पाकिस्तानी लष्करातला डॉक्टर ते दहशतवादी; तहव्वूर राणाने २६/११ हल्ल्यासाठी अशी केली होती मदत
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2025 19:23 IST2025-01-25T18:51:47+5:302025-01-25T19:23:37+5:30
Tahawwur Rana Extradiction: मुंबईवर झालेल्या २६/११ हल्ल्यातील आरोपी दहशतवादी तहव्वूर हूसैन याला भारताच्या हवाली करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने यासंदर्भात निकाल दिला आहे.

२६/११ च्या मुंबई हल्ल्यातील दोषी तहव्वूर राणा याच्या भारताकडे प्रत्यार्पण करण्यास अमेरिकेने मंजुरी दिली आहे. अमेरिकेच्या एका न्यायालयाने या खटल्यातील त्याच्या शिक्षेविरुद्ध पुनर्विलोकन याचिका फेटाळली असून, राणाची भारताकडे प्रत्यार्पण टाळण्यासाठीची शेवटची कायदेशीर संधी संपुष्टात आली आहे.
मुंबईवर हल्ला करणाऱ्या दहशतवादी संघटनेला पाठिंबा दिल्याच्या आरोपावरून तहव्वूर हुसेन राणा याच्यावर अमेरिकेच्या जिल्हा न्यायालयात खटला चालवण्यात आला होता आणि डेन्मार्कमधील आणखी एका दहशतवादी कटाचा आरोपही त्याच्यावर होता.
तहव्वूर राणाला भारताकडे प्रत्यार्पणाला अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने शनिवारी मंजुरी दिली. डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर एका दिवसात सर्वोच्च न्यायालयाने गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये दाखल केलेली रिट याचिका फेटाळली होती.
राणाने त्याच्या प्रत्यार्पणाविरुद्ध सॅन फ्रान्सिस्कोमधील यूएस कोर्ट ऑफ अपील फॉर द नाइन्थ सर्किटसह खालच्या न्यायालयात अपील केले आहे. ऑगस्टमध्ये, नवव्या सर्किटने निर्णय दिला की राणाला भारत-अमेरिका प्रत्यार्पण करारानुसार प्रत्यार्पण केले जाऊ शकते.
मुंबई पोलिसांनी तहव्वूर राणाविरुद्ध २०२३ मध्ये ४०० पानांचे पुरवणी आरोपपत्र दाखल केले होते. २६/११ हल्ला प्रकरणातील हे चौथे आरोपपत्र होते. या आरोपपत्रात राणाची हल्ल्यातील भूमिका नमूद करण्यात आली होती.
२०२० मध्ये भारताने त्याच्या प्रत्यार्पणाची मागणी केली होती. आरोपपत्रात मुंबई पोलिसांनी म्हटले की, हल्ला होण्यापूर्वी राणा नोव्हेंबर २००८ मध्ये मुंबईतील एका हॉटेलमध्ये दोन दिवस थांबला होता.
राणाने बनावट कागदपत्रांच्या मदतीने डेव्हिड हेडलीला भारताचा टूरिस्ट व्हिसा मिळवून देण्यास मदत केल्याचे आरोपपत्रात नमूद करण्यात आले आहे. गुन्हे शाखेला हेडली आणि राणा यांच्यातील ईमेल देखील सापडले आहेत, ज्यात त्यांनी आयएसआय मेजर इक्बालबद्दल भाष्य केलं होतं जो मुंबई हल्ल्याचा सह-सूत्रधार होता.
तहव्वूर राणा हा यापूर्वी पाकिस्तानात लष्करात डॉक्टर होता. राणा हा पाकिस्तानी वंशाचा कॅनडाचा नागरिक आहे. त्याने पाकिस्तानात शिक्षण घेतले पण नंतर तो व्यावसायिक म्हणून कॅनडाला गेले. तो डेव्हिड हेडलीचा शालेय मित्र आहे. पाकिस्तानातील हसन अब्दाल कॅडेट स्कूलमध्ये त्याने हेडलीसोबत पाच वर्षे शिक्षण घेतले होते.