कॉलेजच्या मुलींसाठी अजब ऑफर... मुलं जन्माला घातली तर मिळतील ८० हजार रुपये!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2025 11:52 IST2025-01-10T11:45:43+5:302025-01-10T11:52:45+5:30
रशियातील कारेलियामध्ये स्थानिक प्रशासनाने मुलींना मुलं जन्माला घालण्याचे आवाहन करत त्या बदल्यात मोठी रक्कम देऊ केली आहे.

अनेक देशातील जन्मदर झपाट्याने घसरत आहे, ज्यामुळे त्या देशात तरुण पिढी कमी आहे आणि वृद्धांची संख्या वाढत आहे. या कारणामुळे काम करणाऱ्या तरुणांची संख्या कमी आहे, परिणामी देशाच्या जीडीपीवर देखील याचा परिणाम होत असतो. त्यामुळे अशा देशातील सरकार जोडप्यांना मुलांना जन्म देण्यासाठी प्रोत्साहन देत आहेत.
अशातच रशियामध्ये एका प्रांतातील स्थानिक प्रशासनाने कॉलेज- युनिव्हर्सिटीमधील मुलींना एक अजब ऑफर दिली आहे. ज्याची चर्चा जगभरात होत आहे. रशियातील कारेलियामध्ये स्थानिक प्रशासनाने मुलींना मुलं जन्माला घालण्याचे आवाहन करत त्या बदल्यात मोठी रक्कम देऊ केली आहे.
जर २५ वर्षांखालील महाविद्यालयीन-विद्यापीठातील मुलींनी निरोगी मुलाला जन्म दिला तर त्यांना १००,००० रूबल (जवळपास ८१,००० रुपये) दिले जातील. द मॉस्को टाईम्सच्या वृत्तानुसार, देशातील घटत्या जन्मदरात सुधारणा करण्यासाठी हे धोरण लागू करण्यात आले आहे.
हे धोरण १ जानेवारीपासून लागू झाली आहे. जर मूल मृत जन्माला आले तर मुलीला योजनेत नमूद केलेले पैसे मिळणार नाहीत. त्यामुळे अशातच, आता जर बाळाचा जन्मानंतर अचानक मृत्यू झाला, तर देयकाची स्थिती काय असेल? जर मूल अपंगत्व घेऊन जन्माला आले तर काय? असे अनेक प्रश्न आहेत, ज्यांबद्दल अजूनही संभ्रम आहे.
जन्मदर वाढवण्यासाठी रशियामध्ये अशा अनेक योजना राबवल्या जात आहेत. परंतु यापैकी अनेक योजनांना तज्ज्ञांनी अपुऱ्या आणि दूरदृष्टीचा अभाव असल्याचे म्हटले आहे. रशियामध्ये २०२४ च्या पहिल्या ६ महिन्यांत फक्त ५,९९,६०० मुलं जन्माला आली, जी गेल्या २५ वर्षांतील सर्वात कमी आहेत.
जून महिन्यात, जन्मदर ऐतिहासिकदृष्ट्या १,००,००० च्या खाली घसरला होता. त्यामुळे कमी होणारा जन्मदर हा येत्या काळात देशातील तरुणांची संख्या कमी होणारा आहे. ही अडचण ओळखून देशात यासंबंधी अनेक योजना तयार करण्यात येत आहेत.
फॉर्च्यूनच्या एका रिपोर्टनुसार, क्रेमलिनचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह यांनी जुलैमध्ये म्हटले होते की, हे देशाच्या भविष्यासाठी विनाशकारी आहे. दरम्यान, १९९० मधील रशियाच्या जनगणेनंतर लोकसंख्येत घट होत असल्याचे दिसून आले. जर परिस्थिती अशीच राहिली तर रशियामध्ये लोकसंख्या घटण्याचे गंभीर संकट निर्माण होईल.