही, मात्र, त्यांची टाच २ इंचांपेक्षा कमी असावी आणि टाचांचा तळाचा भाग १ चौरस इंच किंवा त्याहून अधिक असावा.