फक्त एक फोन लीक झाला अन् 'या' देशाच्या पंतप्रधानांना पदावरून हटवलं; नेमकं काय घडलं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2025 13:36 IST2025-07-01T13:31:56+5:302025-07-01T13:36:31+5:30

थायलँडच्या पंतप्रधान पैतोंगतार्न शिनावात्रा यांना पदावरून निलंबित करण्यात आले आहे. देशातील संविधानिक न्यायालयाने मंगळवारी त्यांना निलंबित करण्याचा निर्णय सुनावला. कंबोडियासोबत राजनैतिक वादानंतर थायलँडच्या पंतप्रधान शिनावात्रा यांच्याविरोधात हा मोठा निर्णय सुनावल्याने देशातील राजकीय वातावरण चांगलेच पेटले आहे.
थायलँडच्या मीडियानुसार, कोर्टाने सुनावलेला हा निर्णय एका लीक झालेल्या टेलिफोनिक कॉलवरून दिला आहे. ज्यात कंबोडियासोबत सीमावादावर बोलताना कथितपणे मंत्रिपदाबाबत घेतलेल्या नैतिकतेचे उल्लंघन केल्याचा आरोप आहे. थायलँडच्या संविधानिक कोर्टाने ७-२ या बहुमताने हा निर्णय घेतला. त्यात १ जुलैपासून पंतप्रधान यांना त्यांच्या कार्यापासून निलंबित करण्यात येत आहे. हा आदेश या प्रकरणावर अंतिम सुनावणी होईपर्यंत कायम असेल असं कोर्टाने म्हटलं.
हा संपूर्ण वाद मे २०२५ मध्ये थायलँड आणि कंबोडिया यांच्यातील सीमावादावरून सुरू झाला होता. ज्यात एका कंबोडियन सैनिकाचा मृत्यू झाला होता. सीमेवर सुरू असलेल्या संघर्षात थायलँडच्या पंतप्रधान पैतोंगतार्न यांनी कंबोडियन नेते आणि माजी पंतप्रधान हुन सेन यांना फोन केला होता. जे सध्या त्यांच्या देशातील राजकारणात मजबूत व्यक्तिमत्व मानले जाते.
अलीकडेच या दोघांमधील कॉल रेकॉर्डिंग लीक झाले. ज्यात थायलँडच्या पंतप्रधान पैतोंगतार्न यांनी हुन सेन यांचा अंकल म्हणून उल्लेख केला आणि थायलँड सैन्यातील एका वरिष्ठ कमांडर अधिकाऱ्याला विरोधक म्हणून संबोधले होते. या विधानामुळे देशाच्या संरक्षण संस्था आणि संसदेत बसलेल्या रूढीवादी खासदारांमध्ये गोंधळ निर्माण झाला.
थायलँड संसदेतील खासदारांच्या एका गटाने जे सैन्याच्या जवळचे मानले जातात त्यांनी हा फोन कॉल लीक झाल्यानंतर पंतप्रधानाविरोधात कोर्टात याचिका दाखल केली. पंतप्रधानांनी अशा संवेदनशील प्रकरणात कंबोडियासमोर झुकण्याचे संकेत दिले आणि सैन्याची जाहीरपणे नाचक्की केली, जे संविधानानुसार मंत्रिपदाच्या नैतिकतेचे उल्लंघन आहे असा आरोप केला.
पंतप्रधानांच्या या वर्तवणुकीमुळे थायलँडची राष्ट्रीय सुरक्षा, परराष्ट्र धोरण आणि सैन्याच्या प्रतिष्ठेला धक्का पोहचला आहे असंही खासदारांच्या गटाने आरोप केला. सध्या या प्रकरणावर पंतप्रधान शिनावात्रा यांनी कुठलेही जाहीर विधान किंवा प्रतिक्रिया दिली नाही. परंतु त्यांच्या प्रवक्त्यांनी यावर भाष्य केले आहे.
पंतप्रधानांनी उचललेले पाऊल देशात शांतता राखून अनावश्यक संघर्ष टाळण्याचा होता. त्यांनी कुठल्याही प्रकारे आक्षेपार्ह विधान केले नाही. कॉल लीक होणे आणि त्याला चुकीच्या पद्धतीने व्हायरल केले जाणे यामुळे पंतप्रधान दु:खी आहेत. कोर्टाचा सन्मान करत त्या तपासात सहकार्य करतील असं त्यांच्या प्रवक्त्यांनी सांगितले.
पंतप्रधान शिनावात्रा या माजी पंतप्रधान थाक्सिन शिनावात्रा यांच्या कन्या आहेत. २००६ मध्ये लष्करी उठावानंतर थाक्सिन स्वतः सत्तेवरून पायउतार झाले होते आणि तेव्हापासून त्यांचे कुटुंब थायलँडच्या राजकारणात सतत वादात अडकले आहे.
पंतप्रधान शिनावात्रा यांच्या सरकारला सुरुवातीपासूनच लष्कर आणि रूढीवादी शक्तींकडूनही विरोध सहन करावा लागला आहे. हे निलंबन केवळ कायदेशीर बाब नाही तर ती सत्ता संघर्षाचा एक भाग आहे ज्यामध्ये सैन्य समर्थित संस्था पुन्हा लोकशाही पद्धतीने निवडून आलेल्या सरकारला कमकुवत करण्याचा प्रयत्न करत आहे असं राजकीय विश्लेषक मानतात.
पंतप्रधानांचा फोन कॉल लीक झाल्यानंतर आघाडी सरकारमधील प्रमुख पक्ष भूमजाइथाई यांनी सरकारचा पाठिंबा काढून घेतला आहे. मंगळवारी थायलँडमधील राजा महा वजीरालोंगकॉर्न यांनी पंतप्रधान पैतोंगतार्न शिनावात्रा यांच्या नवीन मंत्रिमंडळाला मंजुरी दिली आहे. नव्या मंत्रिमंडळातून माजी उपपंतप्रधान आणि भूमजाइथाई पक्षाचे नेते अनुतिन चारविरकुल यांना हटवण्यात आले आहे.