ट्रम्पसोबत आणणार बिस्कीट अन् फुटबॉल; एकाच झटक्यात संपू शकतं जग

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2020 04:45 PM2020-02-20T16:45:16+5:302020-02-20T16:51:51+5:30

जगातील सर्वात सामर्थ्यशाली देश असलेल्या अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर येत आहेत. २४ फेब्रुवारीपासून त्यांच्या दौऱ्याला सुरुवात होईल. ट्रम्प त्यांच्यासोबत फुटबॉल आणि बिस्कीट घेऊन येणार आहेत.

ट्रम्प जिथे जिथे जातात, तिथे तिथे फुटबॉल आणि बिस्कीट त्यांच्या सोबत असतं. संपूर्ण जग संपवून टाकण्याची क्षमता फुटबॉल आणि बिस्कीटमध्ये आहे.

ट्रम्प यांच्या कायम सोबत असलेल्या ब्रिफकेसला फुटबॉल म्हटलं जातं. डुकराच्या चामड्यापासून तयार करण्यात आलेली ही ब्रिफकेस जगातली सर्वात सामर्थ्यशाली ब्रिफकेस आहे.

फुटबॉलमध्ये अण्वस्त्र हल्ल्याच्या लॉन्च कोडसोबतच आणखी ४ वस्तू असतात. त्यामुळेच या ब्रिफकेसला न्युक्लिअर फुटबॉल म्हटलं जातं.

लॉन्च कोडसोबतच अमेरिकेच्या अण्वस्त्र हल्ल्याची संपूर्ण योजना आणि लक्ष्यांची माहिती असलेली एक वही यात आहे. यामध्ये एकूण ७५ पानं आहेत.

ट्रम्प यांच्यासोबत नेहमी असलेल्या ब्रिफकेसमध्ये आणखी एक काळ्या रंगाची वही असते. कोणत्याही प्रकारचा हल्ला झाल्यास कुठे लपायचं, याची इत्यंभूत यात असते. या ब्रिफकेसमध्ये एक आपत्कालीन ब्रॉडकॉस्ट यंत्रणादेखील असते.

न्युक्लिअर फुटबॉलमध्ये ३ ते ५ इंच लांबीचं एक कार्ड असतं. याला बिस्कीट म्हटलं जातं. अण्वस्त्र हल्ल्याला दुजोरा देणारे कोड यामध्ये असतात. यामध्ये पाच अलार्म असतात. बिस्कीट गहाळ झाल्यास ते वाजू लागतात.

ब्रिफकेसमध्ये एक अँटेना लावलेलं उपकरण असतं. त्याच्या माध्यमातून अमेरिकेचे अध्यक्ष जगातल्या कोणत्याही भागाशी थेट संपर्क साधू शकतात.